बिनभांडवली प्रबोधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2018 08:28 PM2018-02-20T20:28:10+5:302018-02-20T20:28:34+5:30

वर्तमान : प्रबोधनची परंपरा महाराष्ट्रदेशी तशी प्राचीन. कालौघात तिचे माध्यमे फक्त बदलली. पूर्वी गावोगावी भक्तिमार्गाने प्रबोधन केले जाई. प्रवचन, कीर्तन ही त्याची प्रभावी माध्यमे. नंतरच्या काळात शाहिरी परंपरेतून निर्मित ‘जलशां’नी सत्यशोधक व आंबेडकरी चळवळीत मोठे योगदान दिले. इंग्रजी सत्तेच्या विरोधात सामान्य जनतेला जागृत करण्यासाठी ‘सार्वजनिक सभा’ तून ‘भाषण’हा मार्ग स्वातंत्र्य चळवळीतील नेत्यांनी अवलंबला. या सर्वांचा उद्देश समाजाला जागृत व संघटित करणे हाच होता. अगदी ‘संयुक्त महाराष्ट्र चळवळ’ ही अशा ‘वाक्कौशल्ये’ असणार्‍या समाजधुरीणांमुळेच यशस्वी झाली; परंतु पुढे ही समाजप्रबोधनाची प्रभावी ‘माध्यमे’ फक्त ‘पैसा’ कमविण्याची ‘साधने’ होतील, असा विचार या परंपरेतल्या पूर्वसुरींच्या मनात कधीही आला नसेल; परंतु दुर्दैवाने हे आजचे ‘वर्तमान’ आहे. 

Uninhabited awakening | बिनभांडवली प्रबोधन

बिनभांडवली प्रबोधन

googlenewsNext

- गणेश मोहिते

गोष्ट अशी आहे, की सध्या ‘व्याख्यानां’चा हंगाम सुरू आहे. शाळा, महाविद्यालये, सरकारी कार्यालयांनी सर्व महापुरुषांच्या जयंती, पुण्यतिथी निमित्ताने व्याख्यानांसह विविध उपक्रमांचे आयोजन करावे हा दूरदृष्टीचा व उदात्त निर्णय सरकारने काही वर्षांपूर्वी घेतला. हा निर्णय खर्‍या अर्थाने पथ्यावर पडला वक्तृत्वासह मार्केटिंग कला अंगी असणार्‍या लोकांच्या. यांनी काळाची पावले ओळखून ‘दुकानदारी’ थाटली. या दुकानात छ. शिवाजी महाराज, म. फुले, छ. शाहू, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, म. गांधी, सावरकर, विवेकानंदांसह सर्व संत (जातीसह) ते पंडित दीनदयाल यांच्यापर्यंत सर्व विषय एका छताखाली ‘विकली’ जातात. अशी सर्वसमावेशक (?) व्याख्याने देणारी नवी जमात समाजात मोठ्या प्रमाणात उदयास आली. ‘विषय’ त्यांना कोणताच वर्ज्य नाही. फक्त बाकी व्यवस्था उत्तम पाहिजे. यात काही तर पदवी किंवा पदव्युत्तर परीक्षेत चार-दोन विषयांची ‘कोंडी’ फोडता न आलेलेसुद्धा अर्ध्या पदवीवरच नावापुढे प्राध्यापक, अभ्यासक, व्याख्याते, अशी विशेषणे लावून हा बिनभांडवली व्यवसाय करतात, तर काहींनी स्वत:ला स्वजातीच्या महापुरुषांपुरते लिमिटेड करून घेतले. महाराष्ट्रात रुजू लागलेली प्रबोधनाची ही नवी परंपरा विचार करायला लावणारी आहे. अगदी हे सर्वच महापुरुषांच्या अनुयायांच्या बाबतीत सत्य असले तरी अगदी उदाहरणा दाखल उद्याच्या ‘शिवजयंती’च्या निमित्ताने याचा विचार करूयात. 

महाराष्ट्रभर शिवजयंतीच्या निमित्ताने सर्वत्र व्याख्यानांचे आयोजन केले जाते. हे चित्र तसे खूप प्रेरक, आशादायी व सकारात्मक. याचे श्रेय अर्थातच विविध मराठा संघटनांना जाते. गावोगावी उत्साहात ‘शिवजयंती’ साजरी करून शिव‘जागरा’चे नवे पर्व सुरू झाले आहे. खरं तर प्रबोधनाचा वारसा समाजात रुजविण्यासाठी आपली पूर्ण हयात खर्च केलेले अग्रणी महात्मा जोतीराव फुलेंनी पहिल्यांदा सार्वजनिक पातळीवर ‘शिवजयंती’ साजरी केली. बहुजन समाजाने कोणत्या दिशेने जावे हे सूचित केले. तरीही पुढे अनेक वर्षे गावोगावी फक्त सार्वत्रिक ‘गणेशोत्सव’ असायाचा. आता मात्र त्यापेक्षाही शिवजयंती सार्वजनिक पातळीवर खेड्यात मोठ्या प्रमाणात साजरी होऊ लागली याचे श्रेय त्या संघटनांना द्यावेच लागते. शिवाजीराजे यांचे सर्वसमावेशक कार्य व वरील प्रकार जनतेच्या लक्षात आणून देण्याचे प्रयत्न इतिहास संशोधक, अभ्यासकांनी केले. अजूनही करीत आहेत. कॉ. गोविंद पानसरेंनी तर ‘खरा शिवाजी कोण होता?’ या छोट्या ग्रंथातून, व्याख्यानातून क्रांतिकारी भूमिका मांडली. त्यांच्यासारख्या विद्वान अभ्यासकांची आजमितीला संख्या किती आहे? हा खरा प्रश्न आहे.

याउलट महाराजांचे चरित्र व कार्य ऐतिहासिक प्रसंगातून रंगवून ‘रंजन’ करणारे गल्लाभरू व्याख्यानकर्ते अधिकच. अगदी त्यांनी मन मानेल असा स्वत:चा ‘भाव’ ठरवून हा उद्योग फक्त ‘खिसे’ भरण्यासाठीच सुरू केला असे दिसते. महाराजांच्या आयुष्यातील चित्तथरारक प्रसंगांच्या कथन, सादरीकरणातून प्रचंड ‘माया’ जमवता येते हे काहींना चांगलेच उमगले. खरं तर आजच्या वर्तमानात शिवचरित्र, महाराजांचा समतामूलक दृष्टिकोन समाजात रुजविणे नितांत गरजेचे आहे. ते कार्य चालूच राहावे; परंतु नावापुढे प्राध्यापक, इतिहास संशोधक वगैरे लावले, अंगात ‘जॅकीट’ घालून चार-दोन माईक पुढील फोटो एडिट करून समाजमाध्यमातून पोस्ट केले, की व्याख्यानांचा ‘गळीत’ हंगाम सुरू झाला. त्यात गैर तरी काय? माझा आक्षेप येथेही नाही, तर याचा कळस असा, की हे लोक नावापुढे शिवचरित्रकार, शिवचरित्राचे अभ्यासक, इतिहासकार वगैरे शेलकी विशेषणे लावतात. हे भयंकर. (एका अभ्यासक? वक्त्याला महाराजांच्या चरित्रासंबंधीचे काही मूळ ग्रंथ विचारले, तर तेही सांगता आले नाही.) म्हणून बाबांनो एखादे शिवचरित्रावरचे बाजारू पुस्तक वाचून चाळीस मिनिटांची संहिता तयार करणे व बोलणे सोपे; परंतु अभ्यासक, इतिहासकार असणे वेगळे हे लक्षात घ्या.

प्राच्यविद्या पंडित असणारी माणसे आपल्याकडे झाली; परंतु त्यांनी कधी नावापुढे ही शेलकी विशेषणे लावली नाहीत, तर ते उभी हयात स्वत:ला विद्यार्थी समजत राहिले. इतके जरी उमजले तरी आपल्याला जमिनीवर यायला मदत होईल. नाही तर नाटकात शिवाजीराजेंची भूमिका केली म्हणून स्वत:ला ‘शिवाजीराजे’ समजणे हे जसे आहे; त्यातलाच हा प्रकार आहे. ‘हिरोडोटस’सुद्धा स्वत:ला इतिहासाचा विद्यार्थी समजत असेल, तर आपण कोण? तेव्हा आपण तथाकथित इतिहासकारांनी(?) याचा गंभीर विचार करावा. इतिहासाकडे गंभीरपणे पाहावे.  महापुरुषांचे गुण कृतीत उतरवा. व्याख्यान नंतरच्या ‘उत्तरक्रिया’ बंद करा आणि खुशाल महापुरुषांचे विचार घरोघरी पोहचवा. तुम्हा सर्वांना शुभेच्छा!
( dr.gamohite@gmail.com )

Web Title: Uninhabited awakening

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.