कडाक्याच्या थंडीने शेतामधील लाखमोलाचे अद्रक करपले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2019 03:51 PM2019-01-01T15:51:43+5:302019-01-01T15:55:30+5:30

पिशोर परिसरात ऐन बहरात असलेले अद्रक पीक करपले आहे.

ginger crop burnt due to cold weather in pishor | कडाक्याच्या थंडीने शेतामधील लाखमोलाचे अद्रक करपले

कडाक्याच्या थंडीने शेतामधील लाखमोलाचे अद्रक करपले

googlenewsNext
ठळक मुद्देदुष्काळात तेरावा महिना दोन दिवसांपूर्वी हिरवेगार दिसणारे पीक कोमात;

पिशोर (औरंगाबाद ) : गेल्या काही दिवसांपासून पडत असलेल्या कडाक्याच्या थंडीमुळे पिशोर परिसरात ऐन बहरात असलेले अद्रक पीक करपले आहे. यामुळे शेतकऱ्याला आर्थिक फटका बसणार असून बाजारातही या पिकाला योग्य भाव मिळणार नसल्यामुळे दुष्काळात तेरावा महिना अशी अवस्था बळीराजाची झाली आहे. 

वर्षानुवर्षे बळीराजावर निसर्गाकडून विविध संकटांचा मारा सुरू आहे. अनेक शेतकरी धैर्याने या संकटांचा सामना करताना दिसून येत आहेत. मात्र, यंदा दुष्काळी परिस्थितीनंतर चांगली पिके आलेली असताना कुठे लाल्याने तर कुठे बोंडअळीने पिकांचे उत्पादन कमी केले आहे. आता पिशोरसह परिसरातील पळशी बु., पळशी खुर्द, निंभोरा, वासडी, साखरवेल, खातखेडा, मोहंद्री, अमदाबाद, सारोळा, जवखेडा बु., जवखेडा खुर्द, नादरपूर, पिंपरखेडा, मेहेगाव, रामनगर, कोळंबी, भारंबा तांडा, भारंबा, भिलदरी आदी भागात अद्रक हे नगदी पीक अगदी जोमात होते.  गेल्या चार दिवसांपासून पडत असलेल्या कडाक्याच्या थंडीमुळे अद्रकचे पीक पूर्णपणे करपून गेलेले आहे. यामुळे भाव चांगला दृष्टिपथात असतानादेखील कमी भावाने विक्री करण्याची वेळ बळीराजावर येऊन ठेपली आहे.

दुसरीकडे परिसरातील मका पीकही हातचे गेले असून नुसता चारा होऊन बसला आहे. दरम्यान, कृषी विभागाच्या म्हणण्यानुसार सहा महिन्यांपूर्वीच्या अद्रक उत्पादनावर परिणाम होणार नाही. मात्र, चार महिन्यांपूर्वी लागवड केलेल्या अद्रकच्या उत्पादनावर परिणाम होऊन उत्पन्नात घट होईल, अशी भीती शेतकरी व्यक्त करीत आहेत.

लाखो रुपयाचा तोटा होणार 
मी यावर्षी अद्रक पीक गेल्या वर्षीपेक्षा जास्त प्रमाणात घेतले असून, लाखो रुपये खर्च झाला आहे. यंदा पीक जोमदार होते आणि भावसुद्धा चांगला मिळण्याची अपेक्षा होती. मात्र, कडाक्याच्या थंडीने संपूर्ण प्लॉट पिवळा पडला असून पाने करपली आहेत. यामुळे उत्पन्न कमी होऊन लाखो रुपयांचा तोटा होण्याची भीती आहे.
- सुभाष जाधव, शेतकरी पिशोर 

नफा कमी मिळेल 
आम्ही ठिबकवर अद्रक लावलेले असून कालपर्यंत हिरवीगार दिसणारे अद्रक या थंडीमुळे करपून गेली आहे. खर्च वगळता अत्यंत कमी नफा मिळण्याची चिन्हे आहेत.
-उस्मान पटेल, शेतकरी, पळशी बु.

उपयायोजना कराव्या लागतील
थंडीमुळे जिवाणू अधिक गतीने पसरले. यामुळे अद्रक पिकाचे नुकसान झाले आहे. आगामी दिवसात थंडी कमी होण्याची चिन्हे आहेत. शेतकऱ्यांनी करपलेल्या अद्रकावर १० लिटर पाण्यात ब्ल्यू कॉपर २५ ग्रॅम तसेच सेप्टो सायकलिंग १ ग्रॅम मिश्रण करून ठिबकद्वारे दिल्यास अद्रकचा प्लॉट दुरुस्त होईल, तसेच अधिक माहितीसाठी कृषी सहायकाशी संपर्क साधावा, असे आवाहन कन्नडचे तालुका कृषी अधिकारी एम. आर. पेंडभाजे यांनी केले.

Web Title: ginger crop burnt due to cold weather in pishor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.