आता जंगली हत्तींची भंडारा जिल्ह्यात दहशत; मोहघाटा जंगलात मुक्काम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2022 03:32 PM2022-11-30T15:32:12+5:302022-11-30T15:34:19+5:30

वनविभागाचा वाॅच; पश्चिम बंगालच्या हत्ती नियंत्रण पथकाची मदत

Wild elephant herd entered in Bhandara district now; Stay in the Mohghata jungle | आता जंगली हत्तींची भंडारा जिल्ह्यात दहशत; मोहघाटा जंगलात मुक्काम

आता जंगली हत्तींची भंडारा जिल्ह्यात दहशत; मोहघाटा जंगलात मुक्काम

googlenewsNext

भंडारा : गडचिरोली आणि गोंदिया जिल्ह्यानंतर हत्तींचा कळप सोमवारी भंडारा जिल्ह्यात दाखल झाला. मंगळवारी या हत्तीचा संचार साकोली तालुक्यातील मोहघाटा जंगलात असून, हत्तींवर वाॅच ठेवण्यासाठी वनविभागाचे विविध पथके जंगलात तैनात आहेत. पश्चिम बंगालच्या सेज संस्थेच्या हत्ती नियंत्रण पथकाचीही मदत घेतली जात आहे. वरिष्ठ वनाधिकारी मोहघाटा जंगलात तळ ठोकून आहेत.

साकोली तालुक्यातील सानगडी वनपरिक्षेत्रात सोमवारी २३ हत्तींचा कळप दाखल झाला. या कळपाने झाडगाव, केसलवाडा, सिलेगाव शेतशिवारातील धान आणि ऊस पिकांचे नुकसान केले. दरम्यान मंगळवारी हत्तीचा कळप मोहघाटा जंगलात पोहोचला. जिल्ह्यात हत्ती दाखल झाल्यापासून वनविभाग त्यांच्यावर लक्ष ठेवून आहे. मोहघाटा जंगलात वनविभागाचे भंडारा व गोंदिया येथील जलद प्रतिसाद दल, नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पाचे पथक तळ ठोकून आहेत. या परिसरात असलेल्या किटाडी, गिरोला (जापानी), बरडकिन्ही या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

भंडाराचे उपवनसंरक्षक राहुल गवई मंगळवारी दुपारपासूनच मोहघाटा जंगलात तळ ठोकून आहे. वनविभागाच्या फिरत्या पथकाचे प्रमुख वनपरिक्षेत्राधिकारी संजय मेंढे या हत्तींवर वाॅच ठेवून आहेत. हत्तीचा कळप लाखनी आणि साकोली तालुक्यातील मोहघाटा जंगलात असल्याने गावामध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

सेज संस्थेची मदत

हत्ती नियंत्रणासाठी पश्चिम बंगालमधील सेज संस्थेची मदत घेतली जात आहे. सेजचे सदस्य सध्या मोहघाटा जंगलात तळ ठोकून आहे. हत्तीच्या हालचाली आणि मार्गक्रमण यावर त्यांची नजर असून, हत्तीचा कळप कोणत्या दिशेला जाऊ शकतो, याचा अंदाज घेत आहेत.

६० कर्मचाऱ्यांचे पथक तैनात

मोहघाटा जंगलात असलेले हत्ती मानवी वस्तीत शिरणार नाही, याची दक्षता वनविभागाकडून घेतली जात आहे. भंडारा वनविभागाचे सुमारे ६० कर्मचारी जंगल परिसरात तैनात आहेत. ड्रोन कॅमेऱ्याद्वारे हत्तीच्या हालचालीवर लक्ष ठेवले जात आहे.

दोनशे वर्षांनंतर हत्ती पुन्हा भंडारा जिल्ह्यात

भंडारा जिल्ह्यातील घनदाट जंगलात २०० वर्षांपूर्वी हत्तीचा मुक्त संचार होता. १८२९ मध्ये नवेगाव नागझिरा जंगलात हत्तींचे कळप दिसत होते, असे जाणकार सांगतात. ओडिशा, छत्तीसगढ, गडचिरोली, वडसा आणि नागझिरा असा हत्तीचा प्रवासाचा मार्ग असून आता हत्तीचा कळप भंडारा जिल्ह्यात दाखल झाल्याने सुमारे २०० वर्षांनंतर हत्तींचे आगमन झाले आहे. हत्तींची ही चाैथी पिढी असावी, असे जाणकार सांगतात. सध्या मोहघाटा जंगलात मुक्कामी असलेले हत्ती नागझिरा जंगलात जाण्याची दाट शक्यता वर्तविण्यात येत आहे.

हत्तींचा कळप मोहघाटा जंगलात असून त्यांच्यावर वनविभाग लक्ष ठेवून आहे. मानवी वस्तीत हत्ती येणार नाही याची खबरदारी घेतली जात असून लगतच्या गावांमध्ये सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

- राहुल गवई, उपवनसंरक्षक भंडारा

भंडारा जिल्ह्यात साधारणत: २०० वर्षांपूर्वी हत्तींचा संचार होता. कालांतराने त्यांचे स्थलांतरण झाले. आता पुन्हा हत्तीचा कळप जिल्ह्यात दाखल झाला आहे. त्यांच्या सुरक्षेसाठी वनविभाग प्रयत्न करीत आहे. नागरिकांनी हत्ती पाहण्यासाठी गर्दी करू नये.

- नदीम खान, मानव वन्यजीव संरक्षक

Web Title: Wild elephant herd entered in Bhandara district now; Stay in the Mohghata jungle

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.