कृषी विभागाचा ‘आत्मा’ वाऱ्यावर

By admin | Published: February 13, 2017 12:18 AM2017-02-13T00:18:39+5:302017-02-13T00:18:39+5:30

शेतकऱ्यांसाठी महत्वपुर्ण प्रकल्प ठरलेल्या कृषी विभागाचा ‘आत्मा’ (कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा) प्रकल्पाचा कारभार सध्या वाऱ्यावर सुरु आहे.

The 'Spirit' of the Department of Agriculture is on the wind | कृषी विभागाचा ‘आत्मा’ वाऱ्यावर

कृषी विभागाचा ‘आत्मा’ वाऱ्यावर

Next

भंडारा : शेतकऱ्यांसाठी महत्वपुर्ण प्रकल्प ठरलेल्या कृषी विभागाचा ‘आत्मा’ (कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा) प्रकल्पाचा कारभार सध्या वाऱ्यावर सुरु आहे. विविध योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांचा सर्वांगीण विकास साधला जावा हा त्यामागील मुळ उद्देश असला तरी या मुळ उद्देशाला हरताळ फासला जात आहे.
सदर प्रकल्पाचे कामकाज नागपूरहून संचालित होत असल्याने जिल्ह्याचे वरिष्ठ अधिकारी याकडे डोळेझाक करीत असल्याचे दिसून येते. त्यामुळे योजनेचे पाणी दुसरीकडे मुरत असल्याची ओरड आहे. भंडारा जिल्ह्यातील आत्मा समन्वयक पद रिक्त असून त्याचा कार्यभार नागपूर जिल्ह्याचे अधिकारी प्रज्ञा गोडघाटे यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. त्यामुळे त्या क्वचितच जिल्ह्यात महिन्याकाठी येत असतात. आत्मा विभागाच्या बऱ्याच बाबी खटकणाऱ्या आहेत.
जिल्ह्यात या विभागाच्या योजना राबविताना गैरप्रकार झाल्याची ओरड आहे. शेतकरी मित्र मोबदला असो की साहीत्य खरेदीबाबद निर्णय, याबाबत संशय व्यक्त करण्यात येत आहे. जिल्ह्यातील शेतकरी आत्मा प्रकल्प विभागाचा कामकाजाबाबद असमाधानी असून गैरप्रकाराचा चौकशीची मागणी होत आहे.
आत्मा विभागामार्फत सन २०१६-१७ मध्ये मानव विकास कार्यक्रमाअंतर्गत शासनाकडून जवळपास ४० लाखांपेक्षा जास्त निधी मंजूर करण्यात आला. परंतु या योजनेतून कोणत्याही कामांचा निविदा न काढता मनमर्जीने कामे करण्यात आली.
भाजीपाले बियाणे महाबिज किंवा इतर शासनमान्य संस्थेकडून खरेदी न करता नागपूरातील खासगी दूकानातून खरेदी करण्यात आली आहे. तसेच शासनाचे किंवा विद्यापिठाची कोणतीही शिफारस नसताना खासगी विक्रेत्यांकडून ‘नळ्या’ खरेदी करण्यात आल्या. त्या ढिंबक नळ्या काही महिन्यातच खराब झाल्याची माहिती आहे. साहित्यांच्या ई-निविदा न काढता लक्षावधी रुपयांचे प्लास्टीकड्रम सेंद्रीय शेती योजना व मानव विकास योजनेतून खरेदी करण्यात आले आहे, अशीही जिल्ह्यात चर्चा आहे.
आत्मा अंतर्गत सर्व साहित्यांची खरेदी एम आयडीसी कडून न करता मागील काही वर्षांपासून खासगी दुकानातून होत असल्याची ओरड आहे.
विभागाचे प्रकल्प संचालक प्रभारी असल्याने याकडे दुर्लक्ष होत आहे. प्रभारी अधिकाऱ्यांकडे असलेले त्यांचे स्वत:चे वाहन ‘आत्मा’ प्रकल्पांतर्गत वापरण्यात आल्याची माहिती असून वर्षाकाटी त्यापोटी २ लाखांपेक्षा जास्त रकमेची उचल करण्यात आल्याची माहिती आहे.
आत्मा प्रकल्प विभागांतर्गत योजना राबविताना किंवा प्रकल्प अभियानाची अंमलबजावणी करताना वित्तीय नियमांचे पालन करण्यात येत नसल्यामुळे गैरप्रकाराला वाव मिळत असल्याचेही सांगण्यात येते. यासंदर्भात आत्मा प्रकल्प संचालक पदाला अनुसरण असणाऱ्या समकक्ष पद असणाऱ्या अधिकाऱ्याकडे या पदाचा कार्यभार सोपविण्यात यावा, अशी मागणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून होत आहे. (प्रतिनिधी)

‘आत्मा’ विभागांतर्गत करण्यात येणारी कामे नियमांतर्गत झाली आहे. माझ्यावर लावण्यात आलेले आरोप धादांत खोटे आहे. वाहन प्रकरणी संशय आहे. सन २०१६-१७ पासून योजनांमधील लाभधारक शेतकऱ्यांच्या खात्यावर सरळ निधी वळता केला जात आहे. शेतकरी सर्व साहित्यांची खरेदी करतात. विभागामार्फत खरेदी केली जात नाही. मानव विकास कार्यक्रम व सेंद्रीय शेती योजनांमधील खरेदी सुध्दा शेतकऱ्यांनी केली आहे. त्याचा निधीसुध्दा शेतकऱ्यांच्या खात्यात वळता करण्यात आला आहे. शेतकरी त्यांच्या सोयीने साहित्याची खरेदी करीत असतात. भंडारा जिल्ह्यात आठवड्यातून दोन वेळा भेट होत असते. शेतकऱ्यांच्या समस्यांचे निराकरण करण्यावर आमचा भर असतो.
- प्रज्ञा गोडघाटे, प्रभारी, आत्मा प्रकल्प संचालक भंडारा

Web Title: The 'Spirit' of the Department of Agriculture is on the wind

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.