गुलामबाईच्या चतुर मालकाची कविता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2017 02:39 PM2017-08-27T14:39:44+5:302017-08-27T14:40:05+5:30

रसगंध : कविता महाजन या कवयित्रीची ‘मालक’ नसलेल्या आणि असलेल्या बायकांबद्दल ही उपरोधिक शैलीतील झणझणीत टोलेबाजी आहे. आपलं जगणं आणि लिहिणं यात अंतर न ठेवल्यामुळे अनेक बºया-वाईट अनुभवांना सामोरं जात, ते पचवत रोखठोकपणे मांडणाºया लेखनीची धार पाहून अनेकांची बोलती बंद झाली. त्यांच्या ‘ब्र’, ‘भिन्न’ आणि ‘मर्यादित पुरुषोत्तम’ या अतिशय वेगळ्या विषयावरच्या कांदबºयांची मराठी साहित्यात बरीच चर्चा झाली, तर धुळीचा आवाज, तत्पुरुष, मृगजळीचा मासा या कवितासंग्रहातून प्रसिद्ध झालेल्या कवितांमुळे महत्त्वाची कवयित्री म्हणून त्यांची नोंद घेतली जाते.

Poem of slavery | गुलामबाईच्या चतुर मालकाची कविता

गुलामबाईच्या चतुर मालकाची कविता

Next

- डॉ. संजीवनी तडेगावकर

उदात्तीकरणाच्या नावाखाली लेखकांनी, कवींनी त्यांना अपेक्षित असलेलं ‘बाईचं’ आपल्या साहित्यातून रेखाटलेलं विलोभनीय रूप वास्तवात भ्रमाचे भोपळे फोडणारं आहे. वरवर दिसणाºया नात्यातील गोजिरवाण्या रूपाआड तिचं लाचार, दुबळं, प्रामाणिक गुलामाचं केविलवाणं अगतिक रूप जाणवतं, जे की, प्रचंड करुण आहे. वर्षानुवर्षांच्या या (गुलाम) मानसिकतेची सवय अंगवळणी पडल्यामुळं त्याचं गांभीर्य कुणाला टोचत नाही. महत्त्वाचा प्रश्न म्हणून त्याकडे कुणी पाहत नाही. बाईचं गुलाम असणं हे सर्वांनीच (बाईनंही) गृहीत धरून चालल्याने त्यात कुणालाच काही वावगं वाटत नाही. यावरच निरीक्षणात्मक चिंतन नोंदवताना कविता महाजन लिहितात :

‘तिनं त्यांना हाक मारली,

‘मालक’ म्हणून त्यांनीही ओ दिली नकळत करारी चेह-यानं,

आणि निर्माण झालं नातं,

पुष्कळ गोष्टी गृहीत धरून.’

चांगल्या-वाईट प्रथा कशा निर्माण होतात? आणि समाजमनाला त्या चामडीसारख्या कशा चिकटून राहतात? कायमच्या. याचं हे जिवंत उदाहरण आहे. परवा एका गावात ब-याच बायका एकत्र जमलेल्या होत्या. थोड्या गप्पा मारू म्हणून मीही त्यांच्यात जाऊन बसले. थोड्या वेळानं गणपतीची वर्गणी मागणा-या मुलांचा घोळका तिथं आला. खूपंच आग्रह झाल्यामुळे घरवालीनं थोड्या नाराजीनंच वाचवून ठेवलेले स्वत:जवळचे २०० रुपये त्या मुलांना देण्यासाठी जवळच्या बाईजवळ दिले. त्या बाईने अगदी सहजतेने ते पैसे मुलांना देताना बाईऐवजी तिच्या ‘मालकाचं’ नाव लिहा असं सांगितलं. तिथं उपस्थित असणा-यांपैकी कुणालाच काही वाटलं नाही. माझ्या मनात उठलेली ‘कळ’ मात्र थेट मेंदूत जाऊन पोहोचली. आपलं गुलामपण मोठ्या प्रतिष्ठेनं मिरवणा-या बायका पाहिल्या की, खूप उदास वाटू लागतं. स्त्रियांना ‘माणूस’ म्हणून सन्मानानं जगता यावं, यासाठी खर्ची गेलेल्यांच्या कष्टाबद्दल मनात गहिवर दाटून येतो. आजच्या २१ व्या शतकातही कुणी तरी आपलं ‘मालक’ आहे याचं कौतुक असणा-या या बायकांबद्दल कवयित्री लिहिते, 

‘मालक नसलेल्या बाईचा 
सूक्ष्म हेवा करीत असतात; 
मालक असलेल्या बायका
तिच्याभोवती पिंजरा नसल्याच्या 
भयानं त्यांची छाती 
धाकधुक करीत असते’.

मालकाशिवायचं आयुष्य स्त्रियांना (बहुसंख्य) असुरक्षित, कठीण वाटतं. दैनंदिन व्यवहारासाठी, नोकरी, व्यवसायाच्या निमित्ताने जेव्हा तरुण लग्न न झालेल्या किंवा विधवा स्त्रिया घराबाहेर पडतात तेव्हा पुरुषी वाईट नजरेतून वाचण्यासाठी मंगळसूत्र, जोडवी, कुंकू (टिकली) या कुणाची तरी मालकीहक्क दर्शविणा-या वस्तूंचा आश्रय घेताना दिसतात. कारण कुणाच्याच मालकीची नसलेली बाई पाहवत नाही कोणत्याच मालकाला
वस्तू आहे,  तिचा वापर व्हायला हवा पडून गंजून सडून कुजून वाया जायची...मग हळूहळू सगळ्यांची मते एकत्रित येतात- एकसारखीच. आणि मालक नसलेल्या बाईवर शिक्कामोर्तब केले जाते सार्वजनिक मालमत्ता म्हणून...! कधी कधी वीट येतो बाईला, नको, असतं, प्रेमाचं असलं तरी सतत देखरेखी नजरेसमोर जगणं. मर्जीनुसार दोन मोकळे श्वास घ्यावेसे वाटतात.

एखादेवेळी कंटाळ येतो/

रोजच्या साध्यासुध्या कामाचा/

तेव्हा बाईला वाटतं /

आपल्याला ही हवी होती एक बायको/

गुलामांना बाळगता येतात का पदरी गुलाम?

पुरुषी बेरकीपणाचं इंगित कळाल्यावर जाणिवा जाग्या असलेल्या एखादीच्या मनात असे प्रश्न निर्माण होतात, जेव्हा ती नाकारते निर्धाराने कुणाचे स्वत:वरील मालकीहक्क तेव्हा;‘धास्तावलेले मालक घुटमळत रेंगाळतात घरातच, चोरट्यासारखं फिरत राहतात, मग चवताळतात एकाएकी घर डोक्यावर घेतात चढ्या आवाजानं, समजूतदार मौनी डोळ्यावर, बसवतात आपल्या नजरेची जरब.’

पायाखालची वाळू सरकताना तितीर -बितीर होणाºया सत्ताधीश मनोवृत्तीच्या लोकांना नको असतात कुठले बदल. स्वत: बाहेर येऊन इतरांकडे पाहण्याची कुवत नसते त्यांची. बाईचं अवघं आयुष्य गृहीत धरण्याची सवय अंगवळणी पडलेल्या कुटुंबात, समाजात तिचा अजूनही एक स्वतंत्र व्यक्ती म्हणून विचार आणि स्वीकार होताना दिसत नाही. तो व्हावा म्हणून अनेकांना या बाईपणाच्या भोगवट्यातून बाहेर पडण्यासाठी संघर्ष करावा लागतो. त्या संघर्षाची तीव्रता त्या त्या भौगोलिक, सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक मानसिकतेवर अवलंबून असते. भांडवलशाही, हुकूमशाहीच्या विरोधात जगभर वेळोवेळी लढे उभे राहिले. गुलामीच्या परंपरेत बाई हे अगदी तळाच नाव.

गुलामाची गुलाम... शारीरिक,  भावनिक, मानसिक, आर्थिकरीत्या वेठीस धरलेल्या कोंडीत अडकलेल्या या स्त्रियांच्या नशिबी कायम अवहेलना आणि संशय वाट्याला येतो. त्यामुळे तिचं तिच्या स्वप्नांचं अलवार फुलणं पार कोमेजून जातं. या मानसिकतेला केंद्रीभूत ठेवून लिहिणाºयांपैकी कविता महाजन या आजच्या आघाडीच्या लेखिका... कविता लिहिणं म्हणजेच जिवंत राहण्याचा मार्ग समजणाºयांपैकी एक. बाईपणातून माणूसपणात प्रवेश करताना होणाºया झटापटीची कविता त्यांनी लिहिली. त्यामुळे तडफड... राग... कधी संयत तर कधी आक्रमक स्वरात प्रकटला; पण त्या भावना त्या त्या वेळी तितक्याच प्रामाणिक आणि नैसर्गिक वाटतात. कुणाला आक्रसताळ्या वाटल्या तरी! झापडं बांधून मुकाट्यानं जगणाºया बायकांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणारी आणि मूग गिळून उघड्या डोळ्यांनी नुस्ता तमाशा पाहणाºया समाजाला दोन खडे बोल सुनावणारी खणखणीत आत्मभानाची कविता म्हणूनच इतरांहून वेगळी आहे.

(लेखिका जालना येथील प्रसिध्द कवयित्री आहेत.)

Web Title: Poem of slavery

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.