एका वर्षातच अंगणवाडीची दुरवस्था

By admin | Published: July 7, 2017 12:12 AM2017-07-07T00:12:56+5:302017-07-07T00:12:56+5:30

वेणी येथे लाखो रुपये खर्चून अंगणवाडीचे बांधकाम

Anganwadi drought in one year only | एका वर्षातच अंगणवाडीची दुरवस्था

एका वर्षातच अंगणवाडीची दुरवस्था

Next

प्रभाकर पुंड ।
लोकमत न्यूज नेटवर्क
वेणी : लोणार तालुक्यातील वेणी येथील अंगणवाडीमध्ये ५० टक्के मुलांची हजेरी कागदावरच राहत आहे. तसेच येथे २०१५-१६ मध्ये बांधण्यात आलेल्या अंगणवाडीची वर्षभरात दुरवस्था झालेली असून, निकृष्ट आणि अर्धवट केलेल्या कामामुळे विद्यार्थ्यांच्या जीविताला धोका निर्माण झालेला आहे. पोषण आहार आणि विद्यार्थ्यांच्या शिक्षणाबाबत अंगणवाडी प्रशासन उदासीन असल्याने चिमुकल्यांचे नुकसान होत आहे.
लोणार तालुक्यामध्ये गावागावांत वस्ती-वाड्यावर शासनाने अंगणवाड्या सुरू केल्या. या अंगणवाड्यांमध्ये अनेक मुले केवळ पटावरच शिक्षण घेत असून, प्रत्यक्षात ५० टक्के विद्यार्थी उपस्थितच नसल्याचा धक्कादायक प्रकार वेणी येथे उघडकीस आला आहे. अंगणवाड्यांना ५ जुलै रोजी सकाळी ९.३० ते ११ वाजता भेटी दिल्या. वेणी येथे ४ अंगणवाडी आहेत. त्यामध्ये १६१ पटसंख्येची कागदोपत्री नोंद आहे. सरपंच अभिमन्यू साखरे यांच्या कार्यकाळात दोन अंगणवाड्यांसाठी २०१५-१६ मध्ये नवीन निकृष्ट आणि अर्धवट इमारतीचे बांधकाम झाले. याच निकृष्ट बांधकाम असलेल्या इमारतीत अंगणवाडी भरते. अंगणवाडीची वेळ सकाळी ८ ते दुपारी १२ पर्यंत आहे. सहा महिने ते तीन वर्षे वयोगटातील लाभार्थींना शिरा ९६० ग्रॅम, उपमा ९६० ग्रॅम, सातू ९६० ग्रॅम व पॅकबंद पाकीट २५ दिवसांसाठी तीन पाकीट घरपोचची सुविधा आहे. गरोदर, स्तनदा मातांना शिरा ११२० ग्रॅम, उपमा सुकळी ११२० ग्रॅम व पॅकबंद पाकीट २५ दिवसांसाठी तीन पाकीट घरपोच, ३ ते ६ वर्षलाभार्थ्यांना गरम ताजा आहार खिचडी, कडधान्य, उसळ, लापसी, ९० ग्रॅम तांदूळ व १० ग्रॅम दाळ, २० ग्रॅम मटकी, २० ग्रॅम वटाना उसळ दररोज केंद्रामध्ये देण्यात यावा. किशोर मुली १५ ते १८ वयोगटातील उपमा, सातू, शिरा व २५ दिवसांसाठी ३ पॅकबंद पाकीट घरपोच देण्याचा शासन प्रयत्न करीत आहे.
मात्र, ५ जुलै रोजी येथील अंगणवाडीला भेट दिली असता ५० टक्के बालक उपस्थित नव्हते. बालकांच्या घरोघरी जाऊन पालकांच्या भेटी घेतल्या असता, बालक अंगणवाडीत किती वाजता जाते, किती वाजता घरी येते, बालकांना पोषण आहार काय दिल्या जातो, तर तांदळाच्या खिचडी शिवाय काहीच दिल्या जात नसल्याची माहिती पालकांकडून सांगण्यात आली. बालकांना पूर्वशालेय शिक्षण, गीत, गाणे, खेळ शिकविल्या जाते काय, याबद्दल पालक अनभिज्ञ असल्याचे दिसून आले.

वस्तू ठेवण्यासाठी शौचालयाचा वापर
२०१५- १६ मध्ये सरपंच अभिमन्यू साखरे यांच्या कारकिर्दीत अंगणवाडीच्या दोन इमारतीचे बांधकाम अतिशय निकृष्ट दर्जाचे झालेले असून, हे बांधकाम अर्धवट असल्यामुळे उघड्या असलेल्या टाकीत साचलेल्या पाण्यामुळे बालकांच्या जीविताला धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या इमारतीत शौचालय असून, त्याचा वापर अडगळीचे सामान ठेवण्यासाठी केला जातो. इमारतीचे छत गळत असल्यामुळे पाऊस आला की अंगणवाडीतील पोषण आहाराचे साहित्य सुरक्षित ठेवण्यासाठी धावपळ करावी लागत असून, विद्यार्थ्यांना सुटी दिली जाते. यामुळे शासनाच्या उद्देशाला खीळ बसत असून, विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात आलेले आहे.

पोषण आहार होतो खराब
अंगणवाडीच्या इमारतीला खिडक्या नसल्यामुळे पोषण आहारात परिसरातील घाण हवेमुळे उडून पोषण आहार खराब होत आहे. त्यामुळे अशा पोषण आहारामुळे बालके आजारी पडू शकतात. तसेच दिव्यांग विद्यार्थ्यांना वर्ग खोलीत जाण्यासाठी पायऱ्या तयार करण्यात आल्या होत्या. मात्र, त्या काही दिवसातच तुटलेल्या आहेत. दिव्यांग विद्यार्थ्यांना वर्ग खोलीत जाण्यासाठी तयार करण्यात आलेल्या पायऱ्यांची दुरवस्था झाल्याने विद्यार्थ्यांना वर्गखोलीत जाणे अडचणीचे होत आहे.

Web Title: Anganwadi drought in one year only

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.