दुल्हन बनी हैं..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2018 07:28 PM2018-01-08T19:28:48+5:302018-01-08T19:29:27+5:30

ललित : मावळत्या सूर्याची उतरती किरणं मनात उतरू लागली की, फिकट सांजसावल्या अधिक फिकट होत जातात अन् मनाचा गाभारा मात्र स्वस्वरांनी ओथंबून क्षितिजापल्याड वाहवत नेतो. जाणिवांचं बोचकं विस्कळीत होऊ पाहतानाच नेणिवांचं इवलंसं बोट धरून निघून जावंसं वाटतं आठवणींची पांगलेली पालं आयुष्याच्या जत्रेतून परत एकदा सावरायला. ऐन बहरात आलेली जत्रा ओल्या हळदमाखल्या अंगासारखी पिवळीधम्म; पण कच्चा ओला गंध पेरणारी. 

a beautiful path.. | दुल्हन बनी हैं..

दुल्हन बनी हैं..

googlenewsNext

- ज्योती कदम 

जत्रेचं मुरत जाणं तसं गृहीतच असतं; पण अचानक ओल्या गंधाचा ऋतू अचानकच दूर जायला लागतो अन् जाणवत राहते जत्रेची मुरलेली चव... आयुष्याच्या जिभेवर रेंगाळत राहणारी. मागच्या वळणावर सोडून दिलेलं भलंमोठ्ठं शून्य एखाद्या अवखळ मुलाला शिक्षा करावी तसं कोंबडा बनून उभं राहिलेलं... हसूच येतं. 

अरेच्या केवढं मोठं वाटत होतं हे शून्य सुरुवातीला... सारखं सारखं गिरवत राहिलो नि फोडलंच की त्याचं कवच... कोरून कोरून रेखाटलंच शेवटी हवं तसं स्वत:चं स्वप्न. शून्यातून विस्तारत गेलेलं स्वत:चं वेगळं जग! चालत चालत किती पुढं आलो. पार डोंगराच्या पल्याडच पोहोचलो की. किती मोकळी हवा नि हा मनमुक्त ऋतू... किती जिवाभावाचा! मागं वळून जरासं पाहिलं तरी लगेच दिसते सोनपावलांची सोनवर्खी नक्षी... केशरगंधाचा शिडकावा नव्हताच सोबतीला... तसा तो सर्वांच्या सोबतीला असतोच असं कुठं असतं? मग काय भरल्या आभाळातून पाझरलेल्या चार थेंबांचंही अप्रूप वाटतंच की! तो आभाळगंध आपल्याच हातांनी आपल्या स्वप्नांवर मनाच्या नाजूकशा अत्तरदाणीतून शिंपडत चालत राहायचं... आपला मुक्काम येईपर्यंत. सोबतीला असतेच की एखादी वाट... पायवाट... रस्ता... राजरस्ता किंवा कधी-कधी काहीच नसतं पायाखाली. तेव्हा आपणच शोधायची नव्वीकोरी वाट. साहिरच्या ओळी गुणगुणत ठेवत चालत राहायचं... ‘दुल्हन बनी हुई हैं राहें जश्न मनाओ साल-ए-नौ के...’ नवी वाट... नवे हर्ष. सगळंच नवं नव्यानं स्वीकारत परत-परत गिरवत राहायचं त्या भल्या मोठ्या शून्याला भगदाड पडेपर्यंत. न थकता न थांबता!

नव्याकोर्‍या वाटेवरचा नव्वाकोरा गंध वेडावणारा... पावलांना चालण्याचं बळ देणारा. ज्याला त्याला आपापल्या हिश्शाचं चालत राहणं भागच असतं; पण चालताना पावलांना सोबतीचं केवढं अप्रूप. ‘वाटेनं वाटेला काय द्यावं सांग जरा...’ कित्येकदा पडलेला प्रश्न. तुला विचारलेलाही. याचं उत्तर गवसलंय आज या वळणदार वळणावर...’ वाटेनं वाटेला काय द्यावं सांग जरा... चालताना वाटेतून नवी वाट उमलो जरा...’ चालत आहोत. चालत राहू या नक्कीच. चालण्याचे हे आदिम तेजाळ पर्व झळाळत राहणारच आहे यापुढेही; पण चालता चालताच गवसावी, उमलावी एक नवी वाट अनोख्या पहाटउजेडानं नाहत तुझ्या मनापासून माझ्या काळजापर्यंत थेट भिडत जाणारी... ही वाट चालताना लाभली की, मग काय सगळं चालणंच नितांत निरामय सहजसुंदर... उन्हाच्या झिरमिळ्यांना फुटतात मोरपिसांचे कोंब... त्यातून फुलतो आभाळसावलीचा मोरपंखी पिसारा... चंदेरी-सोनेरी रेषांचं अनभिषिक्त साम्राज्य. शून्यातून आकारास येत जातं साम्राज्य... सूर्य तळपतो नवतेजानं रोज नव्यानं. मावळतीचे रंगही भिववत नाहीत क्षितिजाला... उत्सुक होतात दिशा क्षितिजांच्या बाहूंनी सूर्याला कवेत घेण्यासाठी. इंद्रधनूच्या रंगांनी बहरून येतं जगणं. ही पखरण रुणझुणते मनात आणि परत साहिर गुणगुणतो कानात..‘दुल्हन बनी है राहें...’

( Jyotikadam07@rediffmail.com )

Web Title: a beautiful path..

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.