लोकमत दिवाळी उत्सव २०१८; बाबूराव...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2018 01:04 PM2018-11-13T13:04:34+5:302018-11-13T13:05:10+5:30

मा.गों.च्या व्यक्तित्वाचे वेगळे वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी आपल्या संपूर्ण जीवनाची मांडणी संघानुकूल केली आहे. इतकी की, ती काढून टाकली तर त्यांच्या जीवनात सामान्यत्वच ऊरू शकते.

Lokmat Diwali Festival 2018; Baburao ... | लोकमत दिवाळी उत्सव २०१८; बाबूराव...

लोकमत दिवाळी उत्सव २०१८; बाबूराव...

googlenewsNext

ल. त्र्यं. जोशी
नागपूर:
मा.गों.च्या व्यक्तित्वाचे वेगळे वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी आपल्या संपूर्ण जीवनाची मांडणी संघानुकूल केली आहे. इतकी की, ती काढून टाकली तर त्यांच्या जीवनात सामान्यत्वच ऊरू शकते. स्वत:ची नोकरी निश्चित करण्यापासून तर मुलांच्या जीवनाचे नियोजन करण्यापर्यंत त्यांनी कधीही संघ दृष्टिआड होऊ दिला नाही. मुलामुलींच्या लग्नाचे मुहूर्त ठरवितांनाही त्यांनी प्रथम संघातल्या जबाबदारीचा विचार केला व नंतर मुहूर्त ठरविले. अपवाद फक्त एकच. त्यांच्या धाकट्या मुलीचे लग्न झाले तेव्हा ते मिसाबंदी म्हणून नागपूर कारागृहात बंदिस्त होते. पण याचा अर्थ असाही नाही की, त्यांनी मुलांचे स्वातंत्र्य हिरावून घेतले वा त्यांच्यावर जबरदस्ती केली. माणसाने कसे जगावे याचा वस्तुपाठ त्यांनी स्वत:च्या व्यवहारातून दिला. मुलांवर त्यानुसार संस्कार झाले. ते त्यांनी ग्रहण केले.त्यामुळेच त्यांचे ज्येष्ठ सुपुत्र डॉ. मनमोहन संघाचे सहसरकार्यवाह म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत तर राम नावाचे एक सुपुत्र संघाचे कधी अमेरिकेत राहून तर कधी इंग्लंडमध्ये राहून कार्य करणारे संघ प्रचारक बनले आहेत. ज्यांना संघासाठी पूर्णवेळ देता आला नाही तेही संघसंबधित कुठल्या तरी कार्यकलापातच रममाण झाले आहेत. विशेष उल्लेखनीय म्हणजे ते सर्व उच्चविद्याविभूषित आहेत. त्यांना अन्य क्षेत्रात वाव वा रस नव्हता असेही नाही. पण संघानुकूल जीवन जगायचे असे एकदा ठरल्यानंतर त्यांनी आपल्या आयुष्याची मांडणी त्यानुसार केली.त्यामुळे ते आणि संघ यामधील अभिन्नत्वच अधोरेखित होते. मी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे वर्णन करताना म्हणत असतो की, सकृतदर्शनी सामान्य वाटणारे पण मुळात असामान्य असणारे जितके लोक संघात आहेत तितके जगातील कोणत्याही तशा प्रकारच्या संघटनेत नसतील. बऱ्याच लोकांना हे खरे वाटत नाही. पण कुणी संघाचा जेव्हा सखोल अभ्यास करील तेव्हा कुणालाही हे पटल्याशिवाय राहणार नाही. म्हणूनच मागोंच्या जीवनातून संघ वेगळा करता येत नाही आणि संघातून त्यांना वेगळे काढता येत नाही.
याचा एक किस्सा नेहमी सांगितला जातो. संघाच्या बाहेरील एका कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहिले असतांना रीतीनुसार त्यांचा परिचय करुन देण्यात आला. त्यावेळी ते तरुणभारतचे संपादक होते. परिचय करुन देणारे म्हणाले की, मा. गो. वैद्य संघाचे स्वयंसेवक असले तरी अग्रलेखांसहित त्यांचे सर्व लिखाण तटस्थ असते. प्रमुख भाषण सुरु करतानाच मा. गो. म्हणाले, ‘माझा परिचय करुन देणाऱ्यांचा काहिसा गैरसमज झालेला दिसतो. ते म्हणाले मी संघाचा स्वयंसेवक असूनही चांगला पत्रकार आहे असे नाही. मी संघाचा स्वयंसेवक असल्यामुळेच ते म्हणतात तशी पत्रकारिता करु शकतो. त्यांच्या या मार्मिक अभिप्रायावर किती खसखस पिकली असेल याची कुणीही कल्पना करु शकतो.
त्यांच्या निस्पृह पत्रकारितेचे आणखी एक उदाहरण. आपले स्वयंसेवकत्व लपविण्याचा तर त्यांच्या बाबतीत प्रश्नच नव्हता. पण आपल्या विचाराच्या विरोधातील मतांना त्यांनी कधीही तुच्छ मानले नाही. प्रतिपक्षाचे मत खोडून काढतांनाही त्यांनी तर्काला आणि तथ्याला अंतर दिले नाही. उलट इतरांच्या मताकडे आदरानेच पाहण्याची त्यांची संपादकीय दृष्टी होती. त्या काळात श्री. राजाभाऊ पोफळी तभामध्ये कामगार जगत हा साप्ताहिक स्तंभ चालवित असत. पण त्या स्तंभामधून सर्व कामगार संघटनांना न्याय मिळावा असाच राजाभाऊंचा व मा.गों.चाही आग्रह असे. तेवढ्यावरच ते थांबले नाहीत. काही काळ त्यांनी तो स्तंभ एकेक महिन्यासाठी विविध कामगार संघटनांच्या नेत्यांनाही चालवायला दिला. त्यांचे विचार संघाच्या किंवा भारतीय मजदूर संघाच्या विरोधात होते हे माहित असतांनाही तरुणभारतच्या सर्वसमावेशकतेसाठी मा.गोंं.नी असा उपक्रम राबविला. त.भा.मधील अग्रलेखाच्या विरोधातील विचारांनाही स्थान मिळावे म्हणून त्यांनी विचारमंथन नावाचे एक साप्ताहिक सदर सुरु केले होते.
लेखकांबाबतही त्यांची तशीच संपादकीय दृष्टी होती. अन्यथा एकेकाळी कम्युनिस्ट विचाराचे कट्टर पुरस्कर्ते स्व. डॉ. म.गो. बोकरे, देशातील कामगार शिक्षण विषयाचे आद्य पुरस्कर्ते डॉ. म.अ. चान्सरकर, प्राचार्य हरिभाऊ केदार, सर्वोदयी विचाराचे प्रा. सु.श्री. पांढरीपांडे यांच्यासारख्यांच्या वैचारिक लिखाणाला त.भा.मध्ये स्थान मिळूच शकले नसते. ज्येष्ठ भाकपानेते भाई ए.बी. बर्धन यांच्या सभेचे किंवा रिपब्लिकन नेते बॅ. राजाभाऊ खोब्रागडे, रा.सू. गवई, विदर्भवीर जांबुवंतराव धोटे यांच्या सभांचे वृत्त वाचण्यासाठी त.भा.च्या वाचकांना दुसरे वृत्तपत्र घेण्याची गरज भासू नये यावर त्यांचा कटाक्ष असे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या हिंदुत्व या संकल्पनेचे अधिकृत भाष्यकार म्हणून सरसंघचालकांकडेच पाहिले जाते व ते खरेही आहे.म्हणूनच संघाच्या नागपूरच्या विजयादशमी महोत्सवातील त्यांच्या भाषणाचे वृत्तांकन करण्यासाठी देशविदेशातील पत्रकार दरवर्षी नागपूरला येत असतात. त्या भाषणाला राष्ट्रपती किंवा राज्यपालांच्या वर्षारंभी होणाºया अभिभाषणाएवढे महत्व दिले जाते. पण हिंदुत्वाची ती संकल्पना अधिक स्पष्ट करण्यात मा.गों.चेही मोठे योगदान आहे असे मी मानतो. त्यांनी लिहिलेली ‘हिंदुत्व: जुने संदर्भ’, ‘नवे अनुबंध’, ‘हिंदु’, ‘हिंदुत्व’, ‘हिंदु राष्ट्र’, ही पुस्तके त्या संदर्भात लक्षणीय ठरतात. ‘धर्म आणि रिलीजन’ या शब्दांतील फरक स्पष्ट करण्याचे मोठे कार्यही त्यांचेच. त्यांचे म्हणणे असे की, ‘रिलीजन हा धर्माचा पर्यायवाची शब्द नाही. किंबहुना धर्म या शब्दाचे इंग्रजी भाषांतर उपलब्धच नाही’. इझम हा त्यादृष्टीने अतिशय संकुचित शब्द. कम्युनिझम या शब्दाने त्या मर्यादा स्प्ष्ट केल्या आहेत. त्या अर्थाने हिंदु हा धर्मच नाही. ती एक जीवनपध्दती आहे. इस्लाम, ख्रिश्चॅनिटी हे रिलीजन आहेत. त्या अर्थाने त्या उपासनापध्दती आहेत. त्यांच्या हिंदु ही जीवनपध्दती आहे, या भाष्यावर तर सर्वोच्च न्यायालयानेही शिक्कामोर्तब केले आहे. माझे असे मत आहे की, हिंदुत्वाला व्यापक बनविण्यात मा.गों.चे फार मोठे योगदान आहे. यासंदर्भात मला संघाचे तृतीय सरसंघचालक स्व. बाळासाहेब देवरस यांचे कस्तुरचंद पार्कवरील विजयादशमी उत्सवातील भाषण आठवते. त्या भाषणात हिंदुत्वाची संकल्पना स्पष्ट करतांना बाळासाहेबांनी ‘व्यष्टि ते परमेष्टि’ या शब्दांचा वापर केला होता. व्यष्टि म्हणजे एक व्यक्ती, समष्टी म्हणजे समाज, सृष्टी म्हणजे पृथ्वी, आकाश, वायु आणि तेज व सृष्टीतील सर्व जीवजंतू आणि परमेष्टी म्हणजे परमेश्वर या सर्वांना सामावून घेणारे ते हिंदुत्व. सरसंघचालकांचे प्रत्येक भाषण अतिशय विचारपूर्ण पण उत्स्फूर्त असते. पण मला असे वाटते की, बाळासाहेबांनी त्या भाषणाबाबत तरी मा.गों.शी चर्चा केली असावी. पण हा अंदाजच.
मी स्वत:ला खूप भाग्यवान समजतो की, मा.गों.नी माझ्यावर अतिशय लोभ केला. अर्थात कोणत्याही अतिरिक्त सोयीसवलती देऊन नव्हे तर माझ्या अडचणी सोडविण्यासाठी. मी नागपुरात आलो तेव्हा भरतनगरात भाडेकरु म्हणून राहत होतो. नंतर गोकुळपेठेत राहायला आलो. एकदा ते माझ्या त्या घरी आले. परिस्थिती पाहिली आणि मी न म्हणताही माझी नाममात्र भाड्यात बर्डीवर राहण्याची व्यवस्था करुन दिली. दरम्यान मला त.भा.त प्रमुख वार्ताहर म्हणून बढती मिळाली. त्यावेळी माझ्या एका सहकाऱ्याने जातीवरुन त्याच्याशी पक्षपात झाला अशी तक्रार केली होती. मा.गों.नी त्याला एकच प्रश्न विचारला, ‘तू त.भा.त आला तेव्हा तुला जात विचारली होती काय’? त्याचे उत्तर नकारार्थी आले आणि त्याने तक्रार मागे घेतली. मी शपथेवर सांगू शकतो की, मला आजही त्या सहकाऱ्याची जात नेमकी कोणती होती हे सांगता येणार नाही.
माझ्याकडे त.भा.च्या मुख्य संपादकपदाची जबाबदारी आली तेव्हाही काहीसा विवादच झाला. पण मा.गो. माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. मी आजही स्वत:ला विद्वान मानू शकत नाही. त्यावेळी तो प्रश्नच नव्हता. फक्त मी चार सहकाºयांना सोबत घेऊन चालू शकतो असे त्यांना त्यावेळी वाटले असावे. म्हणून त्यांनी त.भा.च्या संपादकपदाची जबाबदारी माझ्यावर सोपविली असावी. अन्यथा पाथर्डीसारख्या अकोला जिल्ह्यातील एका खेड्यातून भिक्षुकाच्या घरात जन्माला आलेल्या माझ्यासारख्याची ते स्वप्न पाहण्याचीही प्राज्ञा नव्हती. त.भा.चे संपादकपद तर फार पुढची गोष्ट. एकवेळ निर्णय घेतला की, कोणत्याही दबावाखाली त्यात बदल करणे हे त्यांच्या हिशेबात बसतच नाही. कारण निर्णय सर्व विचार करुन घेतलेला असतो. मनोरमा कांबळे बलात्कार व खून प्रकरणी उच्च न्यायालयाने मला न्यायालय उठेपर्यंत शिक्षा दिली तेव्हा आमदार प्रा. जोगेंद्र कवाडे सर यांच्यासोबत श्रीनरकेसरी प्रकाशनचे अध्यक्ष या नात्याने मा.गो. माझे स्वागत करण्यासाठी उच्च न्यायालयाच्या प्रवेशद्वारावर आले होते हे मला आजही आठवते. (लोकमत दिवाळी उत्सव २०१८ या अंकातील व्यक्तिरेखा या सदरात प्रसिद्ध झालेला लेख. संपूर्ण लेख या अंकात वाचता येऊ शकेल.)

Web Title: Lokmat Diwali Festival 2018; Baburao ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Diwaliदिवाळी