उल्कावर्षावाची पर्वणी : 13 डिसेंबर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2018 01:15 PM2018-12-12T13:15:20+5:302018-12-12T13:32:22+5:30

आकाशातला एक छोटा कण किंवा दगड असतो कि जो पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाने वातावरणात वेगाने घुसतो आणि पेट घेतो त्यालाच आपण उल्का असे म्हणतो.

Meteorological climate: 13th December | उल्कावर्षावाची पर्वणी : 13 डिसेंबर

उल्कावर्षावाची पर्वणी : 13 डिसेंबर

googlenewsNext
ठळक मुद्दे१३ डिसेंबरच्या उल्कावर्षावाचे महत्वउल्कापाताची कारणे:खगोल प्रेमींसाठी खूप मोठी पर्वणी

रात्रीच्या वेळी कधी कधी निरभ्र आकाशातून अचानक प्रकाशमान गोल क्षणार्धात चमकून गेल्याचा दिसतो. काहीजण त्याला तुटलेला तारा असे म्हणतात. हे दृश्य इतकं सुंदर असतं कि पाहणारा मोहून जातो. काही जण डोळे बंद करून मनातील एखादी इच्छा प्रकट करतात. त्यांची अशी समजूत असते कि हा तुटलेला तर इच्छा पूर्ण करतो. वस्तुतः तो तुटलेला तारा नसून आकाशातला एक छोटा कण किंवा दगड असतो कि जो पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाने वातावरणात वेगाने घुसतो आणि पेट घेतो त्यालाच आपण उल्का असे म्हणतो.

उल्कावर्षाव म्हणजे काय?

काही ठराविक वेळी अश्या असंख्य उल्का एकाच वेळी आकाशाच्या एखाद्या ठराविक जागेतून कोसळताना दिसतात आणि त्याला आपण उल्कावर्षाव किंवा उल्कापात असे म्हणतो.

उल्कापाताची कारणे:

उल्कापात हा प्रामुख्याने अवकाशीय कचरा (cosmic debris) मुळे होतो. यात अवकाशातील धूळ, दगड, अनेक छोट्या अ-ग्रहीय वस्तू, स्फोट झालेल्या लघुग्रहाचे तुकडे इत्यादींचा समावेश होतो. धूमकेतूने त्याच्या मार्गात मागे सोडलेला अवकाशीय कचरा हे उल्कापाताचे मुख्य कारण आहे.

अतिशय वेगाने सूर्याभोवती फिरणारे धूमकेतू जेंव्हा सूर्याच्या जवळ येतात तेंव्हा त्यांच्या शेपटीतील बर्फाचे कण वितळतात आणि त्यात अडकलेले धुलीकण आणि लहान दगड मोकळे होतात. हे मोकळे झालेले धुलीकण त्या धुमकेतूच्या मार्गात तसेच पडून राहतात. म्हणजेच सूर्यमालेत जेवढे धूमकेतूचे मार्ग आहेत ते सगळे अश्या दगडांनी आणि धुळीने भरून गेलेले आहेत. यातले काही मार्ग आपल्या पृथ्वीच्या कक्षेला छेदतात.

पृथ्वी आपल्या नेहेमीच्या कक्षेत फिरत फिरत त्या ठिकाणी आली, की हा कचरा (धूळ, दगड) गुरुत्वाकर्षणामुळे पृथ्वीकडे ओढला जातो. पृथ्वीकडे खेचले जाताना यांचा वेग प्रचंड असतो (10 ते 30 किमी प्रति सेकंद) आणि पृथ्वीभोवती असणाऱ्या वातावरणाच्या थरामुळे या वस्तूंचे प्रचंड घर्षण होऊन त्या पेटतात आणि आपणाला काही क्षणांसाठी उल्केची सुंदर अनुभूती देवून जातात.

हे कण वाळूच्या कणाइतके किंवा त्यापेक्षा थोडे मोठे असतात. त्यामुळे जमिनीवर पडायच्या आतच त्यांची राख होवून जाते. काही कण किंवा दगड थोडे मोठे असतात ते जमिनीपर्यंत पोचू शकतात. महाराष्ट्रातील लोणार चे सरोवर अश्याच एका उल्केमुळे तयार झाले आहे. शास्त्रज्ञांच्या मते उल्कांमुळे अवकाशातील 40,000 टन कचरा प्रत्येक वर्षी पृथ्वीवर जमा होत असतो.

उल्कावर्षाव हा एका विशिष्ट जागेतून होताना दिसतो. तो ज्या तारकासमुहातून होताना दिसतो त्याला त्या तारकासमूहाचे नाव दिले जाते. उदा. येत्या १३ डिसेंबर ला होणारा उल्कावर्षाव मिथुन राशीतून होताना दिसेल म्हणून त्याला जेमिनिडस  (Geminids)  असे नाव दिले गेले आहे. काही उल्का वर्षाव फार सुंदर दिसतात. कधी कधी ते वेगवेगळ्या रंगांचे असतात.

वर्षातले काही महत्वाचे उल्का वर्षाव:

Quadrantids            ३-४ जानेवारी
Lyrids                २२-२३ एप्रिल
Eta Aquarids            ६-७ मे
Perseids            १३-१४ ऑगष्ठ
Draconids            ८-९ ऑक्टोबर
Orionids            २१-२२ ऑक्टोबर
Leonids            १७-१८ नोव्हेंबर
Geminids            १३-१४ डिसेंबर
Ursids                २२-२३ डिसेंबर

१३ डिसेंबरच्या उल्कावर्षावाचे महत्व:

वर्षात दोन उल्का वर्षाव असे आहे कि त्यामध्ये ताशी १०० पेक्षा जास्त उल्का कोसळताना दिसतात. त्यापैकी एक आहे येत्या १३ डिसेंबर ला दिसणारा Geminids अर्थात मिथुन राशीतला उल्कावर्षाव. हा उल्कावर्षाव ३२०० फेथोन नावाच्या एका लघुग्रहाच्या तुकड्यांमुळे होतो. अतिशय सुंदर आणि अविस्मरणीय असा हा वर्षाव असतो. रात्री 11 नंतर हा उत्तमपणे पाहता येईल.

उल्कावर्षाव कसा पाहावा:

१) उल्कावर्षाव नुसत्या डोळ्यांनी पाहता येवू शकतो.
२) उल्कावर्षाव पाहण्यासाठी शहरापासून दूर उंच आणि सपाट जागेची निवड करावी.
३) सपाट पठारावर चटई किंवा अंथरुण टाकून आकाशाचं संपूर्ण दृश्य दिसेल असे झोपावे. जेणेकरून मानदुखी होणार नाही.
४) सोबत वही पेन असेल तर उत्तम. कुठल्या दिवशी, किती वाजता, किती उल्का पहिल्या, त्यांचा रंग कुठला होता किंवा त्यांचा आकार केवढा होता असे निरीक्षण करावे.
६) खगोलतज्ञांचे मार्गदर्शन घेतल्यास उल्का वर्षावासोबतच आकाशातील नक्षत्र, राशी, तारका समूहांची माहिती करून घेता येऊ शकते.

खगोल प्रेमींसाठी खूप मोठी पर्वणी

१३ डिसेंबरला दिसणारा उल्कावर्षाव हा वर्षातल्या दोन मोठ्या उल्का वर्षावापैकी एक आहे. त्यामध्ये ताशी १०० पेक्षा जास्त उल्का कोसळताना दिसतील. हा दिवस अमावास्येनंतर ६ व्या दिवशी आल्यामुळे २७% चंद्राची कोर आकाशात असेल आणि रात्री ११ वा. ५ मिनिटांनी चंद्र पशिमेला मावळेल त्यामुळे चंद्र प्रकाशाचा त्रास होणार नाही.

रात्री साडे आठच्या सुमारास पूर्वेला मिथुन रस उगवेल. ती थोडी वर आल्यानंतर पूर्ण रात्रभर निरभ्र आणि चंद्र विरहित आकाशातून उल्कावर्षावाचा आनंद घेता येणार आहे. हा उल्कावर्षाव म्हणजे खगोल प्रेमींसाठी खूप मोठी पर्वणी असेल.

उल्कावर्षावाशी अनेक माणसे अनेक काल्पनिक कथा जोडत असतात. मात्र ही एक निखळ खगोलीय घटना असून त्याचा मानवी आयुष्यावर काहीही परिणाम होत नाही. उलट अशी एक घटना अनुभवल्याचा आनंद मिळेल. तेंव्हा सर्वांनी या उल्का वर्षावाचा आनंद नक्की घ्यावा.

 



 डॉ. अविराज जत्राटकर,
खगोलशास्त्र अभ्यासक
सहा. प्राध्यापक,
श्री यशवंतराव पाटील सायन्स कॉलेज, सोळांकूर

Web Title: Meteorological climate: 13th December

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.