प्राचीन भोगवर्धन येथील यादवकालीन रामेश्वर मंदिर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2018 07:41 PM2018-06-23T19:41:46+5:302018-06-23T19:54:16+5:30

स्थापत्यशिल्प : जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्याच्या गावचा इतिहास विस्मृतीत गेला असला तरी महाराष्ट्राच्या किंबहुना प्राचीन भारताच्या नकाशावरचे ते एक महत्त्वपूर्ण नगर आणि व्यापारी केंद्र होते. भोगवर्धन अथवा भोगावती नावाची प्राचीन वस्ती, सातवाहन काळाचा वैभवशाली इतिहास उराशी बाळगून आहे. भोगवर्धनवासी दानकर्त्यांचे लेख, भाजे लेणी, भारुत, सांची येथील स्तुपांवर इस पूर्व पहिल्या शतकापासून सापडले आहेत. २००० वर्षांपूर्र्वी प्रचलित असलेल्या, दक्षिणपथ व रोमन व्यापारी मार्गावरील तसेच सातवाहनांची राजधानी पैठण याच्या सान्निध्यातील भोकरदन हे प्रमुख शहर व जनपद होते. सातवाहन काळात, पैठण (प्रतिष्ठान) व तेर ( तगरपूर) शहरानंतर तिसऱ्या क्रमांकाचे संपन्न शहर होते.

Rameshwar Temple of Yadavam in ancient Bhogvardhan | प्राचीन भोगवर्धन येथील यादवकालीन रामेश्वर मंदिर

प्राचीन भोगवर्धन येथील यादवकालीन रामेश्वर मंदिर

googlenewsNext

- साईली कौ. पलांडे-दातार

प्राचीन भोकरदनची वस्ती केळना नदीच्या काठी होती. १९५८ साली तत्कालीन मराठवाडा आणि नागपूर विद्यापीठाने तेथे उत्खनन पार पाडले. सातवाहनकालीन वस्तीचे अवशेष तर मिळालेच सोबत आहत नाणी, मृण्मूर्ती, विविध मणी, धातूच्या वस्तू, शंखाच्या बांगड्या, बौद्ध धर्मातील पूजेच्या वस्तू, हस्तिदंती वस्तू असा मोठा खजिना मिळाला. पण, सर्वात महत्त्वाची वस्तू होती एक सुबक हस्तिदंती स्त्रीमूर्ती जी दरवाजाची कडी म्हणून वापरात असावी. या मूर्तीसारखी दुसरी प्रतिकृती रोममधील पॉम्पि शहरात मिळाली. पॉम्पि शहर वेसुवियस ज्वालामुखीच्या उद्रेकात खाक झाले होते. या विलक्षण संबंधांवरून सातवाहनकालीन भारत-रोम व्यापारी देवघेवीची पुरेपूर कल्पना येते. उत्तर सातवाहन काळात येथे लज्जागौरी, शिवलिंग व नरसिंहाचे अंकन असलेल्या मृण्मुद्रा सापडल्या आहेत. सहाव्या शतकात, शंकरगण ह्या  महिष्मतीस्थित कलचुरीवंशी राजाने भोकरदन भागातील जमीन ब्राह्मणाला दान दिल्याचा उल्लेख अभोणा ताम्रपटात मिळतो. ह्याच काळातील एक सुरेख वैष्णव खोदीव लेणं आजही केळणा नदीकाठी आहे. चालुक्य जयसिंह दुसरा याचा मांडलिक राष्ट्रकुट राजा कान्हारदेव याच्या ताम्रपटातील ‘विषय’ प्रत्ययावरून भोकरदन हे जिल्हास्तरीय ठिकाण होते, असे म्हणता येते.

दंडकारण्य क्षेत्रातील उज्जैनच्या मार्गावरचे भोकरदन हे समृद्ध शहर होते, असे मार्कंडेय पुराणात उल्लेख सापडतात. स्थानिक दंतकथा या नगराला कृष्णशत्रू भौमासुराची राजधानी मानते. दंतकथेनुसार याचे नाव भोगवर्धन किंवा भगदनाथ या राजाच्या नावाचा अपभ्रंश होऊन झाले असावे. केळनेतीरीच्या खोदीव लेण्यापासून, मुख्य वस्तीपासून काही अंतरावर यादवकालीन रामेश्वर मंदिर आहे. आज तिथे चक्रधर स्वामींचा ओटा आहे म्हणून महानुभाव मठ आहे व श्रीकृष्ण मंदिर आहे. मंदिराच्या परिसरात यादवकालीन अवशेष विखुरले आहेत. मंदिर पूजेत असल्यामुळे मंदिराची मोठ्या प्रमाणात डागडुजी झाली आहे व जागेत बदल केल्यामुळे मूळचे स्वरूप समजणे जरा कठीण झाले आहे. मंदिर उंच पिठावर बांधले आहे. पायऱ्यांवर मध्ययुगीन नक्षीकाम आहे. दर्शनी भागी दोन ते तीन फूट उंचीची भिंत आज शिल्लक आहे.

मंदिराची मुख्य द्वारशाखा आकर्षक असल्यामुळे लक्ष वेधून घेते. पंचशाखा द्वारशाखेवर रत्न व स्तंभ शाखा ठळक असून, इतर शाखा साध्या आहेत. मंदिराला ललाटबिंब व वरचे शिल्पकाम शिल्लक नाही. सभामंडप बंद होता की अर्धखुला, याची आज कल्पना करता येत नाही. शिखराचा कुठलाच भाग आज शिल्लक नाही. सभामंडप चौकोनी असून पंचरथ आहे. खुर, कणी, कुंभ असे नक्षीविरहित थर आहेत. त्यातील कुंभ भागावर रत्नांची पट्टी सर्व मंदिराभोवती फिरते. सभामंडपाच्या भिंती आधुनिक असल्या तरी मधल्या जागेतील चतुष्की अजून अबाधित आहे. मधला स्तंभ मध्यावर आणि स्तंभांच्या तळाशी अप्रतिम शिल्प केले आहे. नागशीर्ष असलेले स्तंभ वरपासून वर्तुळाकार, चौरस, अष्टकोनी, चौरस अशा विविध आकाराच्या आडव्या छेदाचे आहेत. स्तंभ तळावरील मूर्तींमध्ये विविध सूरसुंदरी व अप्सरांच्या मूर्ती कोरलेल्या आहेत. बहुतांशी मूर्तींच्या हातात म्हाळुंग दिसते.

महिषासुरमर्दिनी रेड्याचे शीर कापून बाहेर पडणाऱ्या महिषासुर दैत्याशी भाल्याने लढताना दाखविली आहे. एका स्तंभावर चामुंडा व खटवांग त्रिशूळ घेतलेला भैरव नृत्य मुद्रेत दाखवले आहेत. वाली सुग्रीवाच्या द्वंद्वाचे प्रभावी शिल्पांकन दोन तीन स्तंभ चौकटीत केले आहे. तर बाजूच्या चौकटीत राम लक्ष्मणाबरोबर उभा असून, बाण मारताना दाखवला आहे. काही दृश्यांमध्ये वानरांचे राक्षसाशी युद्ध दाखवले आहे. राम व लक्ष्मणाच्या हातात पुरुषभर उंचीचे धनुष्य कोरले आहेत व हातात बाणांचा जुडगा दिसतो. रामायणातील रामाद्वारे सुवर्णमृग रूपातील मारिच वधाचे अंकन ही प्रभावी आहे. नृत्यमग्न सुंदरी, वादक, वानर सभा अशी आणखी काही दृश्ये कोरली आहेत. बलशाली भीम, एका हाताने हत्तीचा पाय धरून भिरकावतानाचे महाभारतातील प्रसंग इथे कोरला आहे. विविध केशभूषा असलेल्या मनुष्यांची ढाल, तलवार व भाल्यांची लढाई उत्कृष्ट कोरली आहे. सभामंडपात चक्रधर स्वामींचा ओटा आहे व गाभाऱ्याच्या जागेत स्वामींचे पाषाण आणि श्रीकृष्णाची आधुनिक मूर्ती पूजल्या आहेत.

भोकरदनला दुसऱ्या तिसऱ्या शतकापासून वैष्णव देवता, तसेच लज्जागौरी स्वरुपातील देवीची पूजा प्रचलित होती, असे दिसते. तसेच, सहाव्या शतकातील वैष्णव लेण्यामध्ये, शेषशायी विष्णू, मदन, बलरामांची शिल्पे कोरलेली आढळतात. तेराव्या शतकातील रामेश्वर मंदिरातही द्वारपाल वैष्णव आहेत. तसेच मंदिरावर रामायण महाभारतातील प्रसंग कोरले आहेत. महानुभाव संप्रदायाचे प्रवर्तक चक्रधर स्वामींचा ह्या भागात खूप संचार असे व ते बऱ्याचदा अशा मंदिरांमध्ये आसरा घेताना दिसतात. वैष्णव मंदिरात मुक्काम करणे तर अधिकच संयुक्तिक वाटते. मधल्या संक्रमणाच्या काळात मूळ मंदिराचा विध्वंस झालेला आहे. किंबहुना ह्या भागाचे आधीचे नाव बेचिराग आहे, असे ऐतिहासिक नोंदींवरून समजते. ह्या धामधुमीच्या काळातही इथल्या कृष्णासंबंधित पौराणिक संदर्भ जिवंत राहिले, तसेच महानुभाव संप्रदायाने चक्रधर स्वामींचे ठिकाण ओळखून त्याचा जीर्णोद्धार केला. एकापरीने अनेक स्थित्यंतरांमधूनही वैष्णव केंद्र असलेल्या भोगवर्धनाचे ऐतिहासिक आणि धार्मिक महत्त्व ढळले नाही, ही विलक्षण गोष्ट आहे. आज मात्र, भोगवर्धनाच्या गतवैभवाची नव्याने ओळख करून त्याच्या संवर्धनासाठी आवश्यकता आहे!
 ( sailikdatar@gmail.com )

Web Title: Rameshwar Temple of Yadavam in ancient Bhogvardhan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.