निपाणे साहेब, आणखी किती मातांचे बळी हवे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2018 11:30 AM2018-10-17T11:30:17+5:302018-10-17T11:31:01+5:30

अमरावती महापालिकेच्या हद्दीत जन्म घेतल्याचे मूल्य आईच्या प्राणांची आहुती देऊन चुकवावे लागेल, याची त्या चिमुकल्या पाहुण्याला कल्पनाही नसावी.

Nipane Saheb, How Many Mothers Will die? | निपाणे साहेब, आणखी किती मातांचे बळी हवे?

निपाणे साहेब, आणखी किती मातांचे बळी हवे?

Next
ठळक मुद्दे‘रोम जळत असताना निरो हा व्हायोलिन वाजवत होता’

गणेश देशमुख
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : अपत्य जन्माला घालणे हा स्त्रीच्या आयुष्यातील सर्वाधिक उत्कंठापूर्ण क्षण. तिचे स्त्रित्व परिपूर्ण करणारा क्षण. तोच बहुप्रतीक्षित क्षण रविवारी अवंतिका इंगळे यांच्या आयुष्यात आला. २९ वर्षांच्या अवंतिका यांनी गोंडस बाळाला जन्म दिला; पण अमरावती महापालिकेच्या हद्दीत जन्म घेतल्याचे मूल्य आईच्या प्राणांची आहुती देऊन चुकवावे लागेल, याची त्या चिमुकल्या पाहुण्याला कल्पनाही नसावी. रविवारी नवजाताच्या मातेला हिरावल्यानंतर सोमवारी महिनाभराच्या मुलीच्या आईलाही प्राण त्यागावे लागले. महापालिकेच्या नाकर्तेपणामुळे शहरभर पसरलेल्या डेंग्यूच्या या माता बळी ठरल्या. शहरवासीयांच्या आरोग्याची अंतिम जबाबदारी शिरावर बाळगणारे आयुक्त संजय निपाणे यांना आणखी किती मातांचे बळी हवे आहेत?
आपण प्रगत झालो, हेच जणू खोटे वाटावे, इतकी अमरावती महापालिकेची आरोग्य व्यवस्था ढासळली आहे. डासजन्य आजार असलेल्या डेंग्यूमुळे सुरू झालेली मृत्युसाखळी रोखण्यात महापालिकेला साफ अपयश आले आहे. एरवी सहनशील असलेले अमरावतीतील सामान्य नागरिकही आता डेंग्यूच्या मृत्यूसाठी महापालिका प्रशासनाविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदविण्याच्या मागणीसाठी पोलिसांत तक्रारी नोंदवू लागले आहेत, यावरून परिस्थितीचे गांभीर्य लक्षात यावे.
‘रोम जळत असताना निरो हा व्हायोलिन वाजवत होता’ अशी म्हण इंग्रजीत प्रसिद्ध आहे. अमरावतीत नेमके तेच घडते आहे. अमरावती डेंग्यूच्या वणव्यात होरपळत असताना महापालिका आयुक्त संजय निपाणे हे जणू लोकांच्या मृत्युवेदनांचा आनंद घेत असावेत, इतके ते शांत आणि स्तब्ध आहेत. ‘झाले ते खूप झाले. यापुढे डेंग्यूचा एकही बळी मी खपवून घेणार नाही’, असा इशारा प्रशासनाला देता यावा इतकेदेखील सामर्थ्य आयुक्तांच्या खुर्चीवर बसलेल्या निपाणे नावाच्या या अधिकाऱ्यात दिसले नाही.
लहान-मोठ्या अनेकांचे सतत बळी जात आहेत. आता तर जन्माला येणारे चिमुकले जीवही पोरके व्हायला लागले आहेत. नगरविकास राज्यमंत्र्यांनी चौकशीचे आदेश दिले. पालकमंत्री शहरात तीन दिवस फिरले; पण मृत्यू सुरूच राहिले. महापालिकेच्या आमसभेत डेंग्यूच्या मुद्द्यावर बोलण्याची वेळ येताच सभा गुंडाळण्यात आली. लोक मरत असताना महापालिकेचा खेळ सुरू असेल, तर महापौर संजय नरवणे कुठल्या नात्याने शहराच्या प्रथम नागरिकत्वाचा सन्मान उपभोगत आहेत? बळी थांबता थांबेना, घराघरांत डेंग्यूचे रुग्ण आहेत; पण आयुक्त वा महापौरांना एकही पत्रपरिषद घ्यावीशी वाटू नये? प्रशासनाच्या ‘निग्लिजन्स’मुळे जीवहानी सुरू आहे. तक्रारी झाल्या आहेत. पोलीस सांगतात, जिल्हाधिकाऱ्यांनी सूचना दिल्या तरच गुन्हे नोंदवू. अभिजित बांगर यांनी या मुद्द्यावर प्रशासनाला संरक्षण देण्याऐवजी लोकन्यायासाठी उभे ठाकावे, अशी लोकभावना आहे. तेच त्यांचे कर्तव्यही आहे. जिल्हाधिकाºयांवर लोकांचा विश्वास आहे. चुकांसाठी शासन होणार नसेल, तर सामान्यांच्या जिवाला मोल नाही, हाच संकेत रूढ होईल!

Web Title: Nipane Saheb, How Many Mothers Will die?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.