प्राथमिक आरोग्य केंद्रात कर्मचाऱ्यांची वानवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2018 09:22 PM2018-07-19T21:22:37+5:302018-07-19T21:24:13+5:30

येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कर्मचाऱ्यांचे पुरेसे संख्याबळ नसल्याने याचा फटका रुग्णांना सहन करावा लागत आहे. या प्राथमिक आरोग्य केंद्रात अनेक वर्षांपासून महत्वाच्या वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची पदे रिक्त असल्याने त्याचा ताण कार्यरत कर्मचाऱ्यांवर वाढला आहे.

Employees of Primary Health Center | प्राथमिक आरोग्य केंद्रात कर्मचाऱ्यांची वानवा

प्राथमिक आरोग्य केंद्रात कर्मचाऱ्यांची वानवा

googlenewsNext
ठळक मुद्देरुग्ण सेवेवर परिणाम : आरोग्य विभागाचे दुर्लक्ष, परिसरातील नागरिकांचे हाल

लोकमत न्यूज नेटवर्क
शेंडा-कोयलारी : येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कर्मचाऱ्यांचे पुरेसे संख्याबळ नसल्याने याचा फटका रुग्णांना सहन करावा लागत आहे. या प्राथमिक आरोग्य केंद्रात अनेक वर्षांपासून महत्वाच्या वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची पदे रिक्त असल्याने त्याचा ताण कार्यरत कर्मचाऱ्यांवर वाढला आहे. त्याचा त्रास रुग्णांना होत आहे.
शेंडा प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत सहा उपकेंद्र व २७ गावांचा समावेश आहे. वेळोवेळी प्रशासनाकडून घेण्यात येणाऱ्या सभा, सर्व्हे रिपोर्टींग, कार्यालयीन रेकार्ड व कुटूंब नियोजन यासारखे विविध कार्यक्रम राबविले जातात. मात्र आरोग्य केंद्रात अनेक पदे रिक्त असल्याने त्याचा परिणाम आरोग्य सेवेवर होत आहे.
येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात अनेक वर्षांपासून स्थायी आरोग्य सेविका, कंत्राटी आरोग्य सेविका, औषधी निर्माता, लिपिक, सुपरवाईजर तसेच दल्ली उपकेंद्रातर्गंत आरोग्य सेविकेचे पद रिक्त आहे. त्यामुळे रुग्णांना वेळीच उपचार मिळत नसल्याचे चित्र आहे. परिणामी वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना त्रास सहन करावा लागत आहे. बरेचदा रुग्णांवर वेळीच उपचार केला जात नाही. त्यामुळे वैद्यकीय अधिकाऱ्यांना रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांच्या रोषाला बळी पडावे लागत आहे.
सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू असून साथीच्या आजाराच्या रुग्णांची संख्या वाढली आहे. या आजाराचे रुग्ण उपचारासाठी प्राथमिक आरोग्य केंद्राकडे धाव घेतात. मात्र वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांची पदे रिक्त असल्याने बरेचदा रुग्णांना उपचार न घेताच परतावे लागते.
हा परिसर आदिवासीबहुल, अतिदुर्गम व नक्षलक्षेत्रात मोडतो. तसेच परिसरातील हे एकमात्र आरोग्य केंद्र असल्याने उपचारासाठी रुग्ण मोठ्या प्रमाणात येतात. जवळपास सरकारी अथवा खासगी दवाखाने सुध्दा नाहीत. त्यामुळे १४ किमीवर सडक-अर्जुनी व २० किमी अंतरावर असलेल्या देवरी येथील ग्रामीण रुग्णालयात जावे लागते. त्यामुळे रुग्ण दगावण्याची शक्यता सुद्धा नाकारता येत नाही.
येथील आरोग्य केंद्रातून इतरत्र स्थानांतर झालेल्या अथवा सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांच्या जागेवर दुसऱ्या कर्मचाऱ्यांची अद्यापही नियुक्ती करण्यात आली नाही.
तरी जनतेचे हित लक्षात घेऊन जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी या समस्येकडे जातीने लक्ष देवून रिक्त पदे भरावी, अशी मागणी या परिसरातील जनतेने केली आहे.

रिक्त पदे भरण्यासाठी आरोग्य विभागाकडे लेखी पत्र पाठविले आहे. मात्र रिक्त पदांची पूर्तता करण्यात आली नाही.
डॉ. किशोर डुंबरे, वैद्यकीय अधिकारी, प्रा.आ.केंद्र, शेंडा.

Web Title: Employees of Primary Health Center

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Healthआरोग्य