राजियांचा राजगड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2017 01:10 AM2017-09-03T01:10:34+5:302017-09-03T01:10:54+5:30

राजगडावर जाण्यासाठी पाली दरवाजा, अळू दरवाजा, गुंजवणे दरवाजा आणि चोर दरवाजा या मार्गाने जाता येते. चोर दरवाजामार्गे जाताना पुणे-राजगड एसटी पकडून वाजेघर गावात उतरायचे.

Rajgiri Rajgad | राजियांचा राजगड

राजियांचा राजगड

googlenewsNext

- गौरव भांदिर्गे

किल्ल्यावर पोहोचण्याच्या वाटा
राजगडावर जाण्यासाठी पाली दरवाजा, अळू दरवाजा, गुंजवणे दरवाजा आणि चोर दरवाजा या मार्गाने जाता येते. चोर दरवाजामार्गे जाताना पुणे-राजगड एसटी पकडून वाजेघर गावात उतरायचे. तेथून बाबुदा झापापासून एक तासाच्या अंतरावर रेलिंग आहेत. त्यावरून, राजगडावर जाण्यास ३ तास लागतात, तर पाली दरवाजामार्गे जाताना पुणे-वेल्हे एसटीने वेल्हेमार्गे पाबे या गावी उतरून, कानद नदी पार करून पाली दरवाजा गाठावा. ही वाट पायºयाची असून, गडावर जाण्यास ३ तास लागतात. तर गुंजवणे दरवाजामार्गे जाताना पुणे - वेल्हे या हमरस्त्यावरील मार्गासनी गावात उतरून, तिथून साखरमार्गे गुंजवणे या गावात जाता येते. ही वाट अवघड असूून, अडीच तास लागतात, तर अळू दरवाजा मार्गे जाताना भुतोंडे मार्गे आळू दरवाजाने राजगड गाठता येतो. शिवथर घळीतून ही अळू दरवाज्याने राजगड गाठता येतो. चोर दरवाजामार्गे गुंजवणे गावातून एक वाट सुवेळा माचीवर येते.

इतिहास
- सातवाहनपूर्व म्हणजे साधारण २००० वर्षा पूर्वी पासूनचा हा डोंगर ज्ञात आहे. ब्रम्हर्षी ऋषींचे येथे असणारे वास्तव्य व याच ब्रम्हर्षी ऋषींच्या नावावरुन येथे स्थापन झालेले श्री ब्रह्मर्षी देवस्थान यावरुन डोंगर फार पुरातन असावा. राजगडाचे पूवीर्चे नाव 'मुरंबदेव'. हा किल्ला सुरुवातीला बहामनी नंतर इ.स. १४९० मध्ये निजामशाहीत व नंतर इ.स. १६२५ मध्ये अदिलशाही कडे गेला .इ.स.१६३० च्या सुमारास हा किल्ला अदिलशहा कडून परत निजामशाहीत दाखल झाला. इ.स.१६४६ ते १६४७ च्या सुमारास शिवरायांनी तोरणा किल्ल्यासोबत हा किल्ला जिंकून घेतला. किल्ला बांधण्याचे काम महाराजांनी झपाट्याने सुरु केले. इ.स.१६६० मध्ये औरंगजेबाच्या आज्ञेनुसार शाहिस्तेखानाने शिवाजी महाराजांच्या प्रदेशावर स्वारी केली. ६ एप्रिल १६६३ रोजी शाहीस्तेखानावर छापा घालून शिवाजी महाराज राजगडावर परतले.
- ३० एप्रिल १६६५ रोजी मुगल सैन्याने राजगडावर चाल केली, परंतु मराठ्यांनी वरून मारा केल्यामुळे मुगलांना माघार घ्यावी लागली.शिवाजी महाराजांनी जयसिंगबरोबर तह करताना २३ किल्ले देण्याचे मान्य केले व स्वत:कडे १२ किल्ले ठेवले. या १२ किल्ल्यांमध्ये राजगड, तोरणा, लिंगाणा, रायगड यांचा समावेश होता. शिवाजी महाराज आग्राह्यून निसटून निवडक लोकांनिशी १२ सप्टेंबर १६६६ ला राजगडाला सुखरुप पोहोचले. २४ फेब्रुवारी १६७० रोजी राजगडावर राजारामचा जन्म झाला. सिंहगड किल्ला घेण्यासाठी शिवाजी महाराजांनी तानाजी मालुसुरे यास राजगडावरुनच १६७० मध्ये पाठविले. इ.स.१६७१- १६७२ मध्ये शिवाजी महाराजांनी रायगड स्थान राजधानी साठी निश्चित केले आणि राजधानी राजगडावरुन रायगडाकडे हलविली. ४ फेब्रुवारी १७०३ रोजी राजगड औरंगजेबाच्या हातात पडला. इरादतखान याला औरंगजेबाने किल्लेदार नेमले आणि किल्ल्याचे नाव ह्यनाबिशहागडह्य असे ठेवले.२९ मे १७०७ रोजी गुणाजी सावंत याने पंताजी शिवदेवा बरोबर राजगडावर स्वारी करुन तो किल्ला जिंकून घेतला आणि पुन्हा किल्ला मराठयांच्या ताब्यात आला. यानंतर राजगड भोर संस्थानाच्या ताब्यात गेला.

गडदर्शन
- चोर दरवाजाकडून आपण पद्मावती माचीवर येतो. राजगडाला एकूण ३ माच्या आहेत. यापैंकी सर्वात प्रशस्त पद्मावती माची. माचीवर बांधकामाचे अनेक अवशेष सापडतात. पद्मावती देवीचे मंदिर आहे. मंदिराच्या बाजूसच पाण्याचे टाके आहे. पद्मावती तलाव आहे. पद्मावती देवीच्या मंदिरा समोरच पूर्वाभिमुख असे रामेश्वर मंदिर आहे.शिवाय सईबाईंची समाधी, राजवाड्याचे काही अवशेष दिसतात. रत्नशाला, सदर, चोर दरवाजा, पाली दरवाजाही आहे. या दरवाजाचे वैशिष्ट््य म्हणजे दरवाजाच्या वर आणि बुरुजावर परकोट बांधलेले आहेत. गुंजवणे दरवाजाच्या शेवटी व गणेश पट्टीच्या खाली दोन्हीकडे दोन उपडे घट घेतलेल्या व एका कमलकलिकेसमोर असलेल्या सोंडा आहेत. प्रवेशद्वाराच्या आत पहारेकºयांच्या देवड्या आहेत. दारुगोळ्याची कोठारे या वास्तू व काही वास्तूंचे अवशेष आजही शिल्लक आहेत
- हे सर्व पाहून आपण सुवेळा माचीवर जायचे.या मागार्ने जाताना टेकडी सारखा भाग आहे याला 'डुबा' असे म्हणतात. तेथे डाव्या हातास एक दक्षिणमुखी वीर मारुती व त्याच्या जवळ पाण्याचे टाक आहे. येथे असणारे चौथरे म्हणजे एके काळी येसाजी कंक, तानाजी मालसुरे व शिलींबकर या सरदारांची घरे होती. येथून थोडी वाट वाकडी करून काळेश्वरी बुरुजाकडे जावे येथे शिवलिंग, भग्न नंदी, एक यक्षमूर्ती अशी शिल्पे आढळतात. येथील तटबंदी दोन टप्प्यांत विभागली असून प्रत्येक टप्प्याच्या शेवटी चिलखती बुरुज आहे. दुसºया टप्प्यात गेल्यावर तटबंदीच्या दोन्ही बाजूस आतील अंगास भुयारी चिलखती परकोटाची रचना केलेली आहे. येथे जातांना एक उंच खडक लागतो आणि या खडकात ३ मीटर व्यासाचे एक छिद्र आढळते. या खडकालाच नेढे असे म्हणतात. पुढे गेल्यावर एका तटात श्रीगणेशाची मूर्ती दिसते. एका सु-वेळी प्रत्यक्ष शिवाजी महाराजांनी या गणपतीची स्थापना केली. म्हणून या माचीचे नाव सुवेळा माची ठेवण्यात आलं.
- सुवेळा माचीच्या सर्वात शेवटच्या टप्प्यात खालच्या भागात वाघजाईचे शिल्प आहे. येथून परत आल्या वाटेने सदरे कडे यावे. येथून दोन वाटा फुटतात .डाव्या बाजूची वाट संजीवनी माचीकडे जाते तर सरळ बालेकिल्ल्याकडे जाते. आपण बालेकिल्ल्यावर जायचे.राजगडाच्या सर्वात उंच भाग म्हणजे बालेकिल्ला होय. या बालेकिल्ल्याकडे जाणारा रस्ता कठीण आणि अरुंद आहे. चढण संपल्यानंतर बालेकिल्ल्याचा महादरवाजा लागतो. प्रवेशद्वाराची उंची ६ मीटर असून प्रवेशद्वारावर कमळ, स्वस्तिक ही शुभचिन्ह कोरलेली आहेत. बालेकिल्ल्याला साधारण १५ मीटर उंचीची तटबंदी बांधलेली असून विशिष्ट अंतरावर बुरुजही आहेत. दरवाजातून आत गेल्यावर समोरच जननीमंदिर,चंद्रतळे आहे. तळ्याच्या समोरच उत्तरबुरुच आहे या उत्तर बुरुजाच्या बाजुला ब्रम्हर्षी ऋषींचे मंदिर आहे. या शिवाय बालेकिल्ल्यावर काही भग्न अवस्थेतील इमारती चौथरे, वाड्यांचे अवशेष आढळतात.

-राजगड किल्ला संपूर्ण पाहण्यासाठी साधारण २ दिवस लागतात. गडावरुन तोरणा, प्रतापगड, रायगड, लिगांणा, सिंहगड, पुरंदर, वज्रगड, मल्हारगड, रोहीडा, रायरेश्वर आणि लोहगड, विसापूर हे किल्ले दिसतात.

Web Title: Rajgiri Rajgad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.