करुणामयी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2018 07:38 PM2018-01-08T19:38:57+5:302018-01-08T19:39:50+5:30

अनिवार : ‘चलो युवा कुछ कर दिखाए’ या ‘रसिकाश्रय’ संस्थेच्या शिबिरातील ती शिबिरार्थी. हृदयात त्याचे शब्द कोरत, जीवाचा कान करून ऐकत होती, त्याच्या मुलाखतीतील त्याचे सच्चे बोल. ती यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजी तालुक्यातील विधि महाविद्यालयात चौथ्या वर्षात शिकणारी, सायबर लॉ करून लीगल अ‍ॅडव्हायझर होण्याचे स्वप्न पाहणारी प्रीती दादाराव ठूल. तो सांगत होता, बाळंतपणात अकाली मृत्यू झालेल्या बहिणीची गोष्ट. त्यामुळे उद्ध्वस्त झालेले कुटुंब, त्या धक्क्याने परागंदा झालेले वडील आणि त्यामुळे आलेले स्वत:चे आणि भाचीचे पोरकेपण. हृदय पिळवटून टाकणारे अनुभव, होणारी होरपळ. हे सारे सोसताना आणि कोणावर अशी वेळ येऊ नये यासाठी होणारी तळमळ. त्यातूनच वयाच्या अवघ्या १९ व्या वर्षी पोरक्या मुलांसाठी आयुष्य वेचायचे हा केलेला निर्धार.

Compassionate | करुणामयी

करुणामयी

googlenewsNext

- प्रिया धारूरकर 

बीड जिल्ह्यातील पाटसरा या दुर्गम खेड्यात ऊसतोड मजूर शेतकर्‍याच्या कुटुंबात जन्मलेले ‘संतोष नारायण गर्जे’ गेवराईच्या ‘आई संस्थेच्या सहारा अनाथालयाचा’ सर्वेसर्वा, सांगत होते गेल्या ८/९ वर्षांतील अनुभव आणि अनाथांसाठी काम करू इच्छिणारे कार्यकर्ते हवे आहेत, असे आवाहनही करीत होते. मनोमन हे आवाहन स्वीकारतच ती शिबिराहून घरी परतली होती. आल्यावर आईला संतोष गर्जे आणि त्यांचे कार्य आणि त्यांच्याबरोबर तिलाही काम करायचेच आहे हे सांगून झाले. त्यांच्यापर्यंत आपला निर्धार पोहोचवायचा होता; पण तिच्याकडे त्यांचा नंबर नव्हता, त्यांच्यापाशी कसे पोहोचावे या विचारात असतानाच आॅगस्ट महिन्यात फ्रेंडशिपडेला त्यांचा मेसेज आला. लगेच तिने फोन करून तिचा त्यांच्याबरोबर काम करण्याचा निर्णय सांगितला. त्यांनी तिची सर्व विचारपूस केली. तिला तिचे लॉचे शिक्षण पूर्ण करण्यास सांगितले. तेथील बिकट परिस्थिती तिला झेपेल का, अशा अर्थाने ते बोलत तेव्हा ती सांगे की, मला सवय नाही; पण सारे काही करायची, सोसायची माझी तयारी आहे हे ती निक्षून सांगे. फोनवर नेहमीच बोलत राहण्याने त्यांच्यात मैत्रीचे नाते निर्माण झाले आणि तिला नेमके पाहिलेले नसतानाही तिच्या विचारांनी विश्वास दिल्यामुळे एक दिवस संतोषजींनी तिला लग्नाची मागणीही घातली. मराठवाड्यात एवढ्या दूर पाठविण्यास आई आणि कुटुंबियांचा तसा नकारच; पण तो नकार होकारात बदलविण्यात प्रीतीला यश मिळाले. प्रीतीचे शिक्षण आणि मोठ्या बहिणीच्या लग्नानंतर लग्न करायचे असे ठरलेले; पण संस्थेतील दोन्ही पाय पोलिओ झालेल्या काऊ नावाच्या मुलाचे रोटरीतर्फे औरंगाबादला आॅपरेशन ठरले आणि त्याची शुश्रूषा करण्यासाठी कोणाच्या असण्याची अगदीच आवश्यकता निर्माण झाली. प्रीतीत आईपण होतेच. घरच्यांनीही साथ दिली आणि ११ नोव्हेंबर २०११ रोजी ११ वाजून ११ मिनिटांनी त्यांचे साधेपणाने लग्न झाले. स्वत:चे मूलपण अजून संपलेले नसताना प्रीती अवघ्या २१ व्या वर्षी ३५ मुलांची आई झाली.

घरमालकाच्या भाचीशी संतोषजींनी लग्न केले नाही हा राग म्हणून घरमालकाने लग्नानंतर लगेचच ३५ मुलांसह या नवदाम्पत्याला घर सोडण्यास भाग पाडले. धर्मशाळेत, मंदिरात आसरा घेत वेळ काढली. त्यावेळी मुलांच्या वेदनेने हरल्याची जाणीव तिला वाटू लागली; पण तिचे प्रेरणास्थान संतोष यांनी तिला सावरले. अशा वेगवेगळ्या समस्यांना तोंड देत, कधी-कधी तर स्वतंत्रतेनेही निर्णय घेत संतोषजींच्या खांद्याला खांदा देत, प्रशासन व इतर व्यवहार सांभाळून कोणत्याही अभिनिवेशाशिवाय शांतपणे मुलांचे संगोपन व्यवस्थित सुरू आहे. तरीही इतर कामांमुळे मुलांना पूर्णवेळ देता येत नाही ही तिची खंत आहे. मुले तिला आई किंवा ताई म्हणतात. तिच्या आश्वासक शब्दांमुळे मुले त्यांच्या मनातले तिच्यापाशी बोलतात, तिला बिलगतात, हक्काने तिचा वेळ मागतात. गेवराईपासून ३ कि.मी. अंतरावर वसलेल्या बालग्रामच्या ३ एकर कॅम्पसमध्ये ३ ते १८ वयोगटातील ८५ बालके आहेत. प्रत्येकाची कहाणी वेगळी, पार्श्वभूमी वेगळी. येथील वेदनेचा स्वर जाती-धर्मापार जाऊन फक्त प्रेम-माया मागणारा. नैतिक, अनैतिक, अनौरस या सगळ्या शब्दांच्या व्याख्या आणि अर्थ येथे काम करताना पूर्ण बदलून गेलेत. कुमारी मातांचे प्रश्न, त्यांचा संघर्ष, घुसमट पाहताना प्रीती अंतर्बाह्य विकसित होतेय. स्वत:चे नाव सार्थक करीत एक व्यक्तित्व तिच्यातून उमलतेय. प्रश्नांना भिडण्याचे सामर्थ्य घेऊन नावगाव नसलेल्या या अभिशापितांना स्वतंत्र ओळख देत, त्यांच्या पुनर्वसनाचे कार्य अहोरात्र चालू आहे. सामाजिकतेच भान जपत दानशूरांच्या सहभागातून सुजाण नागरिक घडवणार्‍या या दाम्पत्याच्या वाटचालीस शुभेच्छा देऊन मी निघाले तेव्हा दोघींच्याही डोळ्यात एका अनुबंधाचा गहिवर दाटून आला होता. 

(priyadharurkar60@gmail.com)

Web Title: Compassionate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.