ऐतिहासिक शाळेत गाळे बांधकामाचा घाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2021 05:00 AM2021-08-12T05:00:00+5:302021-08-12T05:00:48+5:30

जिल्ह्यात इंग्रजकालीन अनेक वास्तू आहेत. त्यापैकी भंडारा शहरातील ऐतिहासिक शाळा म्हणून लालबहादूर शास्त्री विद्यालयाची ओळख आहे. माजी मन्रो शाळा म्हणूनही याचा नावलौकिक आहे. शाळेची इमारत १९१४ साली बांधण्यात आल्याचे सांगण्यात येते. अशा इमारतींसारख्या आणखी तीन इमारती आहेत. काही तज्ज्ञांच्या मते या शाळेची इमारत १९०४ मध्ये बांधण्यात आली; मात्र सन १९८३  मध्ये हीरक महोत्सव (७५ वर्ष पूर्ण) साजरा करण्यात आला होता. त्यानुसार १९०८ हे बांधकामाचे वर्ष म्हणून ओळखले जाऊ लागले.

construction of historical school | ऐतिहासिक शाळेत गाळे बांधकामाचा घाट

ऐतिहासिक शाळेत गाळे बांधकामाचा घाट

googlenewsNext

इंद्रपाल कटकवार 
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : जिल्ह्यातील ऐतिहासिक व नावाजलेली शाळा म्हणून शहरातील लालबहादूर शास्त्री विद्यालय (माजी मन्रो) चे नाव घेतले जाते. या शाळेच्या विस्तीर्ण पटांगणात गाळे बांधकामाचा घाट घातला जात आहे. येथे बांधकाम झाल्यास ऐतिहासिक शाळेचे अस्तित्वच नष्ट झाल्याशिवाय राहणार नाही. भविष्यात हेरिटेज दर्जा प्राप्त होऊ शकणाऱ्या शाळेच्या परिसरात अशा स्वरूपाच्या बांधकामाला परवानगी मिळतेच कशी? हा ज्वलंत प्रश्न समोर उभा ठाकला असून सर्वच स्तरातून या बांधकामाला विरोध होऊ लागला आहे. जिल्हा प्रशासनानेही या गंभीर बाबीची दखल घ्यावी, असे अपेक्षित आहे.
जिल्ह्यात इंग्रजकालीन अनेक वास्तू आहेत. त्यापैकी भंडारा शहरातील ऐतिहासिक शाळा म्हणून लालबहादूर शास्त्री विद्यालयाची ओळख आहे. माजी मन्रो शाळा म्हणूनही याचा नावलौकिक आहे. शाळेची इमारत १९१४ साली बांधण्यात आल्याचे सांगण्यात येते. अशा इमारतींसारख्या आणखी तीन इमारती आहेत. काही तज्ज्ञांच्या मते या शाळेची इमारत १९०४ मध्ये बांधण्यात आली; मात्र सन १९८३  मध्ये हीरक महोत्सव (७५ वर्ष पूर्ण) साजरा करण्यात आला होता. त्यानुसार १९०८ हे बांधकामाचे वर्ष म्हणून ओळखले जाऊ लागले. यावरून ही इमारत खूप जुनी व शंभर वर्षांपेक्षा अधिक काळ झालेली आहे. भविष्यात या इमारतीला हेरिटेज दर्जा मिळण्यास पात्र आहे. 
भव्य वर्गखोल्या, प्रशस्त इमारत, व्हरांडा व मोठे क्रीडांगण अशा या शाळेचे विस्तीर्ण स्वरुप आहे. याच शाळेतून अनेक गुणवंत विद्यार्थी घडवून देश-विदेशात नावलौकिक केले आहे. याच शाळेच्या पटांगणात अनेक सामाजिक सोहळे पार पाडले जातात. अनेक सभा, बैठका येथे होतात. याशिवाय याच शाळेत शिक्षण बोर्डाच्या कस्टोडीयनचीही भूमिका पार पाडली जाते. येथे गाळ्यांचे बांधकाम झाल्यास हजारो पटसंख्येतील विद्यार्थ्यांचे क्रीडांगण क्षेत्रही घटणार आहे. विद्यार्थी खेळणार कुठे? असा प्रश्न उपस्थित होईल. 
विविध क्रीडा स्पर्धांचेही तेच हाल होतील. अशा ऐतिहासिक व विविधांगी उपयोगी येत असलेल्या शाळा परिसरात काही बिल्डर मंडळी दुकानांचे गाळे तयार करण्याचा घाट रचित आहेत. 
विशेष म्हणजे समोरच्या बाजूला उत्तर पश्चिम दिशेला असलेल्या सर्व शिक्षा अभियानाच्या इमारतीजवळ जेसीबीच्या सहायाने काडीकचराही साफ करण्यात आला आहे. लवकरच येथे गाळे बांधकामाला सुरुवात होणार असल्याची विश्‍वसनीय माहिती आहे. भंडारा शहरात अन्य ठिकाणी गाळ्यांचे बांधकाम करून तेच आज बेवारस स्थितीत पडले आहेत. त्यांचेच नियोजन झाले नसताना पुन्हा लक्षावधी रुपयांचा चुराडा करून ऐतिहासिक शाळेचे अस्तित्वच धोक्यात आणण्याचा किळसवाणा प्रकार केला जात आहे.

माजी विद्यार्थ्यांनी शाळा वाचविण्यासाठी घेतला पुढाकार

- शास्त्री शाळेच्या परिसरात दुकानांचे गाळे तयार करण्यासाठी सक्रियता दिसून येत आहे. भंडारा शहरातील जुन्या बसस्थानकामागे जुना चुंगी नाका असलेल्या परिसरात २५ दुकानांची चाळ उद्घाटन न होता तशीच रिकामी पडली आहे. या बांधकामासाठी चार कोटी रुपयांचा चुराडा करण्यात आला होता. कंत्राटदारासह अधिकाऱ्यांंनी लाखोंचा मलिदा लाटला होता. शहरातील मुख्य चौक परिसरातही टिनांचे गाळेही तसेच पडले आहेत. त्यांचे अजूनपर्यंत वाटप झाले नाही. मन्रो शाळेच्या परिसरात नवीन गाळ्यांची तसेच दुकानांची काय आवश्यकता? असा प्रश्न माजी विद्यार्थ्यांनी उपस्थित केला आहे. शंभर वर्षांपेक्षा जुनी इमारत म्हणजे बांधकाम शास्त्राचा एक उत्तम नमुना आहे. अशा शाळेच्या परिसराला छेडछाड करणे म्हणजे हेरिटेज वास्तूला नेस्तनाबूत करण्यासारखे आहे. गुरुजनांनी विद्येचे पवित्र दान हजारो विद्यार्थ्यांना देत संस्कृती जपली. परिणामी अशा ऐतिहासिक शाळा परिसरात दुकानांचे गाळे बांधकाम कदापि होऊ नये, अशी एकमुखी मागणी या शाळेच्या माजी विद्यार्थ्यांनी केली आहे.

अशाच प्रकारच्या तीन इमारती  
-  मन्रो हायस्कूलची इमारत शंभर वर्षांपूर्वीपेक्षा जास्त व जुनी आहे. याच प्रकारच्या इमारती तीन शहरात बघायला मिळतात. यात अमरावती येथील सायन्स कोअर हायस्कूल, चंद्रपूर येथील जुबिली हायस्कूल तर जबलपूर येथील गव्हर्मेंट हायस्कूलची इमारत याच पद्धतीने बांधण्यात आली आहे. अशा इंग्रजकालीन इमारतीला जतन करण्यापेक्षा त्याचे सौंदर्य व विस्तीर्णपणा धोक्यात आणण्याचा कट रचला जात असल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. उल्लेखनीय म्हणजे या इमारती अगदी एकसारख्या असून त्यांचे आकारमान नाही तर क्षेत्रफळ आणि विटांमध्येही एकसारखेपणा दिसून येतो. अशा वास्तू मूळ स्वरूपात वाचवायला हव्यात. यासाठी प्रत्येकाच्या पुढाकाराची गरज आहे.

भंडारा शहरात अन्य ठिकाणीही गाळ्यांचे बांधकाम होऊ शकते. ऐतिहासिक स्थळांना टारगेट करून त्यांचे अस्तित्व धोक्यात का आणले जात आहे. हे एक न उलगडणारे कोडे आहे. बसस्थानकाजवळील जुना चुंगी नाका परिसरातही गाळ्यांचे बांधकाम करून पैशांची फक्त उधळपट्टी करण्यात आली. आता तर ऐतिहासिक शाळा असलेल्या शास्त्री विद्यालय परिसरात गाळा बांधकामाचा विचार केला जात आहे. ही या शहराची शोकांतिकाच म्हणावी लागेल. जिल्हाधिकारी यांनी याची तत्काळ दखल घेणे आवश्यक आहे.
-डॉ. नितीन तुरस्कर, सामाजिक कार्यकर्ता, भंडारा.

 

Web Title: construction of historical school

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Schoolशाळा