बाबासाहेबांच्या पवित्र अस्थी पवनीच्या पुतळ्यात सुरक्षित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2019 10:31 PM2019-04-13T22:31:51+5:302019-04-13T22:32:18+5:30

कोट्यवधी दिनदुबळ्या बहुजनांचे आदरस्थान असलेले भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र अस्थि आजही पवनी शहरात बाबासाहेबांच्या संगमवरील पुतळ्यात सुरक्षित आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पवित्र अस्थि असणारा हा महाराष्ट्रातील एकमेव पुतळा आहे.

The sacred bone of Babasaheb is safe in Pawani | बाबासाहेबांच्या पवित्र अस्थी पवनीच्या पुतळ्यात सुरक्षित

बाबासाहेबांच्या पवित्र अस्थी पवनीच्या पुतळ्यात सुरक्षित

googlenewsNext
ठळक मुद्देआज डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती : महाराष्ट्रातील एकमेव पुतळा

लक्ष्मीकांत तागडे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
पवनी : कोट्यवधी दिनदुबळ्या बहुजनांचे आदरस्थान असलेले भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र अस्थि आजही पवनी शहरात बाबासाहेबांच्या संगमवरील पुतळ्यात सुरक्षित आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पवित्र अस्थि असणारा हा महाराष्ट्रातील एकमेव पुतळा आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे ६ डिसेंबर १९५६ रोजी महानिर्वाण झाले. पवनी येथील नागरिक सध्याच्या डॉ. आंबेडकर चौकात एकत्र आले. तेथे एका व्यापाऱ्याच्या घरासमोरून रेडियोवरून ही दु:खत बातमी ऐकली. अनेकजण धायमोकलून रडू लागले. जवळच राघो गजभिये यांच्या घरासमोर श्रावण मयुर गुरूजी यांनी शोक सभा घेतली.
त्यावेळेस शुक्रवारी वॉर्डातील पिठूजी राऊत यांचे चांगले प्रस्थ होते. या वॉर्डातील डॉ. रविंद्र राऊत, विजय रामटेके, सुखदेव मानवटकर नागपूर येथे शिक्षण घेत होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या महानिर्वाणाची माहिती होताच हे तीनही युवक नागपूरवरून मुंबईला गेले. सरळ दादर चैत्य भूमीवर गेले. त्या ठिकाणी राखेला वंदन करून राख माथ्याला लावली. पण सुखदेव मानवटकर यांनी राखेत हात टाकताच त्यांच्या हाताला अस्थिचा एक तुकडा लागला. हा तुकडा चुपचाप पॅन्टच्या खिशात ठेवला. नंतर ही गोष्ट मित्रांना सांगितली. ही अस्थी त्यांनी पवनी येथे येवून पिठूजी राऊत यांच्याकडे सोपविली. ती त्यांनी आपल्याकडे सुरक्षीत ठेवली.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाणानंतर पवनी शहरात बाबासाहेबांचे विचार जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी कार्यकर्ते एकत्र आले. शहराच्या मध्यवर्ती भागात बाबासाहेबांचा पुतळा स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला. या पुतळ्याकरिता लोकवर्गणी गोळा करण्यात आली. काही जणांनी आपल्या घरावरचे टीन विकून वर्गणी दिली.
प्रत्येकाने पुतळ्यासाठी यथाशक्ती वर्गणी दिली. राघोजी गजभिये यांनी जागा दान दिली. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा जयपूरवरून आणण्याचे निश्चित झाले. जयपूर येथील कलावंतांनी संगमरमरात बाबासाहेबांचा देखणा पुतळा तयार केला. आता हा पुतळा पवनीच्या वैभवात भर घालीत आहे. बाबासाहेबांच्या पवित्र अस्थि या पुतळ्यात असल्याने प्रत्येकजण येथे नतमस्तक होवून बाबासाहेबांना अभिवादन करतात.
बॅरि. राजाभाऊ खोब्रागडे यांनी केले होते अनावरण
डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा जयपूरवरून आणलेला पुतळा पवनी येथील मुख्य चौकात बसविण्यात आला. त्यावेळी बाबासाहेबांच्या अस्थीचा अर्धा भाग या पुतळ्यात ठेवण्यात आला व अर्धा भाग पुठूजी यांनी आपल्याकडे सुरक्षित ठेवला. बाबासाहेबांच्या पुतळ्याचे अनावरण २६ नोव्हेंबर १९६२ रोजी राज्यसभेचे तत्कालीन उपसभापती बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांच्या हस्ते करण्यात आले. आज हा पुतळा पवनी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात उभा आहे. बाबासाहेबांच्या पवित्र अस्थी असणारा हा महाराष्ट्रातील एकमेव पुतळा आहे.

Web Title: The sacred bone of Babasaheb is safe in Pawani

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.