तुमसर तालुक्यात कोट्यवधींच्या रेतीचे अवैध खनन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2019 10:24 PM2019-07-17T22:24:11+5:302019-07-17T22:24:42+5:30

तुमसर तालुक्यातील वैनगंगा नदीच्या बाम्हणी रेती घाटातून कोट्यवधींच्या रेतीचे सर्रास खनन गत काही महिन्यांपासून सुरू आहे. राज्य शासनाचा कोट्यवधींचा महसूल येथे बुडत आहे.

Illegal mining of cottage sand in Tumsar taluka | तुमसर तालुक्यात कोट्यवधींच्या रेतीचे अवैध खनन

तुमसर तालुक्यात कोट्यवधींच्या रेतीचे अवैध खनन

Next
ठळक मुद्देसात रेतीघाट तस्करांना मोकाट : जिल्ह्यात शून्य दंड असलेला एकमेव तुमसर तालुका

लोकमत न्यूज नेटवर्क
तुमसर : तुमसर तालुक्यातील वैनगंगा नदीच्या बाम्हणी रेती घाटातून कोट्यवधींच्या रेतीचे सर्रास खनन गत काही महिन्यांपासून सुरू आहे. राज्य शासनाचा कोट्यवधींचा महसूल येथे बुडत आहे.
भंडारा जिल्ह्यात तुमसर तालुका वगळता सर्व सहा तालुक्यातून रेती तस्करांकडून ७८ लाखांचा दंड वसूल करण्यात आला. जिल्ह्यात सर्वात जास्त १३ रेतीघाट एकट्या तुमसर तालुक्यात आहेत. शुन्य दंड असलेला हा एकमेव तालुका ठरला आहे. दररोज येथील नदीपात्रातून रेतीचे खनन सुरू आहे. बाम्हणी रेतीघाट सध्या रेती तस्करांकरिता वरदान ठरत आहे.
तुमसर तालुका मुख्यालयापासून अवघ्या चार किमी अंतरावर बाम्हणी हे गाव आहे. महसूल विभागाने येथील रेती घाटाचा लिलाव केला होता. परंतु त्याला न्यायालयातून स्थगिती मिळाली आहे. परंतु राजरोसपणे दिवसभर येथे रेतीचे उत्खनन सुरू आहे. रेती उत्खननात आठ ते दहा जणांचा समावेश आहे. नदीपात्रात ट्रॅक्टरने रेतीची उचल करून नदी काठावर ती रिकामी केली जाते. त्यानंतर जेसीबीने ट्रकमध्ये तिचा भरणा केला जातो. चार ते पाच हजारात ट्रकमधील रेतीची विक्री करण्यात येते. सदर ट्रक नागपूर येथे १३ ते १४ हजार रुपयाात विकला जातो.
वैनगंगेच्या रेतीला नागपूर व इतर शहरात मोठी मागणी आहे. दिवसभर येथील नदीपात्रात ट्रॅक्टरची मोठी वर्दळ असते. येथे मोठे अर्थकारण दडले आहे. दिवसाढवळ्या कोट्यवधींची रेती येथे चोरी जात आहे. महसूल प्रशासन येथे दडपणाखाली दिसत आहे. दडपण कोण आणीत आहे हे सर्वश्रूत आहे, परंतु किमान महसूल प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी आपल्या अधिकारांचा वापर करण्याची येथे गरज आहे.
'लोक सांगे ब्रम्हज्ञान पुढे कोरडे पाषाण' अशी स्थिती येथे महसूल प्रशासनाची झाली आहे. रोजगाराचा मुद्दा येथे पुढे रेटला जातो, परंतु त्याकरीता तुमसर तालुक्यात १३ रेती घाट आहेत. त्यापैकी महसूल प्रशासनाने यावर्षी सात रेती घाटांचा लिलाव केला होता. यात चारगाव, सोंड्या, लोभी, बाम्हणी, तामसवाडी, आष्टी, सक्करदरा या घाटांचा समावेश होता. परंतु सध्या ही रेतीघाट बंद आहेत. याशिवाय वैनगंगा नदीपात्राजवळील सहा ते सात घाट असून या सर्व रेती घाटांतून नियमीत रेती खणन सुरू आहे.
रेती उत्खनन करणाऱ्यांना येथे आशिर्वाद असून महसूल अधिकाºयांवर येथे दडपण आहे. महसूल प्रशासनाचे अधिकारी तुमसर तालुक्यातील रेतीघाटांवर कारवाई करूच शकत नाही हे सिद्ध झाले आहे. जिल्ह्यात चोरट्यांकडून दंड वसूल करण्यात आला, परंतु तुमसर तालुक्यात दंड वसूल झाला नाही.
जिल्हाधिकाऱ्यांची भूमिका महत्त्वाची
शुन्य दंड असलेला तुमसर तालुका एकमेव तालुका जिल्ह्यात ठरला आहे. त्यामुळे येथील महसूल प्रशासनातील अधिकाºयांचा जाहीर सत्कार करण्याची गरज आहे. तुमसर तालुका त्याकरिता आदर्श म्हणून त्याचा कित्ता इतर तालुक्यांनी गिरविण्याची गरज आहे. संपूर्ण जिल्ह्याचे प्रशासन दडपणाखाली आहे काय, असा प्रश्न येथे उपस्थित होत आहे. भरदिवसा रेती नदीपात्रातून खननाचे पूरावे 'लोकमत'कडे उपलब्ध आहेत. मसहूल प्रशासन येथे कारवाई करेल काय, कोट्यवधींचा महसूल येथे राज्य शासनाचा बुडत आहे. महसूल प्रशासनाचे अधिकारी कर्तव्य कठोर कारवाई करणार काय, याकडे तुमसर तालुक्यातील जनतेचे लक्ष लागले आहे.

Web Title: Illegal mining of cottage sand in Tumsar taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.