लोकमत दिवाळी उत्सव २०१८; तू खरंच नाहीयेस, कविता?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2018 11:33 AM2018-11-13T11:33:00+5:302018-11-13T11:34:17+5:30

कविता आणि मी आमने सामने बसून इंग्लिश भाषेच्या वाचकांना तिची ओळख व्हावी म्हणून २-३ दिवस एक संवाद तयार करत होतो. दोघी बेहिशोबी त्यामुळे शिस्तशीर चालणाऱ्या संवादापेक्षा उलगडत जाणारी कविता मला जास्त भावत गेली.

Lokmat Diwali Ank 2018; You are not really, Kavita? | लोकमत दिवाळी उत्सव २०१८; तू खरंच नाहीयेस, कविता?

लोकमत दिवाळी उत्सव २०१८; तू खरंच नाहीयेस, कविता?

googlenewsNext

अरुंधती देवस्थळे
नागपूर:
चा र पाच वर्षापूर्वी कविता महाजन आणि मी आमने सामने बसून इंग्लिश भाषेच्या वाचकांना तिची ओळख व्हावी म्हणून २-३ दिवस एक संवाद तयार करत होतो पर विषयांची सरमिसळ होऊन तो बाजूला राहिला. दोघी बेहिशोबी त्यामुळे शिस्तशीर लायनीने चालणाऱ्या संवादापेक्षा उलगडत जाणारी कविता मला जास्त भावत गेली. विषयांतर होतंय हे कळत असूनही मला तिची गाडी मूळ मुद्यावर सारखी-सारखी आणवत नसे. ‘तुझ्या लेखनालाच काय, संवादालासुद्धा एका संपादकाची गरज आहे... किती फापटपसारा घालतेस ... ‘असं मी कधी हसत, कधी दटावत म्हणत असे. तिचं म्हणणं असायचं कि ‘मी नेहेमी अशीच लिहिते- बोलते गं, डोक्यातलं सगळं भडाभडा कागदावर उतरवून नंतर मग त्यातली फलफट काढून टाकते. काटछाट करत गेलेला अंतिम मसुदा मूळ लिहिलेल्याच्या ६०% उरतो’ हे तिच्या अमाप मानसिक ऊर्जेमुळे होत असायचं याची जाणीव तिलाही होतीच. पण आमच्या दोघीतल्या संवादाची त्यावेळी तिला जास्त गरज होती. त्यामुळे मग आम्ही तो प्रयत्न सोडून दिला. नुकतीच ती ठकीमधून मोकळी झाली होती, तिला ते मोकळेपण एन्जॉय करायचं होतं आणि माझा असा काही तिच्याबाबतीत आग्रह नव्हता. शेवटी ती म्हणाली होती, ‘संवाद सोड त्यापेक्षा तू आता माझ्यावर लेखच लिही’ तो लेख असा लिहायची वेळ यावी हे दुर्दैव! तिला फरक पडणार नव्हताच तेव्हा आणि आताही, माझ्यावर कोणकोण काय लिहितंय हे ती नेहमीप्रमाणे जिथे कुठे असेल तिथून खुदुखुदू हसत बघत बसलेली असणार!!
एक व्यक्ती म्हणून मला तिच्यातल्या अनेक गोष्टी आवडायच्या आणि एक सर्जनशील मन म्हणून तिचं अपार कौतुक वाटायचं. मनात कल्पनांचा कल्पवृक्ष होता कायम लदबदलेला, त्या फक्त एका हाताने कागदावर उतरवणं तिला झपाटून टाकणारं असायचं. अनेकदा त्या हाताला, भरभरून धावणाऱ्या विचारशक्तीचं उधाण झेपणारं नसावं. जर तिला सुचणारं सगळं ती कागदापर्यंत पोहोचवू शकली असती तर तिचं लिखाण महाश्वेतादेवींसारख्या बहुमुखी, बहुप्रसवा लेखिकेच्या पंगतीत नेऊन बसवणारं ठरलं असतं. त्यांच्यासारखं दीर्घायुष्य तिला लाभलं असतं तर ते शक्य होतं. एकावेळी तिच्या मनात एखाद्या कादंबरीचा ऐवज, चार सहा कविता, दोघंतिघांचे अनुवाद, लहान मुलींसाठीचे प्रकल्प, ब्लॉगचा आराखडा सुखेनैव नांदत असत. त्यातलं काही कागदावर उतरतांना, आणखी नवं काहीतरी सुचत असे. इतकं सुपीक मन त्या कुडीला कसं झेपत होतं कुणास ठाऊक!! मग एका कागदावर प्रायोरिटी लिस्ट बनवून, काय पहिल्यांदा हाती घ्यावं हे कसब मात्र तिने प्रयत्नपूर्वक शोधून काढलं असावं. इथे ठकीचा फायनल ड्राफ्ट, सुचवलेले मोठे वेळखाऊ बदल करून बनवता-बनवता, तिने दोन तीन लहान मुलांच्या गोष्टी लिहून काढल्या होत्या आणि किती तरी मुलांसाठीची पुस्तकं वाचून काढली होती. रोज सकाळी उठायची तर कालचं ठरवलेलं आणि त्याच्या जोडीला नवं काही, आणून दाखवायची. मला माझ्या वाचनाच्या वेगाबद्दल असलेले भ्रम तिने मस्तपैकी माझ्या पदरात घातले. तिचं रात्री उशिरापर्यंत एकटाकी लिहिणं आणि मी माझी शीतलाची कामं, प्रकाशनाचं काहीबाही आणि संसार सांभाळून ते वाचून काढणं हे एक व्यस्त समीकरण होतं. अपेक्षित वेळेत मी वाचू शकले नाही की ती खरीखुरी फुरंगटून बसायची. पण वाचून तिला ग्राह्य वाटणारं काही सुचवलं की लगेच परत फुलून यायची. एक लेखिका म्हणून तिचा मला लोभावणारा स्वभाव म्हणजे अगदी प्रामाणिकपणे आपल्या कक्षा रूंदावण्याची उत्सुकता. मी मला आवडणाऱ्या विश्वसाहित्याबद्दल भरभरून बोलत असे. नादिया गोर्डिमर, सारामागो, चिमामांडा, झेडी स्मिथ, कृष्णा सोबती, कुर्रतुलाइन हैदर, निर्मल वर्मा सारखे वेगवेगळे लेखक आणि त्यांचा पटाची जाणवणारी रूंदी आणि खोली तिच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असे. मराठी साहित्य फक्त इंग्लिशमधील अनुवादाअभावी विश्व पातळीपर्यंत दखलप्राप्त ठरत नाही हे तेवढेसे खरे नाही. मराठी लेखकांनी, मराठी लोकांसाठी लिहिलेलं, आणि त्यामुळे सीमित अनुभूतींच्या कंफोर्ट झोनमध्ये रमणारं मराठी लेखन, तुलनेत कसदार वाटत नाही. जगातले काही नावाजलेले ‘आपुल्या जातीचे’ वाटणारे समकालीन लेखक वाचून त्यांना त्यांच्या सांस्कृतिक आणि वैचारिक कोंदणासकट जाणण्याचा प्रयत्न केला, तरी मांडला जाणारा पट, गुणवत्तेचं परिमाण उंचावता येईल आणि पाश्चात्य वाचक-समीक्षकांशी संवाद साधता येईल हा आग्रह तिलाही पटला होता. ‘वाचकाला ग्रेस वा नेरूदा समजत नसेल, तर त्याने वाचूच नये का? किंवा अमुक एक लेखक दर्जेदार लिहू शकत नसेल, हे त्याला मनोमन माहीतही असेल, त्याचं इतर आंतरराष्ट्रीय भाषांतील वाचन नसेलही तर स्वत:ला अवगत भाषेत लिहूच नये का?’ असा तिचा प्रतिवाद बरोबरच होता. ‘मग अशांनी आपल्या कक्षांतच स्वान्तसुखाय फिरत रहावं, आपल्या मर्यादांसहित आपण मोठ्या कॅनव्हासवर काम करणाºया, चोखंदळ समीक्षकांपर्यंत पोहोचू अशी अपेक्षा ठेवू नये. प्रत्येक मार्केटच्या काही मागण्या, निर्णायक मापदंड असतात ते कुठल्याही खेळाच्या नियमांइतकेच निर्मम असतात. त्या रिंगणात उतरायचं असेल तर ते आत्मसात करायलाच हवेत.....’ असं मी तळमळीपोटी फटकन बोलून जायची. पण ती त्याच्यावर विचार करायची. तिने एक स्वत:साठी एक रीडिंग लिस्टही करून घेतली होती. एखाद दुसरं माझ्याकडून नेऊन बाकी स्वत: मिळवीन असं ही हट्टाने म्हणाली होती. ती एक प्रतिथयश लेखिका होती आणि मी कोणीच नव्हते, पण तरी तिने माझं म्हणणं कधी उडवून लावलं नाही. मला तिचा ‘मर्यादित पुरुषोत्तम’ हा शब्द प्रयोग खूप आवडला होता तो दुसऱ्या कोणीतरी कॉइन केल्याचं तिने प्रांजळपणे सांगून टाकलं होतं. तिचा निखळ प्रामाणिकपणा आणि आख्ख्या हळकुंडानेही पिवळं न होणं पण मला मोलाचं वाटायचं.’ ‘पुरस्कार देणाऱ्यांमध्ये बरेचदा गुणवत्तेचं मूल्यमापन करण्याचा वकूब सोडच, पण निवडलेलं पुस्तक समारोहाआधी वाचण्याचं सौजन्य नसतं. तुम्ही संघर्षशील लेखिका म्हणून तुम्हाला थोडंफार उत्तेजन देतोय असा दंभही असतो. त्यामुळे मला पुरस्कार चढत नाहीत.’ असं ती खदखदून हसत सांगायची.
मी तिला आग्रहाने वेगवेगळ्या देशातून आम्ही मुद्दाम हिंदीत आणलेली चित्र-पुस्तकं वेळोवेळी दाखवली. ती रोज ४-५ पुस्तकं वाचून काढायची. प्रगत देशातलं बालवाङमय आणि त्यात पाहायला मिळणारा सर्जनाचा वैविध्यपूर्ण जल्लोष तिच्याबरोबर वाटून घ्यायचा होता. पाहून ती हरखली होती. आपल्या देशात असे प्रयोग का होत नाहीत अशी तिला खंत वाटायची. ही कोंडी कोणीतरी फोडायला हवी आहे, ह्यावर दुमत नव्हतं. पण त्यानंतर एक लेखक आणि एक संपादक/ प्रकाशक म्हणून आम्ही एकमेकींना आणखी चांगल्या समजलो, हे आमच्यातल्या मैत्रीसाठी आवश्यक होतं आम्हा दोघीत एक नि:शब्द understanding आलं. माझी जगातलं उत्तम ते आपल्या मुलांसाठी आणण्याची धडपड तिच्या लक्षात आली असावी. मी परदेशी लेखक, चित्रकारांबरोबर जास्त काम का करते? ह्याचं स्पष्टीकरण मला नंतर कविताला कधीही द्यावं लागलं नाही.
तिच्या लेखनात मला सगळ्यात आवडायच्या त्या तिच्या कविता, त्यातून तिच्यातल्या पेंटरची झलकही पाहायला मिळायची. तिच्या नावाला सार्थ करणाऱ्या कविता!!! तिच्या काही सुंदर अप्रसिद्ध कविता वाचण्याचा आनंद माझ्या वाट्याला आला होता. कधी-कधी तिने पुस्तक पाठवून मी बराच काळ गप्प बसत असे. जसं ‘समुद्रच आहे एक विशाल जाळं जाळं ही दीर्घ कविता तिच्यालेखी एक नवा प्रयोग होता. माझी उदंड माया होती तिच्यावर, तिला माहित होतं ते. तिच्याशी खोटं बोलणं शक्य नसायचं. पण ती टाळाटाळ चालू द्यायची नाही थेट फोनच करायची. मग मी म्हटलं होतं, ‘हे शीर्षक सपक वाटतंय.... मला हे फसलेलं रूपक वाटातंय चित्र सुंदर असूनही, आता श्वेतश्यामल छपाईत ती निष्प्रभ वाटताहेत. तू हा हट्ट नेमका कशासाठी धरलास?’ तर ती मोठ्याने हसून म्हणाली होती, ‘अगं पण गणेशला आवडलीये! म्हणूनच तर आम्ही हा नवीन प्रयोग करायचा ठरवला.’ मग मी विचारायचं, ‘अं.... अं... पण हा जो एन्ड रिझल्ट आहे तो तुला आवडलाय का?’ मी आपली एकेक शब्द शोधून बोलतेय आणि ही तिकडे खळखळून हसतेय! मग मी परत मनापासून म्हणायचं, ‘तुझं सगळंच लिखाण माझ्यापर्यंत पोहोचेल असं नाही, तू नको ना माझ्या मताचा आग्रह धरू.’ मग तिने परत गडगडत म्हणावं, ‘मी कुठे तुला १ी५्री६ लिहायला सांगतेय? तुझं मत माझ्यासाठी महत्त्वाचं आहे’. आता इथे आणखी काय सांगू? अपना थट्टी इयर्स का एक्सपीरीयन्स है, यारों! आपल्या देशात कित्येक लेखक वैयक्तिक टीका झेलू शकतात पण त्यांच्या लिखाणाबद्दल कमालीचे हळवे असतात. कुठल्याही लेखकाचं प्रत्येक पुस्तक आवडेल असं नव्हे, हे साधं सत्य त्यांना स्विकारता येत नाही कारण आपल्या लिखाणातून स्वत:ला वजा करून पाहण्याची दृष्टी त्यांच्याकडे नसते. त्यामुळे प्रतिकूल मत देणे म्हणजे एरवी बरंच काही तंतोतंत जुळणाऱ्या मैत्रीचा जीव धोक्यात टाकणं. कविताच्या बाबतीत अशी भीती मला कधी वाटली नाही, हे तिच्या मनाचं मोठेपण म्हणून आमची मैत्री सोलह आने सच्ची राहिली.

Web Title: Lokmat Diwali Ank 2018; You are not really, Kavita?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Diwaliदिवाळी