इथे फुलांना मरण जन्मत:

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2018 07:56 PM2018-06-23T19:56:23+5:302018-06-23T19:56:56+5:30

दिवा लावू अंधारात : ऊसतोड कामगारांच्या आयुष्यात सुखे क्वचितच डोकावतात. दु:खाने तुडुंब भरलेल्या जीवनात सुखाची चाहूल जरी लागली तरी मन मस्त हिंदोळ्यावर आनंदाचे हेलकावे घेत राहतं; पण दुर्दैवाने हे स्वप्नातही कधी दिसत नाही. मजबुरीतून चालणाऱ्या बालविवाहाच्या प्रथेने तर कितीतरी कोवळ्या कळ्या खुडून टाकल्या आहेत. चुरगाळून टाकल्या आहेत. वरवरच्या कितीही प्रयत्नाने काही केल्या ही प्रथा संपत नाही. यावर कायमस्वरूपी उपाययोजना जोपर्यंत केली जात नाही तोपर्यंत ती संपवण्याची भाषा म्हणजे बोलाचीच कढी आणि बोलाचाच भात ठरणार आहे.

Here flowers are born dead: | इथे फुलांना मरण जन्मत:

इथे फुलांना मरण जन्मत:

googlenewsNext

- दीपक नागरगोजे 

आष्टी तालुक्यातील लिंबोडी हे छोटेसे गाव. सातत्याने पडणाऱ्या दुष्काळी भागात गाव वसलेले असल्याने पावसाच्या पाण्यावर अवलंबून असणाऱ्या एका पिकावर आधारित जिरायती शेती. कितीही कष्ट केले तरीही पोट भरायची मारामारच. पर्यायी रोजगाराचा उद्योग म्हणजे ऊसतोडीला जाणे. याच गावातील रहिवासी बाजीराव घुगे आणि कस्तुराबाई घुगे हे ऊसतोड कामगार दाम्पत्य. दोन मुली, दोन मुले आणि वृद्ध आई-वडिलांची जबाबदारी यांच्यावर असल्याने वडिलोपार्जित असणाऱ्या माळरानाच्या दोन एकर जमिनीवर कुटुंबाचा उदरनिर्वाह चालणे अशक्यच. म्हणून वर्षातील आठ महिने पाठीवर बिºहाड घेऊन जाणे क्रमप्राप्तच. मोठी मुलगी आशा तेरा वर्षांची झाली. मुलगी मोठी दिसू लागली की आई-बापाच्या जिवाला घोर लागतो.  एखादं मागणं आलं की जमेल तसं लग्न करून देऊन जबाबदारीतून मुक्त होऊ याच विचारात हे दाम्पत्य असतानाच जवळच्याच  मताकुळी गावातील ऊसतोड कामगार नारायण बांगर यांच्या राजेंद्र या मुलासाठी आशाला मागणं आलं.

लग्न ठरले आणि तेरा वर्षांच्या आशाचा २० वर्षीय राजेंद्रशी विवाह करून दिला. राजेंद्र आई-वडील आणि भाऊ यांच्यासह ऊसतोडणीसाठी कारखान्यावर जात असत. ऊसतोडणी करीत असतानाच तो ऊस वाहतूक करणारी ट्रक चालवायची शिकला. चांगली चालवता येऊ लागल्यावर उसाच्या ट्रकवर ड्रायव्हर म्हणून त्याने नोकरी धरली.  शिकण्याचे, हसण्या-खेळण्याचे वय असलेला तेरा-चौदा वर्षांचा लहानसा जीव सासू-सासरे आणि पतीसोबत ऊसतोडणीसाठी कारखान्यावर जाऊ लागला. काबाड कष्ट करीत संपूर्ण बालपण उसाच्या फडात कोमेजून टाकण्याशिवाय दुसरा मार्ग तिच्याकडे उपलब्ध नव्हता. बघता बघता काही वर्षे निघून गेली. कष्टाचं धावपळीचं आयुष्य आता तिच्या अंगवळणी पडलं होतं आणि तिने ते विनातक्रार स्वीकारलंही होतं. याच दरम्यान आशा आणि राजेंद्रला दोन मुलं झाली. सचिन आणि समर्थ. तिच्या वयाच्या मुली दहावी-अकरावीत शिकत असतील तेव्हाच आशा दोन लेकरांची पोक्त बाई झाली होती. दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी मुकादमाकडून उचल घेऊन आशा पती आणि सासू सासऱ्यांबरोबर कोल्हापूर जिल्ह्यात ऊसतोडणीसाठी गेले. आशा सासू-सासऱ्यांसोबत ऊसतोड करायची, तर राजेंद्र कारखान्यावर ऊसवाहतूक करणारी ट्रक चालवायचा.

रात्रंदिवस चालणाऱ्या कामात मुकादमाची घेतलेली उचल फेडण्याचा घोर कायम असायचा. त्यामुळे उपाशीतापासी, जागरण करीत सारखी धावपळ करीत हे कुटुंब काम करीत होते. दिवसभराचे काम संपवून आशा सासू-सासऱ्यांबरोबर सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास कोप्यावर आली. पहाटे तीन वाजता पुन्हा उसाच्या फडात जाऊन काम करायचे असल्याने लवकरच जेवण उरकून सर्वजण झोपी गेले. दिवसभर अंगमेहनतीचे काम केल्यामुळे थकून गेलेले शरीर अंथरुणावर टाकल्याबरोबर गाड झोप लागते. फड संपला की दुसऱ्या फडात बिºहाडं उचलावी लागतात म्हणून बागायतदाराने उपलब्ध करून दिलेल्या मोकळ्या जागेत कोप्या ठोकाव्या लागतात. इथे लाईट नसते. शुद्ध पाणी नसते आणि आजूबाजूला वाढलेल्या गवताळ शेतीमुळे साप, विंचू, लांडगे, रानडुकरं या वन्यजिवांची प्रचंड दहशतच असते .

रात्रीचे बारा वाजले असतील. सर्व जण गाढ झोपेत असल्याने कोप्यावर काळोख आणि स्मशान शांतता पसरलेली. प्रत्येक बिºहाड आपापल्या कोपीत शांत झोपलेलं. इतक्यात कुणीतरी धावत कोप्यावर आलं. सर्वांना आवाज देत उठवू लागलं. बाहेर कुणी माणूस आवाज देतोय हे ऐकून प्रत्येक जण दचकून जागे होत पटकन कोपीच्या बाहेर येऊ लागला. त्याच्याकडे जात काय झाले म्हणून विचारू लागला. सर्वच जण कान टवकारून ऐकू लागले. एव्हड्या रात्री हा माणूस कारखान्यावरून एक वाईट खबर सांगण्यासाठी आला होता. ‘कारखान्यावर गेलेल्या उसाच्या ट्रकचा अपघात झाला आणि त्यात ट्रकचालक असणारा आशाचा नवरा राजेंद्र बांगर हा जागीच ठार झालाय...’  ही इतकी वाईट बातमी त्याने सांगितली. कोप्यावर एकच आरडा झाला. राजेंद्रचे आई-वडील, आशा बरोबर असणारे इतर नातेवाईक धाय मोकलून रडू लागले.

घडायचे ते घडून गेले. दवाखान्यात पडलेला राजेंद्रचा मृतदेह गावी आणला. शोकाकुल वातावरणात त्याच्यावर अंत्यसंस्कार झाले. राजेंद्रच्या अवेळी जाण्याने अनेक प्रश्न निर्माण झाले होते. अठरा वर्षांची आशा लग्नाच्या वयाच्या आतच विधवा झाली. चार वर्षांचा सचिन आणि दोन वर्षांच्या चिमुकल्या समर्थचे आभाळ फाटले. वृद्धत्वाकडे झुकलेल्या आई-वडिलांवर दु:खाचा डोंगर कोसळला. राजेंद्रच्या आई-वडिलांना अजून दोन मुलं आहेत म्हणून तरी त्यांना जगण्यासाठी आधार होता; पण ऐन तारुण्यात उभा राहिलेला आशाचा जगण्याचा प्रश्न, चिमुकल्या सचिन आणि समर्थच्या पालनपोषण आणि शिक्षणाचा प्रश्न कसा सुटला जाणार..? अशिक्षित लहान आशा या संकटाना कशी सामोरी जाणार...? बालाघाटातील अशिक्षित ऊसतोड कामगारात अज्ञान म्हणा की आंधळे प्रेम पण अपवाद म्हणून सोडले तर एक प्रवृत्ती सर्रास दिसून येते. ती म्हणजे कर्त्या मुलाचा अवेळी मृत्यू झाला की, आई-वडिलांचे लक्ष्य आणि प्रेम दुसऱ्या मुलाच्या संसारवर केंद्रित होते.

अशा वेळी मरण पावलेल्या मुलाच्या बायको मुलांवर प्रचंड अन्याय केला जातो. त्यांना वेगळे टाकले जाते. असणाऱ्या थोड्याफार जमीन जुमल्याच्या संपत्तीतून त्यांना बेदखल केले जाते. मुलांचे पालनपोषण, शिक्षण या गोष्टींवरही लक्ष दिले जात नाही. एकट्या बाईची यांच्यासमोर जबाबदाऱ्या निभावताना दमछाक होते; पण कुणाला त्याचे कसलेही सोयरसुतक राहत नाही. शांतिवनच्या इतक्या वर्षांच्या कामात ही गोष्ट मला प्रकर्षाने जाणवली आहे. राजेंद्रच्या मृत्यूनंतरही बांगर परिवाराने आशाच्या बाबतीत हेच केले. तिच्या वाट्याला येणारी एक एकर जमीनही तिला दिली नाही. उलट तिला वेगळे देऊन तरण्या मुलीला दोन छोट्या मुलांसोबत वेगळे टाकले. 

दोन पाखरांना घेऊन ती एकटीच राहत होती. इकडे लिंबोडीत राहणाऱ्या तिच्या आई-वडिलांना आपल्या लेकीला भोगाव्या लागत असणाऱ्या यातना पाहून खूप वाईट वाटायचे; पण त्यांच्याही कपाळी आलेले अठराविश्व दारिद्र्य काळजी आणि दु:ख व्यक्त करण्यापलीकडे काही करू देत नव्हते. तिच्या आयुष्याचा लढा ती एकटी लढत होती. मिळेल ती मजुरी करून कधी स्वत: उपाशी राहून तर कधी लोकांच्या वाईट नजरेतून स्वत:ला लपवत दोन चिमुकल्यांच्या मुखी चारा घालण्याचे काम ती हिमतीवर करीत होती. अशीच एक दिवस तिच्या माहेरी ती असताना गावातील एका शिकलेल्या व्यक्तीने तिच्या वडिलांना शांतिवनच्या कामाबाबत सांगितले. त्यांनी लगेच मला फोन करायला सांगितला. फोनवर बोलणे झाले पुसटशी हकीकतही त्याने सांगितली. दुसऱ्या दिवशी सचिन कुंभारक आणि नारायण काळे या कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन मी लिंबोडी गाठले.

गावात चौकशी करीत बाजीराव घुगे यांच्या घरी गेलो. आशा आणि दोन लेकरं तिथेच होती. बाजीराव घुगे यांच्या घरातील चित्र पाहता हे असाह्य माता-पिता आशाला आणि तिच्या लेकरांना काही मदत करू शकतील असे अजिबात वाटले नाही. आशा आणि बाजीराव काकांनी अशावर कोसळलेली संपूर्ण परिस्थिती सांगितली. तिनं सहन केलेलं, तिनं सोसलेलं ऐकतानाही अंगावर काटा उभा राहत होता. डोळे भरून येत होते. कुण्यातरी लेखकाचे चार शब्द मनात घोंगाऊ लागले,  ‘इथे फुलांना मरण जन्मत: ...!’

सर्व काही शांतपणे ऐकून आम्ही आशा आणि तिच्या मुलांसाठी काहीतरी करू शकतो हे सांगितल्यावर आशाच्या आई-वडिलांच्या चेहऱ्यावर आनंद दिसू लागला. आता तुम्हीच आशाचे माय-बाप व्हा असे केविलवाणे ते म्हणत होते. मी ‘काळजी करू नका, सर्व काही व्यवस्थित होईल. आम्ही सर्व प्रयत्न करू, असे सांगितले. आशाच्या मुलांना शिक्षण, पालनपोषणासाठी दत्तक घेऊन तिलाही शांतिवनमधील मेसमध्ये स्वयंपाक करण्याचे काम देऊन तिच्या कायम रोजगाराची व्यवस्था करू, असे सांगितल्यानंतर संपूर्ण परिवार आणि आशा आनंदी झाले.  त्यांच्या चेहऱ्यावर दिसणारा आनंद आमच्या कामाचा आम्हालाच अभिमान वाटत होता. इतरांचे दु:ख वाटून घेताना होणारा आनंद जगातील इतर कुठल्याही आनंदापेक्षा मोठा असतो ही जाणीव पुन्हा एकदा त्या क्षणाला होत होती. 

आज आशा शांतिवनमध्ये गुण्यागोविंदाने राहत आहे. मोठा सचिन यंदा पाचवीत गेलाय तर छोटा समर्थ दुसरीत. आशा आता स्वप्न पाहतेय मुलांना खूप शिकवायचे आणि काहीतरी करून दाखवण्यासाठी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचे. शांतिवन आणि आपण सर्व तिच्या पाठीशी असल्याने तिचे हे स्वप्न नक्कीच पूर्ण होईल.

( deepshantiwan99@gmail.com )

Web Title: Here flowers are born dead:

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.