२०१८ गुड बाय, वेलकम २०१९

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2019 03:25 PM2019-01-03T15:25:34+5:302019-01-03T15:32:03+5:30

जागे ठेव आमचे मन आणि संवेदना होऊ दे तिरंग्यातील प्रत्येक रंग प्रिय आम्हा... भारतीयत्व हा धर्म.... बिंबव धर्मग्रंथ म्हणून संविधान आपोआप होईल भारत देश महान

2018 Good Bye, Welcome 2019 | २०१८ गुड बाय, वेलकम २०१९

२०१८ गुड बाय, वेलकम २०१९

googlenewsNext
ठळक मुद्देहोऊ दे तिरंग्यातील प्रत्येक रंग प्रिय आम्हा...बिंबव धर्मग्रंथ म्हणून संविधान

दोन देश एक भारत... दुसरा अमेरिका
दोन वैज्ञानिक... एक भारतात... दुसरा अमेरिकेत
दोघांचे विषय वेगळे पूर्णत: परस्परभिन्न
एक भौतिकशास्त्राचा अभ्यासक 
तर दुसरा
शांत मनासाठी... भरले पोट ठेवण्यासाठी.
नवे वाण शोधणारा...

एक विकलांग... स्वतःचा हातही हलवू न शकणारा...
दुसरा धडधाकट रोज शेताला फेरी मारणारा...
एकाला विश्वाचा वेध घ्यायची आस 
दुसऱ्याला मातीतून सोनं पिकवायचा ध्यास...
एकाला विद्यापीठांनी घेतलं डोक्यावर...
इतकं की, पायच टेकू नयेत जमिनीवर
टेकणार तरी कसे? पायात तेवढा नव्हता जीवच...
तर दुसरा... ज्याला फसवलं विद्यापीठानेच...
त्याचं संशोधन छातीठोकपणे लुटलं...
खपवलं... स्वतःच्याच नावावर...

दोन विसंगत माणसं दोन देशांतील
दोन समाजातील दोन भिन्न विषयांतील..
तरीही अनेक साम्यस्थळं...
मनात खोल.... घर करून बसलेली



पहिला अमेरिकेत
त्याचा केला नियतीने घात
धडधाकट शरीर झालं लुळंपांगळं...
चालणं तर सोडा... बोलणंही बनलं कठीण..
तरीही तो उभा राहिला केवळ डोक्यानं...
जग आलं मदतीला सावरायला त्याला
उभं केलं मनानं.. अवकाशात झेपावायला...

त्याच्या मर्यादाच... बनल्या त्याचं बलस्थान...
शरीराने नव्हे तो फिरला मनानं
संपूर्ण विश्वाच्या पसाऱ्यात...
शोध घेत विश्वाचा... त्याच्या निर्मितीचा...
म्हणे काळ इतिहास घडवतो
तो साक्षीदार असतो इतिहासाचा
याने तर सांगितला
काळाचा संक्षिप्त इतिहास 
जगाला पटलं... याला घेतलं डोक्यावर
दर्शनासाठी लागल्या रांगाङ्घ
भाषणं ऐकायला.. तुफान गर्दी

तो बोलायचा... दाबत कळा संगणकाच्या
व्हायचा व्यक्त जगाचे भविष्य सांगत जगाच्या इतिहासासह..
कारण त्याला समजला होता काळाचाच इ‍तिहास..
तो जगला मस्त जगला... उपभोगत सारे ऐश्वर्य..
नव्या संशोधकाना शिकवत घडवत राहिला आयुष्यभर
वर्तमानाशी लढा देत नियतीवर मात करत
सारे होते त्याच्या दिमतीला
प्रत्येक इच्छेची पुर्ती करायला
म्हणूनच तो अमेरिकेचा नव्हे, ठरला जगाचा मानबिंदू 
स्टीफन हॉकींग. खरंच एक दंतकथा बनला



दुसरा भारतात
जन्मला खेड्यात वाढला खेड्यात
शाळेशी गट्टी नाही जमली...
तिसरीनंतर कायमची बुट्टी...
शिकण्यापेक्षा वडिलांना शेतात मदत करणं होतं गरजेचं...
जगायचं तर... पोटाचा प्रश्न सोडवणं होतं आवश्यकच 

पाहिलेलं.. दिसलेलं... करायचा व्यक्त इतरांजवळ
पण ऐकायचं कोण? 
त्याला थेट नाकारलंच
अतिशहाणा.. डोकेवाला
असंच त्याचं बारसं केलं...

तो होता धडधाकट चालायचा.. फिरायचा...
वडिलांकडून घेतले शेतीचे धडे
बी निवडायचे अन् पेरायचेही
पुढे स्वत:च शिकला बनवायला नवे वाण
एकलव्यासारखा
मात्र याचा अंगठा... समाजानंच घेतला ओरबडून

स्वतःच्या वाणाचं नाव ठेवायचं भाग्यही
नव्हतं त्याच्या नशीबी
पहिलं तर अपघातानंच ठेवलं 'एचएमटी'
पुढचं आम्हीच बदलून टाकलं
म्हणत कधी 'ओमशांती' तर कधी 'जय श्रीराम'
तरीही तो चालत राहिला...
न थकता... न थांबता...
नवे वाण शोधत राहिला
चवीचा भात ज्यानं दिला आम्हा...
तो बाप कधीच नाही कळला..

माहिती झालं सारं... पण तो गेल्यावर
गेलाही विपन्नावस्थेत
उपचाराला नव्हते पैसे...
म्हणून घरातच मोजल्या शेवटच्या घटका 
ना कोणी विद्यार्थी ना कोणी प्रेक्षक
कधी काळी... कुणी तरी... दिलेले पुरस्कार
पावसात भिजतील अशा घरात
त्याच्या मृत्यूचे... तेच तेवढे मूक साक्षीदार...

गेला एक डोकेवाला संशोधक
न शिकताही अभिजात संशोधन करणारा
दादाजी रामजी खोब्रागडे धरतीचा सुपुत्र खरा..

२०१८ तू दोघांनाही सोबत घेऊन गेलास..
एक माझ्या विषयातला
दुसरा जिव्हाळ्याच्या क्षेत्रातला...
तू असा वागलास तरी...
रितीप्रमाणे तुला गुड बाय म्हणावेच लागणार
आणि...
नाही म्हणालो तरी तू थोडाच आहेस थांबणार
जा तू तुझ्या मार्गानं... शांती तेवढी प्रदान कर... या दोघांच्याही आत्म्याला...

२०१९... वेलकम... तुझंही स्वागतच असो...
तू ये सर्वांसाठी सुखशांती घेऊन ये
सर्व सुखात राहू देत चांगलं लाभू दे आरोग्य..
आमच्या मनाचं आरोग्यही ठेव चांगलं
सुरवातीलाच विनंती तू नको वागू गत सालासारखा..
कोणा हॉकिंगला नको करूस लुळपांगळं..
अन्
कोणा दादाजीची अशी होऊ देऊ नको अवहेलना...

जागे ठेव आमचे मन आणि संवेदना
होऊ दे तिरंग्यातील प्रत्येक रंग प्रिय आम्हा...
भारतीयत्व हा धर्म....
बिंबव धर्मग्रंथ म्हणून संविधान
आपोआप होईल भारत देश महान

नववर्षाच्या सर्वांना मन:पूर्वक शुभेच्छा!


डॉ. व्ही.एन. शिंदे
उपकुलसचिव
शिवाजी विद्यापीठकोल्हापूर

Web Title: 2018 Good Bye, Welcome 2019

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.