गोऱ्या रंगाचे अतिरेकी वेड !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2018 10:46 AM2018-04-14T10:46:59+5:302018-04-14T10:46:59+5:30

मध्य प्रदेशातील भोपाळमध्ये एका मातेने आपल्या पाच वर्षांच्या दत्तक मुलास तो गोरा दिसावा म्हणून दगडाने इतके घासले की, त्यामुळे त्याच्या शरीरावर असंख्य जखमा झाल्या. विशेष म्हणजे ही महिला एक शिक्षिका आहे.

Obsession of fairness ! | गोऱ्या रंगाचे अतिरेकी वेड !

गोऱ्या रंगाचे अतिरेकी वेड !

ठळक मुद्देइंग्रज हा देश सोडून गेल्याला ६० वर्षे लोटून गेली असली तरी गोऱ्या रंगाने आम्हाला अजूनही पछाडले आहे. वर्णभेदाच्या वेली येथील मनामनात कायमच आहेत.

सविता देव हरकरे
नागपूर:
बालपणापासूनच आपण बगळा आणि कावळ्याची गोष्ट नेहमी ऐकत आलो आहोत. बगळ्याचा पांढराशुभ्र रंग बघून कावळ्याला ईर्षा वाटते आणि मग आपला काळा रंग बदलून गोरे होण्याच्या नादात हा कावळा दगडाने आपले शरीर सोलून घेतो. पण त्याचा काळा रंग काही बदलत नाही आणि तो बदलणारही नसतो. ही तर झाली कावळ्या-बगळ्याची कथा. माणसाचे व्यक्तिमत्त्व हे त्याच्या बाह्य रंगावरून नव्हे तर अंतरंगातून फुलत असते, हे माणसाला सुद्धा कुठे उमजले आहे? एरवी गोऱ्या रंगाचा अट्टाहास करणाऱ्या लोकांची या जगात काही कमतरता नाही आणि त्यासाठी वेळप्रसंगी अमानवीय कृत्य करण्यासही ते मागेपुढे बघत नाहीत, हे अलीकडेच एका घटनेवरून सिद्ध झाले आहे. मध्य प्रदेशातील भोपाळमध्ये एका मातेने आपल्या पाच वर्षांच्या दत्तक मुलास तो गोरा दिसावा म्हणून दगडाने इतके घासले की, त्यामुळे त्याच्या शरीरावर असंख्य जखमा झाल्या. विशेष म्हणजे ही महिला एक शिक्षिका आहे. तिने उत्तराखंडातील एका अनाथालयातून दीड वर्षांपूर्वी या मुलाला दत्तक घेतले होते. त्याला घरी आणल्यापासून तो गोरा दिसावा म्हणून ती त्याला दररोज दगडाने घासायची. मुलगा दु:खाने विव्हळायचा पण त्याचेही भान या मातेला नव्हते. या बाईच्या भाचीला हा अघोरी प्रकार काही सहन झाला नाही. तिने अखेर स्वयंसेवी संस्थेच्या मदतीने पोलिसात तक्रार केली. गोऱ्या रंगाच्या वेडापायी एवढे निष्ठूरपणे वागणाऱ्या या बाईला आता पोलिसांनी अटक केली आहे.
इंग्रज हा देश सोडून गेल्याला ६० वर्षे लोटून गेली असली तरी गोऱ्या रंगाने आम्हाला अजूनही पछाडले आहे. वर्णभेदाच्या वेली येथील मनामनात कायमच आहेत. या देशात गोरा रंग श्रेष्ठत्वाचे प्रतीक मानला जातो तर काळ्या रंगाची पदोपदी अवहेलना केली जाते. आमच्या लेखी गोरा रंग हेच सौंदर्याचे लक्षण आहे आणि काही मोजके अपवाद वगळता ही गोरी माणसेच अधिक लोकप्रियही होतात. या वर्णभेदाचे चटके लहानपणापासूनच सहन करावे लागतात. शाळांमधील स्नेहसंमेलने अथवा इतर सांस्कृतिक कार्यक्रमांमध्येच बघा ना! प्रमुख भूमिका एखाद्या काळ्या मुलाला अथवा मुलीला सहसा दिली जात नाही. पाहुण्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत किंवा ओवाळायचे असले तरीही गोऱ्या मुलींनाच प्राधान्य असते. काळ्यासावळ्या मुलींना ही संधी मिळत नाही. तारुण्यात तर तुमच्या त्वचेच्या रंगाला प्रचंड महत्त्व प्राप्त होते. गोऱ्या स्री-पुरुषांना इतरांच्या तुलनेत संधीचे दरवाजे लवकर खुले होतात. हे मान्य करावेच लागेल. कारण ते वास्तव आहे. गोऱ्या रंगाप्रति द्वेष अथवा राग नव्हे.
गोरेपणाचे हे श्रेष्ठत्व आमच्या मनात कुठेतरी लहानपणापासूनच कोरले जाते. ‘गोरी गोरी पान फुलासारखी छान...’ अशा गाण्यांमधून. आज आम्ही स्वत:ला कितीही प्रगत समजत असलो तरी गोरेपणाचे हे वेड दिवसागणिक वाढतच चालले आहे. रंग गोरा करण्याचा खोटा दावा करणाऱ्या नानाविध क्रीमच्या विस्तारलेल्या बाजारपेठेवरून हे लक्षात यावे. जागतिक आरोग्य संघटनेच्या दाव्यानुसार भारतातील ६१ टक्के तर चीनमध्ये ४० टक्के महिलांना गोरेपणाच्या महागड्या क्रीम्सनी ग्रासले आहे.
गेल्या वर्षी रंगभेदावरून देशात चांगलीच चर्चा रंगली होती. विशेष म्हणजे प्रथमच संसदेत हा मुद्दा गाजला. महिलांमध्ये हीन भावना निर्माण करणाºया क्रीम्सच्या जाहिरातींवर बंदी घालण्याची मागणी काही खासदारांनी उचलून धरली होती. अर्थात त्यावर काही झाले नाही. संसदेबाहेरही काही उपटसुंभ नेत्यांच्या वक्तव्यांमुळे वादाला तोंड फुटले. असे का घडावे?
खरे तर आमच्या देशाच्या कायद्यात धर्म, रंग आणि जातीवर आधारित भेदभावाला कुठलाही थारा नाही. देशाने भौतिक आणि मानवी विकासाच्या क्षेत्रात नावलौकिक प्राप्त केला. विज्ञान तंत्रज्ञानात उत्तुंंग झेप घेतली. अशात विविध प्रश्नांबाबतच्या जागरुकतेसोबतच वर्ण, जात, धर्मावर आधारित भेदभावही संपुष्टात यायला हवा होता. पण दुर्दैवाने तसे घडले नाही. रंगावरुन शिवीगाळ, चेष्टा करणे, कमी लेखणे हे निंद्य प्रकार या देशात अजूनही घडतात. एखादी व्यक्ती अथवा समूहाला त्याच्या रंगावरून कमी लेखणे चुकीचे आहे, हे येथील लोकांना उमगलेले नाही. सामान्यांचे सोडून द्या; राजकीय नेते सुद्धा अशा टीकाटिप्पणीत मागे नसतात. गोरे किंवा काळे असणे हे आपल्या हातात नाही, हे आम्हाला केव्हा उमगणार? माणसाला माणूस समजण्यातच खरे सौंदर्य आहे. ते प्रत्येकाने जपले पाहिजे.

 

Web Title: Obsession of fairness !

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.