नवजात बाळाला फेकून मातेचे पलायन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2017 12:24 AM2017-07-29T00:24:58+5:302017-07-29T00:26:17+5:30

पाच दिवसांपूर्वी जन्मलेल्या एका बालकाला निर्माणाधीन ईमारतीत फेकून एका निर्दयी मातेने पळ काढला.

navajaata-baalaalaa-phaekauuna-maataecae-palaayana | नवजात बाळाला फेकून मातेचे पलायन

नवजात बाळाला फेकून मातेचे पलायन

Next
ठळक मुद्देगणेशपूर येथील घटना : नागरिकांच्या प्रसंगावधानाने वाचला बाळाचा जीव, जिल्हा रूग्णालयात उपचार सुरू

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : पाच दिवसांपूर्वी जन्मलेल्या एका बालकाला निर्माणाधीन ईमारतीत फेकून एका निर्दयी मातेने पळ काढला. बाळाच्या रडण्याच्या आवाजाने मोकाट कुत्र्यांचे भुंकणे सुरू झाले. हा आवाज शेजाºयांना येताच नागरिकांनी उपसरपंच यशवंत सोनकुसरे यांनी सांगितले. त्यांनी वेळ न घालवता घटनास्थळी जाऊन बालकाला उचलले. ही घटना गणेशपूर येथे गुरूवारी रात्रीच्या सुमारास उघडकीस आली. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.
गणेशपूरच्या गजबजलेल्या राजेंद्र वॉर्डात एका किराणा दुकानशेजारी भारती हेडाऊ यांच्या घराचे बांधकाम सुरू आहे. याच घरात कुणीतरी सिमेंटच्या पिशवीत कोंबून या बाळाला तिथे टाकून दिले. पाऊस सुरू असल्यामुळे परिसरात कुणीही नव्हते. दरम्यान बाळाच्या वासाने ‘त्या’ प्लास्टिक पिशवीभोवती मोकाट कुत्रे जमा झाले होते.
कुत्र्यांच्या भुंकण्याने व बाळाच्या रडण्याच्या आवाजाने या घराच्या शेजारी राहणारे जिल्हा परिषद कर्मचारी नितीन धारगावे व त्यांच्या पत्नीला शंका आली. आवाज कुठून येत आहे, याचा शोध घेतला असता तो निर्माणाधीन घरातून ऐकू आला. मात्र, अंधार असल्याने त्यांनी ही बाब चेतन वलके यांना सांगितली.
दरम्यान अनूप हटवार या तरूणाने ही माहिती गणेशपूरचे उपसरंपच यशवंत सोनकुसरे व भारती हेडाऊ यांच्या वडिलांना सांगितली. घटनेचे गांभिर्य ओळखून यशवंत सोनकुसरे व जिल्हा परिषद सदस्य जया सोनकुसरे यांनी घटनास्थळ गाठले. यावेळी त्यांनी आवाज येत असलेल्या प्लास्टिक पिशवीत बघितले असता, त्यांना नवजात बाळ आढळून आला. पाऊस सुरू असल्याने बाळाचा थंडीपासून बचाव करण्यासाठी त्याला कापडात गुंडाळले. त्यानंतर याची माहिती भंडारा पोलिसांना दिली.
ही माहिती गणेशपुरात वाºयासारखी पसरताच रात्र असूनही घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी उसळली होती. पोलिसांनी घटनास्थळ गाठल्यानंतर बाळाला जिल्हा सामान्य रूग्णालयात अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले. बाळाचे वजन केले असता वजन २ किलो ७०० ग्रॅम होते.
दरम्यान बालकाची माहिती मिळताच घटनास्थळावर गणेशपूरच्या सरपंच वनिता भुरे, सदस्य संध्या बोदिले, अनुप हटवार, अनिल मेश्राम, शैलेश मेहर, प्रमोद हेडाऊ, थोटे आदींनी सामाजिक बांधिलकीचा परिचय दिला. याप्रकरणी यशवंत सोनकुसरे यांच्या तक्रारीवरून भंडारा पोलिसांनी अज्ञात आरोपींविरूद्ध गुन्हा नोंदविला असून तपास भंडारा पोलीस करीत आहे.

देव तारी त्याला कोण मारी
किर्र अंधारात नवनिर्माण घरात नवजात बाळाला मृत्यूच्या दारात फेकले. त्यावेळी मोकाट कुत्रे त्या बाळाभोवती जमले होते. मात्र, बाळाचे नशिब बलवत्तर असल्याने तो बचावला. सामाजिक दायित्वातून लोकांनी बाळाचे प्राण वाचविले. पाऊस जोराने असता तर बाळाच्या रडण्याचा आवाज आला नसता. परिणामी कुत्र्यांनी लहानग्या बाळाचा जीव घेतला असता. म्हणतात नां, देवतारी त्याला कोण मारी... याचा प्रयत्न या घटनेतून आला.
घटनास्थळावरून दोन महिला पळाल्या
बाळाला टाकून तिथून पळणाºया दोन महिलांचा कुत्र्यांनी पाठलाग केल्याचे लोकांनी सांगितले. कुत्र्यांच्या भुंकण्यामुळे त्या महिलांनी अंधाराचा फायदा घेत पळ काढला. दरम्यान कुत्र्यांचे भुंकणे व बाळाच्या रडण्याचा आवाज ऐकू येताच धारगावे दाम्पत्य घराबाहेर आले. यावेळी त्यांना दोन महिला तेथून लगबगीने जाताना दिसल्या. त्यावेळी ही बाब लक्षात आली नसली तरी, या महिलांनीच या बाळाला टाकून पळाल्याचे बोलले जात आहे. दरम्यान शुक्रवारला गणेशपूर ग्रामपंचयतने आशा वर्करकडून गणेशपूरातील गर्भवती माता व नुकतेच जन्मलेल्या बाळांच्या मातांची माहिती घेतली. यावेळी सदर बाळ गणेशपूर येथील कोणत्याही मातेचे नसल्याचे स्पष्ट झाले आहे. याबाबत पोलीस आता अधिक तपास करीत आहे.

Web Title: navajaata-baalaalaa-phaekauuna-maataecae-palaayana

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.