लाखांदूर : नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवित बेरोजगार तरुण आणि त्यांच्या कुटुंबीयांना हेरून लाखांदूर तालुक्यातील एका ठगबाजाने आ िलाखांहून अधिक रूपयांनी गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. तक्रार करूनही न्याय मिळत नसल्याने फसवणूक झालेल्या तरुणांनी नागपूरचे पोलीस आयुक्तांकडे न्यायासाठी धाव घेतली आहे.
लाखांदूर तालुक्यातील मुर्झा (पारडी) येथील राहुल पंचम शहारे असे या ठगबाजाचे नाव आहे. गौतम साखरे रा.वडेगाव जि.गोंदिया याला त्याने पहिल्यांदा ४१ हजाराने गंडविले. आॅर्डनन्स फॅक्टरी, भुसावळ येथे नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून त्याने गौतम साखरे यांना वेगवेगळ्या बँक खात्यात पैसे भरण्यासाठी सांगितले. मुलाखतीचे बनावट कॉल लेटर, आणि नियुक्ती आदेश त्याने दिले.
कृपासागर जनबंधू रा.शेंडा जि.गोंदिया यांना त्याने गंडविले. राहुलची बहीण शिल्पा राऊत ही जनबंधू यांच्याकडे भाड्याने राहायची. बहिनीकडे सतत येणाऱ्या राहुलने आपण आॅर्डनन्स फॅक्टरी, भंडारा येथे डाटा एन्ट्री आॅपरेटर पदावर कार्यरत असल्याचे सांगितले. त्यानंतर ओळखीमुळे कृपासागर जनबंधू यांची मुलगी संजीवनी बी.ए.बी.एड. हिला बोरकर नामक अधिकाऱ्यामार्फत आॅर्डनन्स फॅक्टरी भुसावळ येथे स्टोअर किपर पदावर नोकरी लावून देण्याचे आमीष दाखविले. यासाठी त्याने जनबंधू यांच्याकडून पैसे घेत १ लाख २० हजाराने गंडा घातला. या ठगबाजाने जनबंधू याच्या मुलीलाही याच प्रकारे बोगस कॉल लेटर पाठविले होते. त्या कॉललेटरवर संशय बळावल्यामुळे जनबंधू यांनी भंडारा आॅर्डनन्स फॅक्टरी येथे चौकशी केली असता बिंग फुटले.
मुर्झा पारडी येथे घराशेजारील गिरधारी श्रीराम उके याची ४ लाख ४० हजार रूपयाने फसवणूक केली.
गायी व शेळीपालन व्यवसायासाठी कर्ज प्रकरण मंजूर करण्याचे सांगून राहुलने त्यांच्याकडून ४० हजार रूपये लाटले. त्यानंतर उके यांच्या मुलाला पुणे येथील समाजकल्याण विभागात नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून ४ लाखाने गंडविले. नोकरीसाठी उके यांनी घरचे सोने गहाण ठेऊन, धान्य विकून आणि हातउसणवारी करून ही रक्कम त्याला दिली होती.
१ लाख २० हजारांनी फसवणूक झालेले कृपासागर जनबंधू व ४१ हजाराने लुबाडणूक झालेले गौतम साखरे यांनी मुर्झा येथील तंटामुक्त समितीकडे तक्रार केली असता तेथे सुखदेव शंकर टेंभुर्णे रा.मुर्झा, रंजना टेंभुर्णे रा.मांढळ, रजनी वालदे रा.गोरेगाव यांच्याही तक्रारी दिसून आल्या. या तिघांनाही त्याने अनुक्रमे ३५ हजार, २५ हजार आणि १ लाख ५० हजार रूपयाने फसवणूक केल्याचे उघडकीस आले. या पाचही जणांना शहारेने ८ लाख ११ हजार रूपयाने गंडा घातला आहे.
नोकरीचे आमिष देताना त्याने अधिकाऱ्यांच्या पदांचा व नावांचा वापर केला असून वेगवेगळ्या भ्रमणध्वनीवरून बोलणे करून द्यायचे. फसवणुकीच्या या गोरखधंदात शहारे याच्यासोबत आणखी काही लोकांचा सहभाग असून या रॅकेटचे धागेदोरे पसरले आहे. संबंधितांना दिलेल्या बोगस कॉल लेटर आणि नियुक्ती पत्रात त्याने आॅर्डनन्स फॅक्टरीचे महाव्यवस्थापक के.एम. कालानी, श्रीमती सनी, एम.के. खंडाळे, एस.के नाफरी अशा अधिकाऱ्यांच्या नावाने स्वाक्षऱ्या केल्याचेही दिसून आले.
दरम्यान संबंधितांकडून आपण मोठ्या रकमा घेतल्याचे मान्य करीत १० नोव्हेंबर २०१३ पर्यंत पैसे परत करण्याची हमी राहुल शहारे याने मुर्झा येथील तंटामुक्त समितीसमोर लेखी स्वरूपात दिली होती. परंतू कालावधी उलटूनही त्याने पैसे परत केले नाही. फसवणूक झालेल्यांनी दिघोरी, लाखांदूर पोलीस ठाण्यासह पोलीस अधिक्षक यांच्याकडेही तक्रारी नोंदविल्या आहेत. (तालुका प्रतिनिधी)