बळ हवे पंखांना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2018 04:03 PM2018-07-21T16:03:31+5:302018-07-21T16:04:24+5:30

दिवा लावू अंधारात : शांतिवनचे काम करीत असताना दररोज समाजातील भीषण वास्तव समोर येत असते. अनेक संकटांनी उद्ध्वस्त झालेली आणि अनेक प्रश्नांशी  लढा देत व्याकूळ झालेली माणसे पहिली की काम करण्यासाठी ठरवून घेतलेल्या क्षेत्राच्या भिंती आणि सीमा आपोआप गळून पडतात. कामाच्या कक्षा रुंदवाव्या लागतात. शांतिवनचाही प्रवास असाच आहे. ऊसतोडीच्या कामावर असताना अपघात होऊन मृत्यू पावलेल्या पालकांच्या अनाथ मुलांसाठी आम्ही हे पालन पोषण आणि शिक्षणाचे काम सुरू केले. आम्हाला रस्त्यावर भीक मागणारी मुले दिसली आम्ही त्यांच्यासाठी काम सुरू केले. तमाशा कलावंतांची मुले दिसली आम्ही त्यांच्यासाठी काम सुरू केले. लालबत्ती भागात देहविक्री करणाऱ्या महिलांची मुलेदिसली आम्ही त्यांच्यासाठी काम सुरू केले. मराठवाड्यात सातत्याने पडणाऱ्या दुष्काळामुळे सततच्या नापिकीला कंटाळून हजारो शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. आम्ही आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांसाठी काम सुरू केले. हे काम सुरू करताना आम्ही अशा मुलांची शोधमोहीम राबवली. पन्नास कार्यकर्त्यांची २५ पथके सर्वत्र फिरत होती. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या घरी भेटी देत होती. त्या कुटुंबाची परिस्थिती जाणून घेत. विधवा आईला समजावून सांगत आणि पहिली ते दहावीपर्यंतच्या मुलांना पालन पोषण आणि शिक्षणासाठी शांतिवनमध्ये घेऊन येत.

Force to be winged | बळ हवे पंखांना

बळ हवे पंखांना

googlenewsNext

- दीपक नागरगोजे

हा सर्व्हे करीत असताना कार्यकर्त्यांच्या एक गोष्ट लक्षात आली की, छोट्या मुलांना तर आपण घेऊन जात आहोत. पुण्यातील भारतीय जैन संघटनेनेही बऱ्याच छोट्या मुलांचे पालकत्व स्वीकारले आहे; पण मोठ्या मुलांसाठी कुणी मदत करीत नाही. ऐन उच्चशिक्षण घेण्याच्या वेळीच वडील निघून गेले. कुटुंबावर वाईट वेळ आली. अशा परिस्थितीत शिक्षण सोडण्याची वेळ मोठ्या प्रमाणावर मुला-मुलींवर आली. आता यांचे शिक्षण होऊच शकत नाही असा विचार मनात आला आणि यांच्यासाठी काहीतरी केले पाहिजे असे वाटू लागले. त्यातूनच उदयास आला शांतिवनचा तारांगण प्रकल्प. या प्रकल्पात आज चाळीसच्या वर मुले-मुली शिक्षण घेत आहेत. आपले स्वप्न आता अपूर्णच राहील अशी ज्यांना भीती वाटत होती त्या मुलांच्या पंखात शांतिवनने बळ दिले.

याच मोहिमेत भेटलेली मंदाकिनी. तिची ही गोष्ट. केज तालुक्यातील देवगाव हे गाव. गावातील गणपती लिंबाजी नागरगोजे हे शेतकरी. खरे तर पाच एकरचे शेतीमालक; पण सावकाराने टाकलेल्या फासात साडेचार एकर जमीन गिळंकृत केली. यामुळे उरलेल्या अर्धा एकर जमिनीवर शेती करीत शेतमजूर होण्याची वेळ या माणसावर आली. गणपतरावला दोन पत्नी सुनंदा आणि आशाबाई. पहिली पत्नी सुनंदा हिला तीन मुली झाल्या. ऊसतोड कामगार मजुरांत शिक्षणाचा अभाव असल्याने प्रचंड अज्ञान. मुलगा हवाच ही प्रचंड इच्छा आणि तो होत नाही मुलीच होतात याचा दोष पत्नीवर देऊन मुलासाठी दुसरे लग्न करण्याची घाई. गणपतरावनेही हेच केले. मुलगा होत नाही म्हणून आशाबाई सोबत दुसरे लग्न गेले. तिलाही चार मुली आणि एक मुलगा झाला. बारा-तेरा माणसांचे कुटुंब चालवायचे म्हणजे मोठी कसरत. थोडी जमीन आणि ऊसतोड करूनही घरातील आर्थिक जुळवाजुळव करणे कठीण. त्यातच मुली मोठ्या होऊ लागल्या.

एक एक करीत पाच मुलींचे लग्नही करून टाकले. मिळतील त्या मुलांना मुली देऊन मोकळे होणेच गणपतरावने पसंत केले; पण कुटुंबाचा रोजचा खर्च करण्याइतपतही पैसे मिळत नसताना लग्न करणे म्हणजे मोठे कठीण काम. मग त्यांनी जवळच्याच एका सावकाराकडे जमीन गहाण ठेवून पन्नास हजारांचे कर्ज घेतले. प्रत्येक वर्षी एका मुलीचे लग्न करताना नाकात दम येत होता; पण समोर आलेले कर्तव्य पार पाडणे त्यांना महत्त्वाचे वाटत होते. सावकाराचे घेतलेले कर्ज प्रचंड मोठ्या व्याजदरामुळे वर्षात दुपटीने वाढत चालले होते.  उत्पन्नाचे साधन नाही, कुणाची मदत नाही, खर्च मात्र सुरूच होता. सावकाराचा रोज तगादा असूनही त्याचे कर्ज जात नव्हते. रोज घरी येऊन सावकार सारखी पैशाची मागणी करायचा, खाली पाडून बोलायचा. लग्नासाठी पैसे घेतलेल्या इतर लोकांच्याही घरी चकरा सुरूच होत्या. हे सर्व टेन्शन असतानाच सहावी मुलगी मंदाकिनी ही लग्नाला आलेली. तिची इच्छा तर शिकायची; पण परिस्थिती नसल्याने शिक्षण काय देणार...? आपण आपल्या मुलीला शिक्षण देऊ शकत नाही याचीही खंत गणपतरावच्या मनाला सारखी बोचत होती; पण सारे काही निमूटपणे सहन करीत बसण्याशिवाय दुसरा कुठलाही पर्याय त्यांना सुचत नव्हता.

या विवंचनेत असतानाच एक दिवस सावकाराने निरोप पाठवला, ‘आठ दिवसांत पैशाची व्यवस्था झाली नाही तर शेतीवर कब्जा करण्यात येईल. जिवापाड जपलेली वडिलोपार्जित शेती सावकाराच्या घशात फुकटात जाणार ही कल्पनाही गणपतरावला सहन होणारी नव्हती. परिस्थितीपुढे सारे काही सहन करीत शांत बसण्याशिवाय दुसरा काही पर्याय नव्हता. मराठवाड्यातील सावकारकीने अनेकांचे प्रपंच स्वत:च्या घशात घालून त्यांना देशोधडीला लावले आहे. आता गणपतची बारी आली होती. एकमेव आधार असणारी आपली जमीन गेली तर इतर सावकारांची देणे आपण देणार कसे..?  राहिलेल्या दोन मुलींची लग्न, मुलाचे शिक्षण करणार कसे..?  या प्रश्नाचे उत्तर त्याला स्वत:ला सापडत नव्हते. गणपतराव सावकाराकडे गेले. धाय मोकलून रडले. ‘माझी जमीन घेऊ नका माज्या लेकरांची ती भाकरी आहे...  मी माज्याकडे आले की तुमचे पैसे व्याजासह परत देईल,’ अशी विनंती शंभरदा करू लागले.

ऐकेल तो सावकार कसला..? गणपतराव पैसे देऊ शकले नाही. शेवटी सावकाराने जमीन ताब्यात घेतली. गणपतराव नागरगोजे आणि परिवाराला रस्त्यावर आणणारी ही घटना होती. या घटनेने गणपतरावला मोठा धक्का बसला. ते एकटे एकटे राहू लागले. घरात चीड चीड करू लागले. सारखा तो विचार त्यांना सोडत नव्हता. आता आपले होणार कसे याच चिंतेने त्यांना ग्रासले होते. शेवटी व्हायचे तेच झाले. गणपतरावचा छोटा भाऊ गावात  धापा टाकत पळत आला. दादाने फाशी घेतली म्हणून ओरडून लोकांना सांगू लागला. गणपतरावचा परिवार आणि गावातील इतर लोक शेताकडे धावत सुटले. लिंबाच्या झाडाला दोर बांधून गणपतने स्वत:ला लटकवून घेतले होते. साऱ्या परिवाराने एकच टाहो फोडला... आता सारे संपले होते.
मंदाकिनीच्या आईने सांगितलेली ही हकीकत ऐकून सावकारकी आणखी किती बळी घेणार? असा प्रश्न मी स्वत:लाच विचारला; पण त्याचे उत्तर मला अजूनही मिळालेले नाही. मी मंदाकिनीला विचारले, ‘तू काय करतेस ...?’ ‘माझी बारावी झालीय...’
‘पुढे शिकणार का...? ’ ‘आता कोण शिकवणार...?’   

तिच्या या प्रश्नावर उत्तर शोधायचे मी ठरवले. तिला विचारले, ‘तुला काय शिकायचे आहे...?’  त्यावर ती म्हणाली, ‘लवकर जॉब मिळेल म्हणून नर्सिंग करेल मी.’ ‘ओके,’ म्हणालो मी.  शांतिवनचे विश्वस्त सुरेश जोशी यांना फोन लावला. मंदाकिनीसाठी आपल्याला काहीतरी करायचे आहे, असे सांगितले. त्यांनी लगेच दिशा परिवारचे राजाभाऊ चव्हाण आणि विजय जोशी यांना विनंती केली. ते काही मदत करायला तयार झाले. उर्वरित मदत शांतिवन करेल असा निर्णय सुरेश जोशी आणि इतर विश्वस्तांनी केला.  मंदाकिनीच्या पैशाची संपूर्ण व्यवस्था करण्यात आली. तिला केज येथील नर्सिंग महाविद्यालयात जीएनएमसाठी प्रवेश घेऊन दिला. तिनेही त्याची जाणीव ठेवत खूप अभ्यास केला. आता मंदाकिनी नर्सिंगच्या तिसऱ्या वर्षात शिकत आहे. अशा कितीतरी मंदाकिनींना आधाराची गरज आहे. समाजातील चांगल्या व्यक्तींनी त्यांच्या पाठीशी उभे राहायला हवे... 
वंचित मुलांची मोठी झेप घेण्याची क्षमता असते; पण फक्त त्यांच्या पंखात बळ ओतणारा कुणीतरी हवा असतो...! 
( deepshantiwan99@gmail.com )

Web Title: Force to be winged

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.