गोवर - रूबेला लसीकरण आणि पालकांची मानसिकता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2019 12:07 PM2019-01-04T12:07:51+5:302019-01-04T12:12:15+5:30

रत्नागिरी जिल्ह्यासह संपुर्ण देशात २७ नोव्हेंबरपासून गोवर रूबेला लसीकरणाला प्रारंभ झाला आहे. बालकांच्या रोगप्रतिकारशक्ती व एकाग्रतेवर आघात करणाऱ्या या प्रतिबंधक लसीचा लाभ जिल्ह्यातील ९ महिने ते १५ वर्षे वयोगटातील ३ लाख ७ हजार बालकांना मिळवून देण्याचे उद्दिष्ट जिल्हा प्रशासनाने ठेवले आहे.

Goose - Vaccination of rubella and parental mentality | गोवर - रूबेला लसीकरण आणि पालकांची मानसिकता

गोवर - रूबेला लसीकरण आणि पालकांची मानसिकता

googlenewsNext
ठळक मुद्देगोवर - रूबेला लसीकरण आणि पालकांची मानसिकता...तर उद्दिष्ट नक्कीच १०० टक्क्यांपर्यंत पोहोचेल

शोभना कांबळे 

रत्नागिरी : जिल्ह्यासह संपुर्ण देशात २७ नोव्हेंबरपासून गोवर रूबेला लसीकरणाला प्रारंभ झाला आहे. बालकांच्या रोगप्रतिकारशक्ती व एकाग्रतेवर आघात करणाऱ्या या प्रतिबंधक लसीचा लाभ जिल्ह्यातील ९ महिने ते १५ वर्षे वयोगटातील ३ लाख ७ हजार बालकांना मिळवून देण्याचे उद्दिष्ट जिल्हा प्रशासनाने ठेवले आहे.

५ जानेवारीपर्यंत हे लसीकरण करण्याची अंतिम तारीख असली तरीही अधिकाधीक बालकांना त्याचा लाभ व्हावा, या उद्देशाने जिल्ह्याची आरोग्य यंत्रणा धडपडत आहे. त्यामुळे आता आणखी एक दोन दिवस ही मोहीम पुढे चालू राहील.

आत्तापर्यंत झालेल्या लसीकरणाचा विचार करता जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली आणि जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आंचल गोयल आणि जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरूद्ध आठल्ये यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य यंत्रणेबरोबरच, शिक्षण आणि अंगणवाडी या तीन विभागातर्फे ही मोहीम राबविण्यात आली.

तसेच यात सामाजिक संस्था, व्यक्तिगत स्तरावर या मोहिमेला केलेले सहकार्य हेही तितकेच महत्वाचे आहे. मात्र, ज्यांच्यासाठी ही मोहीम आहे, त्या मुलांच्या पालकांची काही ठिकाणी असहकार्य भुमिका अतिशय वेगाने चाललेल्या या मोहीमेला अडचणीची ठरत आहे.

काही वर्षांपासून प्राथमिक, ग्रामीण आरोग्य केंद्रांसह शाळांमध्ये पोलिओसह विविध डोस दिले जात आहेत. अनेक वर्षांपासून ही मोहीम सुरू आहे. पोलिओसारखे डोस अगदी घरी जाऊन बालकांना दिले जातात. काही वेळा किरकोळ स्वरूपात काही बालकांना त्याचा त्रासही होतो. मात्र, असा त्रास होतो, हे आपण तेव्हांपासून गृहित धरत आलो आहोत. मग गोवर - रूबेलाच्या लसीकरणाबाबत साशंकता का दाखवतो. हे नाव नवीन वाटतं म्हणून?

गोवर - रूबेला लसीकरणाची मोहीम ही केंद्रशासनाची असल्याने देशस्तरावर त्याची २७ नोव्हेंबरपासून अंमलबजावणी सुरू झाली आहे. आरोग्य, अंगणवाडी आणि शिक्षण अशा तीन विभागांच्या एकत्रित सहकार्याने ही मोहीम सर्व शाळा, अंगणवाडी, प्राथमिक आरोग्य केंद्रे, ग्रामीण रूग्णालये, नागरी सर्व आरोग्य केंद्रे येथे प्रभावीपणे सुरू आहे. जिल्हाधिकारी या मोहिमेचे प्रमुख असल्याने त्यांच्या नेतृत्वाखाली ही मोहीम राबविली जात आहे.

यासाठी आरोग्य विभागाकडून अगदी आॅगस्ट महिन्यापासून नियोजन केले जात होते. पालकांमध्ये जागृती व्हावी, यासाठी विविध माध्यमांच्या आधारे मोठ्या प्रमाणावर प्रसिद्धही झाली होती. अगदी शाळांमध्ये पालकसभांना उपस्थित राहून त्यांना या मोहिमेची माहिती देण्यात आली होती.

पोलिओ किंवा अन्य लसीकरणापेक्षा या लसीकरणाची खरतर प्रसिद्धी अधिक प्रमाणावर झाली आहे. मात्र, अधिक प्रसिद्धी असेल तर त्यामागे वृथा किंतू काढण्याची आपली मानसिकता अधिक असते. या मोहिमेतही ही मानसिकता आड आली.

त्यातच सुरूवातीला दोन मुलींना लस घेतल्यानंतर त्रास झाल्याने तर या मोहीमेला अधिक गालबोट लावण्याचा प्रयत्न झाला. मात्र, त्या मुलींना का त्रास झाला, याचे कारण आपल्या मुलाला लसीकरण नाकारणाऱ्या पालकांनी समजून घ्यायला हवे. याआधीही लसीकरण झालेल्या बालकांना लस घेतल्यानंतर किरकोळ त्रास होतो, हे सर्वांनाच ज्ञात आहे. मात्र, ९५ टक्के पाण्याने भरलेल्या ग्लासापेक्षा आपल्याला ५ टक्के रिता राहिलेला ग्लास दिसत असेल तर ती आपली नकारात्मकता असलेली दृष्टी आहे, असा यातून अर्थ निघतो.

नागरिकांच्या आरोग्यासाठीच शासनाचा आरोग्य विभाग काम करतो. असं असताना त्यांच्या हिताला बाधा येईल, असे लसीकरण अख्ख्या देशात राबविले जाईल का, हा मूळ विचार प्रथम सूज्ञ पालकांनी करायला हवा. लस निर्माण करणाऱ्या कंपनीचा धंदा चालावा, म्हणून शासन नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करणार नाही, एवढा विचार मनात करायला हवा.

रत्नागिरीचा विचार करता सध्या सुरू असलेली मोहीम ही जिल्हा प्रशासनाचा आरोग्य विभाग आणि शिक्षण विभाग यांच्या माध्यमातून सुरू असली तरी या मोहीमेसाठी रोटरी क्लब, लायन्स क्लब, लायनेस क्लब, स्थानिक व्यापारी, स्थानिक लोकप्रतिनिधी, विविध सामाजिक संघटना, इंडियन मेडिकल असोसिएशन, मुकुल माधव फाऊंडेशन, ए जमिएत ए हिंद आदी संघटनांबरोबरच काही सामाजिक कार्यकर्तेही ही लस अधिकाधीक बालकांना मिळावी, यासाठी धडपडत आहेत. त्या सर्वांच्या एकत्रित प्रयत्नाला यश आल्यानेच जिल्ह्यात २७ नोव्हेंबर ते ३ जानेवारी या कालावधीत अपेक्षित ३ लाख ६ हजार ७३७ पैकी तब्बल २ लाख ५२ हजार ३५७ बालकांना गोवर - रूबेला लसीकरण करण्यात आले आहे.

आत्तापर्यंत झालेल्या या ८२ टक्के लसीकरणादरम्यान प्रारंभीच्या दोन मुली वगळता कुठल्याही बालकाला गंभीर त्रास झाल्याचे ऐकिवात नाही. ज्या मुलींना त्रास झाला, त्याचे कारण हे लसीकरण नसून अन्य कारण होते, हे लक्षात घ्यायला हवे.

या लसीकरणादरम्यान काही बालकांना किरकोळ त्रास होतो, तो या कारणाने की काही पालक त्या मुलांना लसीकरणासाठी आणताना त्यांना काहीही खायला न देताच आणतात. काही वेळा तर मुलाचे आजारपण न सांगताच लस देण्यासाठी आणतात. त्यामुळे लस घेणार, याची भीती आधीच घेउन आलेले असे मूल लस घेताना घाबरून जाते, त्यामुळे स्वाभाविकच त्याला किरकोळ त्रास होवू शकतो. मात्र, कुठल्याही गोष्टीची शहानिशा न करता काही पालकांनी या मोहीमेशी घेतलेली असहकार्याची भूमिका चुकीचीच आहे. आपल्या मनात शंका असतील तर त्यांचे निरसन आरोग्य अधिकारी यांच्याकडून करून घ्यायला हवे.

ही मोहीम जिल्हा तसेच तालुकास्तरावर राबविताना सातत्याने त्या संदर्भात बैठका घेतल्या जात आहेत. जिल्हा कृती दल व कोअर कमिटीमार्फत नियमित मार्गदर्शन करण्यात येते तसेच सातत्याने आढावाही घेण्यात येतो. या मोहिमेत केंद्र आणि राज्य स्तरावर विशेष निरीक्षकांची नियुक्तीही करण्यात आली असून आरोग्य क्षेत्रात महत्वपूर्ण भुमिका असलेल्या जागतिक आरोग्य संघटनेचे यावर संनियंत्रण आहे, याची माहिती आपण कधी करून घेणार?

आता काही दिवसच ही मोहीम चालणार आहे. मात्र, यापुढे दरवर्षीच्या नियमित लसीकरणात समाविष्ट केली जाणार आहे. आत्तापर्यंत या मोहिमेत जिल्ह्यातील सर्वच शाळांनी, शैक्षणिक संस्थांनी सकारात्मकता दाखवून सहकार्य केले आहे. मात्र, काही पालकांकडूनच आपल्या मुलाला लसीकरण करताना विरोध दर्शविला जात आहे. त्यामुळे त्यांची मुले या लसीकरणापासून वंचित रहाणार आहेत.

या मोहीमेला काहीच दिवस शिल्लक असल्याने या पालकांनी या मोहीमेत सहभागी असलेल्या या विविध यंत्रणा आणि नामवंत सामाजिक तसेच अन्य संस्था यांच्या हेतूबद्दल साशंकता न दाखवता आपल्या मुलाला या लसीकरणाचा लाभ मिळवून दिल्यास या मंडळींच्या धडपडीला यश येईल आणि जिल्ह्याचे उद्दिष्ट नक्कीच १०० टक्क्यांपर्यंत पोहोचेल.

Web Title: Goose - Vaccination of rubella and parental mentality

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.