राज्य मार्गावरील खड्डे १५ डिसेंबरपूर्वी भरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2017 11:36 PM2017-11-19T23:36:47+5:302017-11-19T23:37:51+5:30

जिल्हयातील राज्य महामार्गावरील खड्डे १५ डिसेंबर पूर्वी भरण्यात यावे तसेच रस्त्याचे बांधकाम स्वत:च्या घराचे बांधकाम समजून करावे,.....

The potholes on the state road were filled before 15th December | राज्य मार्गावरील खड्डे १५ डिसेंबरपूर्वी भरा

राज्य मार्गावरील खड्डे १५ डिसेंबरपूर्वी भरा

Next
ठळक मुद्देचंद्रकात पाटील यांचे निर्देश : बांधकाम विभागाची आढावा बैठक

आॅनलाईन लोकमत
भंडारा : जिल्हयातील राज्य महामार्गावरील खड्डे १५ डिसेंबर पूर्वी भरण्यात यावे तसेच रस्त्याचे बांधकाम स्वत:च्या घराचे बांधकाम समजून करावे, असे निर्देश राज्याचे महसूल व सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्र्रकांत पाटील यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला दिले.
रविवारी भंडारा बांधकाम विभागाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. आमदार चरण वाघमारे, अ‍ॅड. रामचंद्र अवसरे, जिल्हाधिकारी सुहास दिवसे, अप्पर जिल्हाधिकारी दिलीप तलमले, उपविभागीय अधिकारी पृथ्वीराज बी.पी., नगराध्यक्ष सुनिल मेंढे, मुख्य अभियंता उल्हास देबडवार, अधिक्षक अभियंता प्रशांत नवघरे, तहसिलदार संजय पवार, कार्यकारी अभियंता ऋषीकांत राऊत यावेळी उपस्थित होते.
जिल्हयातील रस्त्याचे खड्डे १५ डिसेंबर पूर्वी पूर्ण भरावे असे सांगून चंद्रकात पाटील म्हणाले की, १५ डिसेंबर नंतर आपण राज्यातील प्रतयेक जिल्हयात दौरा करुन कामाची पाहणी करणार आहोत. राज्यातील रस्ते व पूल बांधकामाबाबत प्रत्येक जिल्हयाचा समन्वय ठेवण्यासाठी मंत्रालयात स्वतंत्र सेल उभारण्यात आला आहे. या सेल मार्फत जिल्हयातील कामांचा दररोज आढावा घेण्यात येईल. खड्डे बुजविणे व रस्ते बांधकाम यात जे अधिकारी चांगले काम करतील अशा सर्व अधिकाऱ्यांचा विशेष पुरस्कार देवून गौरव करण्यात येणार आहे. आपण ज्या तन्मयतेने स्वत:च्या घराचे बांधकाम करतो. तितक्याच तन्मयतेने रस्त्याचे बांधकाम करावे, असे ते म्हणाले.
अ‍ॅन्युटीचे काम यशस्वी न केल्यास राज्यातील रस्ते सुरळीत होणार नाहीत, असे ते म्हणाले. अ‍ॅन्युटीसाठी राज्यात किडार पध्दतीचा अवलंब केल्याचे पाटील म्हणाले. राज्यात २२ हजार किलोमिटर राष्ट्रीय महामार्ग चौपदरी व १० हजार किलोमिटर राज्यमार्ग तीन पदरी असे एकूण ३२ हजार किलोमिटरचे रस्ते सुंदर करण्याचा निर्धार असल्याचे त्यांनी सांगितले. जे रस्ते खड्डे भरण्याच्या पलीकडे नादुरुस्त असतील अशा रस्त्याच्या नव्याने सुदृढीकरण्यासाठी प्रस्ताव पाठविण्याच्या सूचना त्यांनी या बैठकीत केल्या. यावेळी उपस्थित अभियंत्यांनी आपआपल्या भागातील रस्ते व त्यासंबंधीची माहिती मंत्रीमहोदयांना सादर केली.
या बैठकीत महसूल व सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांची कौटूंबिक संवाद साधला. यावेळी त्यांनी अधिकाºयांच्या समस्या व प्रश्न आस्थेने समजावून घेतले. काम करतेवेळी कुठलाही ताण न घेता खेळीमेळीच्या वातावरणात काम करण्याचा सल्ला त्यांनी दिला. स्वत:साठी दररोज किमान एक तास वेळ काढा, सामाजिक कार्यात सहभागी व्हा, कौटुंबिक संवाद वाढवा व आपली कार्यक्षमता वाढवा, असा मोलाचा सल्ला त्यांनी यावेळी अधिकाºयांना दिला. मंत्रालयात पाठविण्यात येणाऱ्या प्रस्तावाबाबत सविस्तर चर्चा करत जा, काही अडचण असल्यास आपल्याशी मोकळा संवाद साधा, अशा सूचना त्यांनी या बैठकीत दिल्या.
या बैठकीत कार्यकारी अभियंता ऋषीकांत राऊत यांनी जिल्हयातील रस्त्यांच्या सद्यस्थितीचे सादरीकरण केले. या बैठकीस सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी व अभियंते उपस्थित होते.

 

Web Title: The potholes on the state road were filled before 15th December

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.