Video : भंडाऱ्यामध्ये वडापाची ट्रॅक्स नदीत कोसळली; सहा ठार

By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2019 05:33 PM2019-06-18T17:33:54+5:302019-06-18T19:26:48+5:30

साकोली-लाखांदूर मार्गावरील धर्मपुरी येथील चुलबंद नदीवर हा अपघात झाला.

Tracks fall in river; six Killed in Bhandara | Video : भंडाऱ्यामध्ये वडापाची ट्रॅक्स नदीत कोसळली; सहा ठार

Video : भंडाऱ्यामध्ये वडापाची ट्रॅक्स नदीत कोसळली; सहा ठार

Next

- संजय साठवणे

साकोली (भंडारा) : अवैध प्रवासी वाहतूक करणारी भरधाव काळीपिवळी जीप पुलावरून नदीत कोसळून झालेल्या भीषण अपघातात सहा जण ठार तर सात जण गंभीर जखमी झाले. हा अपघात साकोली ते लाखांदूर मार्गावरील कुंभली गावाजवळील चुलबंद नदीवर मंगळवारी दुपारी ३.३० वाजता घडला. मृतांमध्ये चार विद्यार्थिनी असून बारावीत उत्तीर्ण झाल्यानंतर बीएससीच्या प्रवेशासाठी त्या साकोली येथे आल्या होत्या. 


शीतल सुरेश राऊत (१२), अश्विनी सुरेश राऊत (२२) दोघीही राहणार सानगडी, शिल्पा श्रीरंग कावळे (२०), शारदा गजानन गोटफोडे (४५) दोघेही राहणार सासरा, सुरेखा देवाजी कुंभरे (२०) रा.सासरा टोली आणि गुनगुन हितेश पालांदुरकर (१५) रा.गोंदिया अशी मृतांची नावे आहेत. तर वंदना अभिमन सतीमेश्राम (५०), डिंपल श्रीरंग कावळे (१८), अभिमन तातोबा सतीमेश्राम (४५) तिघेही राहणार सासरा, शुभम नंदलाल पातोळे (२०) रा.तई, विणा हितेश पालांदूरकर (३०), सिद्धी हितेश पालांदुरकर (५) दोघेही राहणार गोंदिया आणि मालन तुळशीराम टेंभुर्णे (६५) राहणार खोलमारा जैतपूर अशी जखमींची नावे आहेत. यापैकी वंदना, डिंपल व शुभमची प्रकृती चिंताजनक असून त्यांना भंडारा येथील रुग्णालयात उपचारासाठी रवाना करण्यात आले.

साकोली येथून प्रवासी घेऊन काळीपिवळी जीप (क्रमांक एमएच ३१ एपी ८२४१) लाखांदुरकडे मंगळवारी दुपारी जात होती. कुंभली येथील चुलबंद नदीपुलावर समोरुन आलेल्या वाहनाने काळीपिवळी जीपला डॅश दिला. त्यामुळे चालकाचे नियंत्रण गेले आणि जीप थेट ४० फुट खोल चुलबंद नदीच्या पात्रात कोसळली. अपघाता एवढा भीषण होता की, काळीपिवळीचा अक्षरश: चुराडा झाला होता. अपघाताची माहिती होताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच साकोलीचे ठाणेदार बंडोपंत बनसोडे आपल्या पथकासह घटनास्थळी दाखल झाले. जखमींना बाहेर काढून मिळेल त्या वाहनाने साकोली येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. 
या जीपमधून सासरा आणि सानगडी येथील बहुतांश प्रवाशी प्रवास करीत होते. सासरा व सानगडी येथील बारावीत उत्तीर्ण विद्यार्थिनी साकोली येथे बीएससीच्या प्रवेशासाठी आल्या होत्या. गावी परत जाण्यासाठी या जीपमधून त्या प्रवास करीत होत्या. मृतामध्ये दोन सख्ख्या बहिणींचा समावेश आहे.

अपघाताचे वृत्त सानगडी आणि सासरा येथे कळताच गावकºयांनी साकोली येथील रुग्णालयात धाव घेतली. रुग्णालयात प्रचंड गर्दी झाली होती. घटनास्थळाला पोलीस अधीक्षक अरविंद साळवे, अपर पोलीस अधीक्षक रश्मी नांदेडकर यांनी भेट दिली. तसेच रुग्णालयात जाऊन जखमींची विचारपूस केली. या अपघाताने संपूर्ण भंडारा जिल्ह्यावर शोककळा पसरली.

अवैध प्रवासी वाहतुकीचे बळी
भंडारा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अवैध प्रवासी वाहतूक सुरु आहे. क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी बसवून कालबाह्य वाहनातून प्रवास घडविला जातो. कुंभलीजवळ झालेल्या अपघातातील बळी हे अवैध प्रवासी वाहतुकीचेच आहेत. साकोली येथून विविध मार्गावर दिवसभरातून ५० ते ६० वाहने प्रवासी वाहतूक करतात. मात्र पोलीस त्यांच्यावर कोणतीही कारवाई करीत नाही.

 

Web Title: Tracks fall in river; six Killed in Bhandara

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Accidentअपघात