दुष्काळाचे डोहाळे!

By गजानन दिवाण | Published: May 13, 2018 11:48 PM2018-05-13T23:48:40+5:302018-05-13T23:49:59+5:30

गलेलठ्ठ पगार झाला, की कुठलेही नियोजन न करता हा पैसा उडवायचा आणि महिन्याच्या शेवटी पगाराची वाट पाहत शिमगा करीत राहायचे हा जसा कॉल सेंटरमधील काही नवतरुणांच्या जगण्याचा भाग झाला आहे, तशीच अवस्था मराठवाड्यात उसाचे पीक घेणा-या शेतक-यांची आहे.

Drought! | दुष्काळाचे डोहाळे!

दुष्काळाचे डोहाळे!

पगार झाला की दिवाळी अन् महिन्याच्या शेवटी शिमगा, असे जीवन जगणारे कॉल सेंटरमधील काही नवतरुण आणि मराठवाड्यासारख्या दुष्काळी भागात ऊसलागवड करणाऱ्या शेतक-यांमध्ये आम्हाला फारसा फरक दिसत नाही. गलेलठ्ठ पगार झाला, की कुठलेही नियोजन न करता हा पैसा उडवायचा आणि महिन्याच्या शेवटी पगाराची वाट पाहत शिमगा करीत राहायचे हा जसा कॉल सेंटरमधील काही नवतरुणांच्या जगण्याचा भाग झाला आहे, तशीच अवस्था मराठवाड्यात उसाचे पीक घेणा-या शेतक-यांची आहे.

मराठवाड्याने सलग चार वर्षे दुष्काळाचे चटके सहन केले. लातूरकरांना तर कृष्णेचे पाणी रेल्वेने आणून तहान भागवावी लागली. सुदैवाने गेल्या वर्षी चांगला पाऊस झाला. जलयुक्त शिवार, वॉटर कप, नाम आदी माध्यमांतून जलसंवर्धनाची कामे झाली. कधी नव्हे ते ओढ्या-नाल्यांना पाणी दिसू लागले. करडी, सूर्यफूल हे आपले पारंपरिक पीक. ते सोडून आपण सोयाबीनचा हात धरला आणि आता थोडे पाणी दिसू लागताच उसाची शेती जवळ केली.

भाव मिळत नाही म्हणून आम्ही या पिकांची वाट सोडली आणि दुसरीकडे सरकार दरवर्षी ८५ हजार कोटी रुपयांचे खाद्यतेल आयात करते. किती हा विरोधाभास? एक एकर उसासाठी जवळपास दीड कोटी लिटर पाणी लागते. एक लाख टन साखर उत्पादनासाठी ८.८८ टीएमसी पाणी खर्च होते. प्रति माणसी रोज पाण्याची ८० लिटर गरज गृहीत धरली, तर महाराष्ट्रातील लोकसंख्येला २१ दिवस पुरेल एवढे पाणी या एक लाख टन साखरेसाठी लागते. हे माहीत असताना मराठवाड्यासारख्या भागाने उसाची शेती करून पुन्हा दुष्काळी डोहाळे का पाहावेत?

२०१४-१७ च्या दुष्काळानंतर २०१६-१७ मध्ये नांदेड विभागात केवळ ०.९३ लाख हेक्टर ऊस लागवड झाली. गेल्या वर्षी वरुणराजा थोडा मेहरबान काय झाला, या क्षेत्रात तब्बल ५६.५४ टक्क्यांनी वाढ होत २.१४ लाख हेक्टरवर ऊसलागवड झाली. एकट्या नांदेड विभागातच ३२ कारखान्यांनी गाळप घेतले. गेल्या वर्षी यातील केवळ ११ कारखाने सुरू होते. औरंगाबाद, जालना आणि बीड जिल्ह्यांतील १७ कारखान्यांनी यंदा गाळप घेतले. नांदेड विभागात एक कोटी १७ लाख ३२ हजार ३२८ मेट्रिक टन, तर औरंगाबाद विभागात ६९ लाख ९३ हजार ८२ मेट्रिक टन गाळप झाले.

मराठवाड्यात यंदा साखर गाळप आणि उत्पादनात तब्बल दहा पटींहून अधिक वाढ झाली. मुळात साखर कारखानदारी हा उद्योग मराठवाड्याचा नव्हे. बारमाही पाणी वाहणा-या परिसराला म्हणजे प. महाराष्टला तो परवडू शकतो; पण राजकारण आणि मतदानाचा टक्का डोळ्यासमोर ठेवून मराठवाड्यातील नेत्यांनी प. महाराष्टची री ओढली. मराठवाड्यातील ही उसाची शेती येथील शेतक-यांचे भले करणारी थोडीच आहे? राजकारण्यांचे उखळ पांढरे करण्याचा हा उद्योग आहे. या उसाच्या शेतीवरच येथील राजकारण्यांचा बॉयलर पेटलेला आहे.

Web Title: Drought!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.