खरीप पीककर्ज वाटपात "लेटलतीफ"

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2017 12:16 AM2017-05-24T00:16:48+5:302017-05-24T00:16:48+5:30

पेरणीचा हंगाम तोंडावर येऊन ठेपलेला असतानाही शेतकऱ्यांना खरीप पीककर्ज वाटप अल्प प्रमाणातच होत आहेत.

Kharif cropcirclesonline "latex" | खरीप पीककर्ज वाटपात "लेटलतीफ"

खरीप पीककर्ज वाटपात "लेटलतीफ"

Next

शेतकरी चिंतातूर : उद्दिष्टपूर्तीची अपेक्षा, कर्ज वाटपात जिल्हा बँक अग्रेसर!
देवानंद नंदेश्वर। लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : पेरणीचा हंगाम तोंडावर येऊन ठेपलेला असतानाही शेतकऱ्यांना खरीप पीककर्ज वाटप अल्प प्रमाणातच होत आहेत. जिल्हा सहकारी बँक व बँक आॅफ इंडियाचा अपवाद वगळता उर्वरित राष्ट्रीयीकृत बँकांनी खरीप पीककर्ज वाटप फारसे गांभीर्याने घेतलेले दिसत नाही. यावर्षीच्या खरीपात ५४५.४० कोटी रुपयांचे पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट आहे.
कृषिप्रधान देशातील शेतकरी अर्थव्यवस्था ताळ्यावर आणण्याचा प्रयत्न करीत आहेत, तर दुसरीकडे विद्यमान "व्यवस्था" शेतकऱ्यांचा जणू "अर्थ"च काढून घेत आहे. यात निसर्गाचा लहरीपणा अधिकच भर टाकत आहे. इतरांना भरभरून देणारा, स्वत:च्या घामरुपी सिंचनातून अन्नधान्याचे उत्पादन करणारा देशाचा पोशिंदा शेतकरी स्वत: मात्र शोषित जिणे जगत असल्याची विदारक स्थिती आहे. गत चार वर्षांपासून निसर्गाने दगा दिला. त्यानंतर परतीच्या पावसानेदेखील शेतकऱ्यांचा भ्रमनिरास केला. विविध कारणांमुळे खरीप व रबीचे समाधानकारक पीक हाती आले नाही. संकटांची ही मालिका कमी म्हणून की काय, यात शेतमालाच्या अत्यल्प भावाची भर घालण्यात आली. धानाचे उत्पादन घटले; मात्र बाजारभावही यावर्षी कमी आहेत. चोहोबाजूंनी आलेल्या चक्रीवादळात अल्प व अत्यल्प भूधारक शेतकरी कोलमडून गेला. आता पुन्हा नव्या उमेदीने बँकांच्या पीककर्जरूपी कुबड्यांच्या आधारावर उभे राहण्याचा प्रयत्न शेतकरी करीत आहेत. या प्रयत्नांना, भंडारा जिल्हा मध्यवर्ती बँक, बँक आॅफ इंडिया, ग्रामीण बँक या बँकांचा अपवाद वगळता अन्य राष्ट्रीयीकृत बँका फारसा प्रतिसाद देत नसल्याचा अनुभव शेतकऱ्यांना येत आहे. त्यामुळे यावर्षी खरीप हंगामात शेतकऱ्यांना शेती कसण्यासाठी काटकसर करावी लागत आहे.

५४५.४० कोटींचे लक्ष्यांक
यंदाच्या खरीप हंगामासाठी जिल्ह्यातील बँकांना ५४५ कोटी ४० लाख रुपयांचा लक्ष्यांक आहे. यामध्ये जिल्हा सहकारी बँकेला २८९.७५ कोटी, राष्ट्रीयीकृत बँकाना २०६.२५ कोटी व ग्रामीण बँकाना ४९.४० कोटी असा लक्ष्यांक आहे.
कर्जमाफी चर्चेचे "साईड इफेक्ट"
गेल्या दोन महिन्यांपासून शेतकऱ्यांची कर्जमाफी हा मुद्दा जिल्ह्यासह राज्यात पेटला आहे. सर्वच राजकीय पक्षांसह शेतकऱ्यांनीदेखील कर्जमाफीसाठी आवाज बुलंद केला आहे. याच पार्श्वभूमीवर उत्तरप्रदेशात कर्जमाफीचा निर्णय झाला. या सर्व चर्चेमुळे अनेक नियमित शेतकऱ्यांनी कर्जाचा भरणा केलेला नाही. त्यामुळे हे शेतकरी थकबाकीदार झालेत. कर्ज मिळण्यास अडचणी निर्माण झाल्या आहेत.
गतवर्षी उद्दिष्टपूर्तीचा अपेक्षाभंग
गेल्यावर्षी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ४९५ कोटी रुपये खरीप पीक कर्ज मिळण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. मात्र, यातील ४०४.१६ कोटी रुपयांचेच कर्ज वाटप करण्यात आले होते. उर्वरित ९०.८४ कोटी रुपयांचे कर्ज शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलेच नव्हते. यावर्षी १०० टक्के कर्ज वाटप करण्यात येणार असल्याचे उद्दिष्ट जिल्हा प्रशासनाने ठेवले आहे. शासनाचे आदेश असूनही बँकांकडून शेतकऱ्यांची अडवणूक होऊ नये, यासाठी समित्या गठित करण्यात आल्या आहेत.

खरीप पीक कर्ज वाटपाची प्रक्रीया सुरु आहे. आतापर्यत जिल्हा बँकेने ५० टक्केपर्यत कर्ज वाटप केलेले आहे. राष्ट्रीयकृत बँकानी जवळपास १३ टक्के कर्ज वाटप केलेले आहेत. पावसाचे आगमन होताच कर्ज वाटप कार्याला अधिक वेग असतो. कर्ज वाटपाविषयी साप्ताहिक आढावा घेतला जात आहे.
-विजय बागडे, व्यवस्थापक, जिल्हा अग्रणी बँक, भंडारा.

Web Title: Kharif cropcirclesonline "latex"

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.