अवयवदानाचे महत्त्व

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2018 04:31 AM2018-07-29T04:31:11+5:302018-07-29T04:31:24+5:30

शरीरातील कोणताही अवयव निरुपयोगी होणे, म्हणजे त्या संपूर्ण कुटुंबाचे शारीरिक व भावनिक दृष्टीकोनातून निरुपयोगी होणे असते. त्यामुळे कुटुंबाची आर्थिक परिस्थितीदेखील हलाखीची होऊन जाते.

 Importance of organs | अवयवदानाचे महत्त्व

अवयवदानाचे महत्त्व

googlenewsNext

- डॉ. वत्सला त्रिवेदी

भारतासारख्या प्रगतशील राष्टÑामध्ये अनेक घडामोडी होत असतात. त्या प्रगतीचा एक भाग म्हणून वेगवेगळ्या शहरांतून कॉन्सन्ट्रेटेड डेव्हलपमेंट होत असते. लोक दाटीवाटीने राहतात, त्यामुळे अनेक रोगांना बळी पडतात व त्यांच्या शरीरातील काही अवयव थकतात आणि काही काळानंतर निरुपयोगी ठरतात.
शरीरातील कोणताही अवयव निरुपयोगी होणे, म्हणजे त्या संपूर्ण कुटुंबाचे शारीरिक व भावनिक दृष्टीकोनातून निरुपयोगी होणे असते. त्यामुळे कुटुंबाची आर्थिक परिस्थितीदेखील हलाखीची होऊन जाते. त्यातच एखाद्या कुटुंबाच्या महिलेवर असा प्रसंग आलाच, तर लहान मुलांसह संपूर्ण कुटुंबच उद्ध्वस्त होते.
शरीरातील असा एखादा अवयव निरुपयोगही होण्यामुळे मूत्रपिंड, यकृत, हृदय, फुप्फसे अशा अनेक भागांवर त्याचा परिणाम होऊ शकतो. अशा वेगवेगळ्या आजारामुळे आपल्या देशात दरवर्षी साधारण ५० हजार लोक बळी पडतात. त्याला अनेक कारणे आहेत.
आपल्या देशातील दूषित वातावरण हे सर्वात महत्त्वाचे कारण आहे. अन्नधान्याचा साठा करण्याची पद्धत व तो निर्जंतुकीकरण करण्यासाठी वापरण्यात येणारी निरनिराळी जंतुनाशके रोगांना आमंत्रित करतात.
मधुमेह, हायब्लड प्रेशर, वेगवेगळी व्यसने, वाढती लोकसंख्या व त्यामुळे होणारी दाटीवाटीची लोकसंख्या, तसेच एकंदरीत हायफाय लाइफ स्टाईल. त्यामुळे जवळजवळ ३ लाख ५० हजार पेशंट मूत्रपिंड निकामी झाल्याने, २ लाख पेशंट लिव्हरच्या आजारामुळे तर ५० हजार लोकांना हृदयरोग असल्याची लक्षणे आढळली आहेत.

यावर उपाय काय?
निकामी अवयव बदलून टाकणे, हा अत्यंत परिणामकारक उपाय आहे. यालाच ‘आॅर्गन ट्रान्सप्लांटेशन’ असे म्हणतात. ‘अवयव प्रत्यारोपण’ हे वैद्यकीय विज्ञानातील अतिशय मोठे यश मानले जाते. त्यामुळे पेशंटला जीवदान मिळवून दिले जाते.

मूत्रपिंड निकामी झाल्यास?
आयुष्यभर डायलेसीसवर ठेवता येते किंवा किडनी (मूत्रपिंड) बदलता येते. शास्त्रीयदृष्ट्या हे सिद्ध झाले आहे किंवा पेशंटचा असा अनुभव आहे की, किडनी ट्रान्सप्लांटेशननंतर पेशंटचे पूर्ण आयुष्यच बदलून जाते.

अवयव मिळण्याची ठिकाणे :
मानवी शरीरातील हे अवयव फक्त खालील ठिकाणाहूनच मिळतात.
जिवंतदाता : एखादी व्यक्ती जिवंतपणे आपल्या अवयवाचे दान करू शकते. असे अवयव जोड अवयव असतात. उदा. किडनी पेअर (जोडी) असते. तरीदेखील जिवंतदाता मिळणे फार कठीण असते. जवळचे नातेवाईक, पालक, आजी-आजोबा, भाऊ इत्यादी. बऱ्याच वेळा रक्तगट न जमल्याने इच्छा असूनही ही किडनी दान (डोनेट) करता येत नाही. काही लोक वैद्यकीयदृष्ट्या तंदुरुस्त नसतात, तसेच काही लोकांची अवयवदानाची मानसिक तयारीदेखील नसते. अशा वेळी अवयव मिळणे कठीण होऊन जाते.
नात्यात नसलेल्या व्यक्तीला असे सिद्ध करावे लागते की, व्यवहारात कोणत्याही तºहेचे देणे-घेणे नाही किंवा गरीब स्तरावरील लोकांच्या परिस्थितीनुरूप गैरफायदा घेतला जात नाही.
२) मृतक (मयत व्यक्ती) दात्याचे अवयव प्रत्यारोपण ब्रेन डेड (ज्या व्यतीचा मेंदू मृतावस्थेत आहे), असे पेशंट फक्त इन्सेटिव्ह केअर युनिट (आयसीयू)मध्ये दाखल असतात. अशा वेळी त्यांचे पालक व पत्नीची सहमती महत्त्वाची असते. काही वेळा एक दाता दुसºया दान करणाºया व्यक्तीशी जोडला जातो. तेव्हा त्यांचे प्रत्यारोपण एकाच वेळी केले जाते.

बे्रन डेड म्हणजे काय?
जेव्हा मेंदूला सूज येऊ लागते, तेव्हा संपूर्ण मेंदू अकार्यक्षम होऊ लागतो. अशा रितीने हा परिणाम कायमस्वरूपी झाल्यास, ती व्यक्ती जागरूक राहू शकत नाही. सहजपणे श्वास घेऊ शकत नाही. अशा व्यक्तीला इंसेटिव्ह केअर युनिट (आयसीयू)मध्ये ठेवले जाते. येथे यांत्रिक व्हेंटीलेटर्सवर त्या व्यक्तीची नाडी व रक्तदाब यावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न केला जातो, तरीदेखील हृदय, फुप्फुस, यकृत, मूत्रपिंड इ. महत्त्वपूर्ण अवयवांना आॅक्सिजनयुक्त रक्ताचा पुरवठा केला जातो. त्यामुळे ती व्यक्ती जिवंत असते व काही दिवस जिवंत राहू शकते. या कालावधीत अशा व्यक्तीवर शस्त्रक्रिया केली जाऊ शकते.

मेंदू मृत होण्याची कारणे :
१) रस्त्यावर वाहतुकीत झालेला भीषण अपघात
२) खूप उंचीवरून पडलेली व्यक्ती.
३) बंदुकीच्या गोळीबाराने जखमी झालेली व्यक्ती
४) मेंदूचा ट्युमर किंवा तद्संबंधित असलेली शस्त्रक्रिया
एकदा ती व्यक्ती ब्रेन डेड आहे, हे कळल्यावर/सिद्ध झाल्यावर त्या व्यक्तीला कोणत्याही प्रकारचे इन्फेक्शन झाले आहे का? याची तपासणी केली जाते. प्रोटोकॉल नियमानुसार हायपर टेंशन, डायबेटीस इ. सीस्टिम डिसीजीसबद्दलची चौकशी केली जाते.
ही सर्व तयारी झाल्यावर पेशंटच्या नातेवाइकांना पूर्णपणे विश्वासात घेऊन सर्व गोष्टींची कल्पना दिली जाते व अधिकृत व्यक्तीची लेखी परवानगी घेतली जाते.
अशा अवयवांचे प्रादेशिक वाटप केंद्राकडून सर्वात योग्य अशा प्राप्तकर्त्यांना नि:पक्षपणे वाटप केले जाते. त्यानंतर, देणगीदार व्यक्तीच्या शरीराची काळजीपूर्वक पुनर्रचना केली जाते व त्या शरीरावर कोणतेही वाईट परिणाम होणार नाहीत, अशा रितीने पॅक करून अंतिम संस्कारासाठी नातेवाइकांच्या सुपुर्द केले जाते.

याचसंदर्भात सर्वसाधारणपणे विचारले जाणारे प्रश्न :
दाता कोण बनू शकतो?
१) जिवंत देणगीदार म्हणजे १८ वर्षे वय असलेली कोणतीही निरोगी प्रौढ व्यक्तीचा देणगीदार म्हणून विचार केला जाऊ शकतो. १८ वर्षांपेक्षा कमी वयाची कोणत्याही व्यक्तीचे अवयव अपरिपक्व मानले जातात, तसेच ७० वर्षांपेक्षा जास्त वयाच्या व्यक्तीचे अवयव चांगल्या प्रकारचे कार्य करू शकत नाहीत.
२) मेंदू मृतदात्याला वेदना होऊ शकतात का?
मेंदू मृतदाता, मृत असल्यामुळे त्यांना वेदना होत नाही.
३) माझ्या धर्मात अंगदान (बॉडी डोनेशन) करण्याला परवानगी आहे का?
जगातील सर्वच धर्म अवयवदानाला परवानगी देतात.
४) नातेवाईक बॉडी डोनेशनसाठी तयार असल्यास मृत रुग्णाला आयसीयूमध्ये ठेवून पूर्णपणे काळजी घेतात.
५) आयसीयू आणि ट्रान्सप्लांट या दोन्ही वेगळ्या टीम आहेत. त्या रुग्णांची सर्वोत्तम आणि इष्टत्तम काळजी घेतात.
६) दात्याच्या तपासासाठी व शस्त्रक्रियेसाठी कोण भरपाई देते.
एकदा नातेवाइकांनी लेखी संमती दिल्यावर देणगीदारांकडून कोणतीही रक्कम स्वीकारली जात नाही.
७) मृत्यूनंतर बॉडी डोनेशनसाठी मला कोणती काळजी घ्यायला हवी?
बॉडी डोनेशनचा फॉर्म भरल्यावर, हॉस्पिटलतर्फे एक डोनर्स कार्ड दिला जातो. ते भरून आपली सही करून आपल्याजवळ सतत ठेवावे. आपल्या नातेवाइकांना व मित्रपरिवाराला आपली स्पष्ट इच्छा सांगायला हवी. आपल्या मृत्युनंतर अंगदान/अवयवदान करणे म्हणजे एखादी परकी व्यक्ती जिवंत ठेवण्यासाठी आपल्या शरीरातील एक भाग जिवंत ठेवणार आहे, हे लक्षात ठेवा. आपल्या प्रत्येकाचा जन्म एखाद्याचे जीवन बदलण्यासाठी अनोखी क्षमता घेऊन झाला आहे. ही संधी वाया घालवू नये.

(लेखिका केईएम हॉस्पिटल, आॅर्गन डोनेशन विभागाच्या निवृत्त युरॉलॉजिस्ट आणि किडनी ट्रान्सप्लांट सर्जन आहेत. )

Web Title:  Importance of organs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.