४५ हॉस्पीटलसह १३६ दवाखान्यांची तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2017 12:11 AM2017-05-19T00:11:10+5:302017-05-19T00:11:10+5:30

दोन डॉक्टरांवर कारवाई : १९ जणांना नोटीस, दवाखाने तपासणी मोहीम पूर्णत्वास

136 Hospital Checkers with 45 Hospitals | ४५ हॉस्पीटलसह १३६ दवाखान्यांची तपासणी

४५ हॉस्पीटलसह १३६ दवाखान्यांची तपासणी

Next

नितीन निमकर्डे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव : शासन आदेशानुसार १५ मार्चपासून सुरु झालेल्या राज्यव्यापी मोहिमेंतर्गत खामगाव शहरातील ४५ हॉस्पीटल्ससह तालुक्यातील एकूण १३६ दवाखान्यांची तपासणी करण्यात आली आहे. यामध्ये अनधिकृतरित्या अ‍ॅलोपॅथीची प्रॅक्टीस करणाऱ्या दोघांचे दवाखाने बंद करण्यात आले तर १९ जणांना अन्य त्रुटींसंदर्भात नोटीस देण्यात आल्या आहेत.
नाशिक जिल्ह्यात अनधिकृत सोनोग्राफी सेंटर आढळून आल्यानंतर राज्य शासनाने संपूर्ण राज्यातील सर्व दवाखान्यांची तपासणी करण्याचे आदेश आरोग्य विभागाला दिले होते. याकरिता प्रथम १५ मार्च ते १५ एप्रिल पर्यंतची मुदत देण्यात आली होती. परंतु या कालावधीत ही मोहीम पूर्ण होवू न शकल्याने १५ मेपर्यंत एक महिन्याची मुदतवाढ शासनाने दिली होती. सदर तपासणी मोहिमेंतर्गत शहर व ग्रामीण भागातील सर्व क्लिनिक, हॉस्पीटल्स यांची तपासणी आरोग्य विभागाच्या पथकाद्वारे करण्यात आली.
यामध्ये खामगाव तालुक्यात ग्रामीण भागामध्ये तालुका आरोग्य अधिकारी डॉ.अभिलाष खंडारे यांच्या नेतृत्वातील पथकाने ६१ दवाखान्यांची तपासणी केली. यात दोन ठिकाणी बीईएमएस पदवीधारक अ‍ॅलोपॅथीची प्रॅक्टीस करताना आढळल्याने त्यांना ही पॅ्रक्टीस बंद करण्याचे निर्देश देण्यात आले. त्यानुसार त्यांनी प्रॅक्टीस बंद केली आहे. तर रुग्णांचा तपशिल, औषधीची बिले आदी रेकॉर्ड न ठेवल्याबद्दल तसेच अन्य त्रुटी आढळून आल्याने १५ जणांना नोटीसेस देण्यात आल्या. खामगाव शहरात सामान्य रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी यांच्या पथकाने ४५ हॉस्पीटल्सची तपासणी केली. तर नगरपरिषदेच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून शहरातील ३० क्लिनिकची तपासणी करण्यात आली.
अशाप्रकारे शहरात एकूण ७५ दवाखान्यांची तपासणी करण्यात आली. यामध्ये त्रुटी आढळून आलेल्या ४ हॉस्पीटलच्या संचालकांना त्रुटींची पूर्तता करण्याबाबत लेखी सूचना देण्यात आल्या. यात अग्निविषयक सुरक्षा व्यवस्था नसणे, प्रदूषणविषयक नियमांचे पालन न करणे अशा त्रुटी आढळून आल्या.

या बाबींची झाली तपासणी
सदर मोहिमेत अनधिकृत सोनोग्राफी सेंटर, गर्भपात केंद्रांसह विविध दवाखान्यांमधील अनियमितता व त्रुटी शोधून त्या दूर करण्यावर भर देण्याचा उद्देश होता. त्यानुसार संबंधित डॉक्टरांचे वैद्यकीय प्रमाणपत्र, त्यांच्या दवाखान्यातील व्यवस्था, रुग्णांचे व उपचारविषयक रेकॉर्ड, साफसफाई, उपलब्ध सुविधा, दवाखान्याला मेडीकल संलग्न आहे का, गर्भपाताच्या औषधांचा साठा आदी बाबींची तपासणी करण्यात आली.

राज्यात पहिल्यांदाच झाली संपूर्ण तपासणी
याअगोदर शासनाने बोगस डॉक्टरांविरुध्द कारवाई करण्यासाठी बरेचदा धडक मोहीम राबविली. पण ती मर्यादीत स्वरुपाची होती. यावेळेस पहिल्यांदा सर्व प्रकारच्या दवाखान्यांची तपासणी करण्यात आली. यात कारवाईपेक्षा अनियमितता व त्रुटी दूर करण्यावर भर असल्याने ही मोहीम आगळी-वेगळी ठरली असून अशी तपासणी पहिल्यांदा झाल्याचे दिसून येत आहे.

सदर मोहिमेमुळे वैद्यकीय क्षेत्रातील मनमानी दूर करण्याचा प्रयत्न झाला असून शासकीय यंत्रणा दवाखान्यांवर लक्ष ठेवून आहे असा एक चांगला संदेश लोकांमध्ये गेला आहे. याबद्दल नागरिकांसोबतच खुद्द काही डॉक्टरांनी आनंद व्यक्त केला. तपासणीदरम्यान डॉक्टरांचे चांगले सहकार्य लाभले.
- डॉ.अभिलाष खंडारे, तालुका आरोग्य अधिकारी खामगाव

Web Title: 136 Hospital Checkers with 45 Hospitals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.