वाळू माफीया ‘रग्गड’ कमाईतून झाले ‘गब्बर’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 27, 2019 10:34 PM2019-01-27T22:34:59+5:302019-01-27T22:35:24+5:30

धुळे जिल्हा आता वाळू तस्करी व वाळू सम्राटांचा जिल्हा

'Gabbar' has been earned from the 'raggad' of sand mafia | वाळू माफीया ‘रग्गड’ कमाईतून झाले ‘गब्बर’

dhule

googlenewsNext

रॉकेल पिणारा जिल्हा म्हणून कुप्रसिद्ध असलेला धुळे जिल्हा आता वाळू तस्करी व वाळू सम्राटांचा जिल्हा म्हणून कुप्रसिद्ध होत आहे. कारण धुळ्यातील वाळू ही दररोज नाशिक व मुंबईपर्यंत जाते. अद्यापपर्यंत जिल्ह्यातील वाळू उपशाचे शासकीय ठेके दिलेले नसतांना पांझरा, बुराई आणि तापी या प्रमुख नद्यांसह अन्य नदी व नाल्यांमधून सर्रासपणे वाळू उपसा सुरु आहे. दररोज रात्री आणि पहाटे वाळूने भरलेले डंपर, ट्रॅक्टर भरधाव वेगाने जातांना नागरिकांना दिसतात. वाळू तस्करी करणारे डंपर आणि ट्रॅक्टर इतक्या भरधाव वेगात असतात की, मार्गावर चालणाऱ्या दुचाकीस्वारांना आपले वाहन निमूटपणे रस्त्याच्याकडेला उतरवून घ्यावे लागते. तसे नाही केले तर वाळू घेऊन जाणारे वाहनचालक सरळ गाडी अंगावरच आणतात. याचपद्धतीने साक्रीजवळ २६ जानेवारीच्या रात्री वाळू घेऊन जाणाºया ट्रॅक्टरने लग्नाच्या हळदीचा कार्यक्रम आटोपून दुचाकीने घरी परतणाºया दातर्तीचे २९ वर्षीय तरुण सरपंच आणि २८ वर्षीय उपसरपंच यांना उडविले. अपघातात हे दोन्ही जागीच ठार झाले. अपघातानंतर वाळू माफियावर कारवाई करण्याच्या मागणीसाठी दातर्तीसह परिसरातील ग्रामस्थांनी रास्तारोको आंदोलन केले. तब्बल चार तास रास्तारोको आंदोलन सुरु होते. शेवटी नाशिक येथून आल्यावर तहसीलदार संदीप भोसले यांनी नदीतील अवैध वाळू उपसा रोखण्यात येईल. वाळू माफियासाठी २४ तास पथक तैनात करुन अपघातासंदर्भात संबंधितावर गरज भासल्यास खुनाचा गुन्हा दाखल करण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेतले.
वाळू माफियांची मुजोरी आणि दादागिरी एवढी वाढली आहे की ते महसूल आणि पोलीस विभागातील अधिकाºयांनाही भीत नाही. कारण दररोज रात्री वाळू भरुन भरधाव वेगाने जाणारे वाहन हे ग्रामस्थांना दिसतात, परंतु महसूल अधिकाºयांना का दिसत नाही, याचे सर्वांना आश्चर्य वाटते. जेव्हा वाळू तस्करीची बोंब होते. तेव्हा महसूल विभागाकडून कारवाई केली जाते. वर्षातला एक महिना असा गेला नसेल की चोरटी वाळू वाहतूक करणारे डंपर पकडले गेले नसतील. दरवर्षी वाळू ठेक्यातून शासनाला कोट्यवधीचा महसूल मिळतो. पण त्यापेक्षाही जास्त डबलची आर्थिक उलाढाल ही वाळू तस्करीच्या धंद्यातून होते, हे कोणीही सांगेल. त्यामुळेच या धंद्यात आता मोठमोठे धनदांडगे उतरले आहेत. तर काही याच धंद्यावर धनदांडगे झाले आहेत. या धंद्यातून महसूल विभागातील अधिकाºयांनाही चांगला मलिदा मिळतो. त्यामुळेच ठेके बंद असतांनाही सर्रासपणे सुरु असलेली वाळूची तस्करी या अधिकाºयांना दिसत नाही. अनेकदा स्थानिक ग्रामस्थच वाळू तस्करी पकडून अधिकारी व पोलिसांच्या ताब्यात देतात. त्यानंतर त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली जाते. आधी हा दंड खूप कमी होतो. परंतु आता दंडाची रक्कम खूप वाढविली असली तरी महिना, दोन महिन्यातून वाहन पकडवून ती दंडाची रक्कम भरणे सुद्धा या वाळू माफियांना परवडते, असेच म्हणावे लागले. कारण मोठ्या प्रमाणावर दंड आकारणी झाल्यानंतर वाळू तस्करी थांबायला हवी होती. परंतु ती आणखी वाढली आहे.
वाळू तस्करी रात्रीच मोठ्या प्रमाणावर होते. दररोज रात्रीतून वाळूने भरलेले डंपर हे धुळे, साक्री, पिंपळनेर मार्गे नाशिक आणि मुंबईकडे भरधाव वेगाने रवाना होतात. रात्री सुसाट वेगाने एकामागून एक असे वाळूने भरलेले वाहन एका रांगेत निघतात. हे वाहन ओव्हरलोड ओल्या वाळूने भरलेले असते. वाळूवर फक्त वरती एक प्लॅस्टिकचे कापड टाकलेले असते. भरधाव वेगामुळे अनेकदा वाळूचे बारीक कण हवेत उडून मागे येणाºया वाहन चालकाच्या डोळ्यात जातात. त्यामुळे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने महामार्गावर अपघातही झालेले आहेत.
वाळूचे ठेके जरी दुसºयाच्या नावावर घेतले गेलेले असले तरी त्याचा बोलवता धनी मात्र समाजातील प्रतिष्ठीत समजला जाणारा ‘गब्बर’ माणूस असतो. तो सर्व ‘मॅनेज’ करतो. वाळू उपशासाठी सर्व नियम धाब्यावर बसवून मोटार बोटीचा, क्रेनचा वापर सर्रासपणे केला जातो. यामुळे तापी, पांझरा आणि बुराई नदीच्या पात्रात मोठमोठे खड्डे पडले आहेत. पाणी भरल्यामुळे हे खड्डे न दिसल्यामुळे त्यात बुडून शिंदखेडा आणि साक्री तालुक्यातील काही तरुणांचे बळीही गेलेले आहे. वाळूच्या धंद्यात अमाप म्हणण्यापेक्षा रग्गड कमाई आहे. वाळू तस्करीच्या धंद्यात एक मोठी बिल्डर लॉबी तयार झाली आहे. तिची पाळेमुळे इतक्या खोलपर्यंत गेली आहे की, आता या अवैध वाळू धंद्यात अनेकांचे हात ओले झाले आहे. त्यामुळे हा धंदा बंद करण्याची ताकद एकाही महसूल अधिकाºयामध्ये नाही, असे हे स्वत: वाळू तस्कर छातीठोकपणे सांगतात. वाळू तस्करांची मुजोरी बंद करण्यासाठी आवश्यक ती पाऊले उचलली गेली पाहीजे. अन्यथा शिंदखेडा तालुक्यातील मुडावद येथे घडलेल्या घटनेसारखे उद्रेक अन्य ठिकाणीही होतील, आणि त्यातून जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था धोक्यात येण्याचीही भीती आहे.

Web Title: 'Gabbar' has been earned from the 'raggad' of sand mafia

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे