आसू आणि हसू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2018 06:07 PM2018-03-10T18:07:24+5:302018-03-10T18:12:06+5:30

विनोद : ज्या विनोदी लिखाणाला कारुण्याची झालर असते ते श्रेष्ठ समजले जाते. काळ बदलला असल्यामुळे उलटे शिवणकाम करून कारुण्याला विनोदाची झालर लावण्याचा हा आमचा आगाऊ खटाटोप आपल्यासाठी सादर.

tears and Smile | आसू आणि हसू

आसू आणि हसू

googlenewsNext

- आनंद देशपांडे

नि म्हणजे होते काय की समजा आपण आपले आयुष्य एकाच गावात काढलेले असले की ओळखी पाळखी भरपूर होतात. आपले बरेच नातेवाईक त्याच गावात असतात. मग आमच्यासारख्या घरातील कर्त्या(?) पुरुषाला वर्षभर दोनच महत्त्वाची कार्ये असतात. त्यापैकी एक म्हणजे ‘विवाह सोहळ्याला हजेरी लावणे’ आणि दुसरे म्हणजे ‘अंत्यविधी अटेंड करणे’. मरणाला आणि तोरणाला हजर असले पाहिजे हे ज्येष्ठ मंडळींनी मनावर बिंबवले असल्यामुळे आमचे अर्धे आयुष्य या दोन संवैधानिक जबाबदार्‍या पार पाडण्यात जात असते. सकाळी सात वाजता किंवा रात्री अकरा वाजल्यानंतर येणारा फोन सहसा या पृथ्वीतलावरून कुणीतरी एक्झिट घेतली आहे असे सांगणारा असतो. सकाळी सात वाजता फोन करणार्‍या स्नेह्यांचा उत्साह ओसंडून जात असतो. ‘अरे तो आपला अमुकतमुक आहे ना, त्याचे आजोबा काल वारले बरे का’. मग आपण निर्विकारपणे विचारतो, ‘किती वाजता?’. पुढे तो सांगायला लागतो, नेमके किती वाजता गेलेत माहीत नाही, पण चार पाच दिवस झाले अ‍ॅडमिट होते म्हणे. मला त्याचा फोन आला होता, सगळ्यांना निरोप दे म्हणून, मग पहिला फोन तुला लावला. पहिला फोन येण्याचा हा बहुमान मला खूप वेळा मिळालेला आहे. मग आपण पहिलाच निर्विकारपणा मागील पानावरून पुढे सुरू ठेवत विचारायचे, ‘अंत्यविधी किती वाजता आहे?’. याचे उत्तर तो सविस्तर देतो. सगळे जण आलेले आहेत फक्त त्यांची पुण्याची मुलगी आणि जावई पहाटेच निघालेत चार वाजता. आत्ता फोन केला तर ते नगरपर्यंत आलेले होते. ते येतील अकरा वाजेपर्यंत. साधारण बारा वाजतील. ‘येतो’ असे म्हणून आपण फोन कट करतो तोवर आजच्या आपल्या दिवसाचे बारा वाजलेले आहेत हे आपल्या लक्षात आलेले असते.

सकाळी लवकर तयार होऊन हापिसात जाऊन साहेबांनी आजच पूर्ण करा म्हणून दिलेले काम, साहेबांचा डॉबरम्यानसारखा चेहरा आणि त्यांच्यासमोर अंत्यविधीला जाण्यासाठी परवानगी मागणारा आपला शेळीसारखा गरीब चेहरा डोळ्यासमोर तरळून जातो. अकरा वाजता येणारी मुलगी आणि जावई बारा वाजेपर्यंत पोहोचतात. त्यानंतर किमान अर्ध्या तासाने तो प्रसिद्ध डायलॉग म्हणजे, ‘हां, उचला आता’ आला की तिथून पुढे दोन तास अंत्यविधी उरकून घरी परत जायचे. स्मशानात जाऊन आपण निवांत एखाद्या टोळक्याशी गप्पा मारत बसावे. श्रीदेवीचा मृत्यू नेमका कशामुळे झाला इथपासून ते मोदी नेमके कुठे चुकतोय इथपर्यंत बर्‍याच विषयांच्या आपल्या ज्ञानात भर पडत असते. बॉडीच्या आसपास तुम्ही असाल तर, ‘मोठमोठी लाकडं खाली घ्या, नीट रचा रे, नाहीतर ढासळेल, हे लाकूड डोक्याखाली ठेव रे’ अशा नेहमीच्याच मौलिक सूचना ऐकायला मिळतात. 

दरम्यान, गावाकडून आलेला एक गडी रॉकेलचा डबा दागिन्याची मौलिक पेटी सांभाळावी तसा घेऊन बसलेला असतो. त्याचा मोबाईल वाजतो. ज्याची रिंगटोन असते, ‘मला जाऊ द्या ना घरी आता वाजले की बारा’. गडबडीत त्याला मोबाईल सापडत नाही, तो खिसे चाचपडतो तोपर्यंत गाणे सुरूच असते. आपल्याला काळजी वाटायला लागते की याने फोन कट नाही केला तर मयत आजोबा उठून याच्या गालफाडात ठेवून देतील की काय? किंवा आजोबांचे रेकॉर्ड रसिकतेचे असेल तर उठून नाचायला लागतील का, अशी पण काळजी वाटायला लागते. एकदाची चिता पेटते आणि आपण चुळबुळ करायला लागतो तसे तिथे जमलेल्यांपैकी एक सेवानिवृत्त चुलबुल पांडे ‘पंधरावा अध्याय घ्या’ असा आदेश सोडतात आणि मग छंदासी यस्य पर्णानि खड्या आवाजात ऐकवतात.

ते संपत आले की आपण पुन्हा घड्याळाकडे नजर टाकतो. एक वाजलेला असतो. आता निघता येईल अशी सुटकेची अंधुक जाणीव होईपर्यंत कुणीतरी शोकसभा घ्या, अशी सूचना करते. सूत्र-संचालनाची हौस न भागलेला एक कार्यकर्ता कुणी न सांगताच सूत्रे हातात घेतो आणि एकेकाला बोलण्याच्या सूचना करतो. काही साहित्य छापण्याचा गुन्हा केलेला असल्यामुळे आम्हासही बोलण्याचा आग्रह होतो, पण अशा वेळी मूळचा गंभीर चेहरा आणखीनच सुतकावून आम्ही नम्र नकार देतो. परत फिरताना कुणीतरी दिलेला लिंबाचा पाला घेऊन आपण निघतो तोवर दोन वाजलेले असतात. दरम्यान अंत्यविधी संपायच्या म्हणजे कवटी फुटल्याचा आवाज येण्याच्या आत घरी फोन करून, ‘गरम पाणी सोडण्याचा’ आदेश देणारे दोन चार महाभाग असतात. असा आदेश आपण आपल्या घरी देऊ शकत नाहीत हे जाणवून आपण आणखीनच गंभीर होतो. घरातील पुढचे डायलॉगपण ठरलेलेच असतात. ‘इकडे शिवू नको, अंगणातून ये, कपडे भिजवून टाक’ इत्यादी. कडक पाण्याने आंघोळ करून आपण जेवायला बसतो. आतडे बिचारे खवळलेले असतात. कोण गेले यापेक्षा पोटात काय येत आहे याकडे त्यांचे लक्ष असते. दिवसभराच्या थकव्याने आपण लवकर झोपी जातो. रात्रीचे अकरा वाजलेले असतात. आपण झोपेतच फोन उचलतो आणि दोनच प्रश्न विचारतो आणि ते म्हणजे कोण? आणि कधी? आणि तुम्ही म्हणता मृत्यू हा गंभीर विषय आहे म्हणून...

( anandg47@gmail.com )

Web Title: tears and Smile

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.