आगामी काळातील सण उत्सव एकोप्याने साजरे करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2018 10:46 PM2018-09-07T22:46:52+5:302018-09-07T22:47:30+5:30

आगामी काळात येणारा पोळा, तान्हा पोळा, मोहरम, गणेशोत्सव व दुर्गोत्सव, शारदोत्सव सण नागरिकांनी जातीय सलोखा कायम ठेवत शांततेने व एकोप्याने साजरे करावे. भंडारा जिल्हा शांतताप्रिय असल्याचे या माध्यमातून पुन्हा एकदा समोर येईल. अशा स्वरुपाचे आयोजन करावे, असे आवाहन खासदार मधुकर कुकडे यांनी केले.

Celebrate the festival of upcoming times | आगामी काळातील सण उत्सव एकोप्याने साजरे करा

आगामी काळातील सण उत्सव एकोप्याने साजरे करा

googlenewsNext
ठळक मुद्देमधुकर कुकडे : जातीय सलोखा समितीची सभा, सोशल मीडियाचा गैरवापर टाळण्याचे आवाहन

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : आगामी काळात येणारा पोळा, तान्हा पोळा, मोहरम, गणेशोत्सव व दुर्गोत्सव, शारदोत्सव सण नागरिकांनी जातीय सलोखा कायम ठेवत शांततेने व एकोप्याने साजरे करावे. भंडारा जिल्हा शांतताप्रिय असल्याचे या माध्यमातून पुन्हा एकदा समोर येईल. अशा स्वरुपाचे आयोजन करावे, असे आवाहन खासदार मधुकर कुकडे यांनी केले.
पोलीस बहुउद्देशीय सभागृहात आयोजित जातीय सलोखा समिती बैठकीत ते बोलत होते. याप्रसंगी जिल्हाधिकारी शांतनू गोयल, जिल्हा परीषद मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र जगताप, अप्पर जिल्हाधिकारी दिलीप तलमले, अप्पर पोलीस अधिक्षक रश्मी नांदेडकर, उपविभागीय अधिकारी प्रविण महिरे, स्मिता पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम साळी, प्रभाकर टिक्कस, पोलीस उपअधिक्षक (गृह) बंडोपंत बनसोड, तहसिलदार मलिक विराणी उपस्थित होते.
शांतताप्रिय उत्सवाची जिल्ह्याची परंपरा कायम ठेवा असे आवाहन करुन खासदार कुकडे म्हणाले, ईद व गणेशोत्सव एकत्र येत असल्याने उत्सवाला गालबोट लागेल असे काही घडू देवू नका. उत्सवादरम्यान सलोख्याचा उत्सव आपण सर्व साजरा करु या. महिलांची सुरक्षितता, मूर्तीची सुरक्षितता तसेच कायदा व सुव्यवस्था या बाबतीत तडजोड केली जाणार नाही, असे ते म्हणाले.
गणेश मंडळाकडून चांगल्या व विधायक कार्याचीच अपेक्षा आहे. ध्वनी प्रदुषण होणार नाही याची काळजी गणेश मंडळाने घेणे गरजेचे असल्याचे जिल्हाधिकारी शांतनू गोयल म्हणाले. उत्सवादरम्यान सोशल मिडियावर येणाऱ्या संदेशाचे खात्री करुनच ते पुढे पाठवावेत असे सांगून जिल्हाधिकारी म्हणाले की, जातीय सलोखा धोक्यात आणणारे संदेश आल्यास सर्व प्रथम पोलीसांना कळवावे. सोशल मिडियाचा गैरवापर टाळावा. तसेच कोणाच्या भावना दुखावणार नाहीत याबाबत जागरुकता बाळगावी. उत्सवाबद्दल आस्था ठेवा पण त्यात अहम येता कामा नये असे, आवाहन त्यांनी केले. उत्सव शांततेत साजरा करण्याची आपली परंपरा कायम ठेवा, असेही ते म्हणाले.
मर्यादेबाहेर होणाऱ्या आवाजामुळे कर्णबधिरता व कानाचे आजार मोठ्या प्रमाणात होतात, ही बाब गणेश मंडळाने प्रकर्षाने टाळावी व हा गणेशोत्सव डिजे मुक्त गणेशोत्सव म्हणून साजरा करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले.
गणेशोत्सव व ईद एकत्र येत असल्यामुळे जातीय सलोखा आबाधित असल्याचे दाखवून देण्याची ही संधी असल्याचे अप्पर जिल्हा पोलीस अधिक्षक रश्मी नांदेडकर यांनी सांगितले. गणेशोत्सव व ईद दरम्यान दोन्ही समाजात ताण तणाव वाढणार नाही याची खबरदारी सर्वांनी घ्यावी, असे त्या म्हणाल्या. यावर्षी गणेश मंडळाची परवानगी आॅनलाईन देण्यात येणार असून गणेश मंडळाने परवानगी आॅनलाईन अर्ज सादर करावे, असे आवाहन त्यांनी केले. गेल्यावर्षी डिजे मुक्त वातावरणात गणेश उत्सव पार पडला होता. यावर्षी सुध्दा डिजेमुक्त उत्सव साजरा करावा, असे त्या म्हणाल्या. जे मंडळ बॅनर, पोस्टर्स छापतील त्यावर प्रिंटरचे नाव असणे बंधनकारक असल्याचे त्यांनी सांगितले.
शाळा महाविद्यालय, रुग्णालय अशा ठिकाणी आवाजाची मर्यादा पाळण्यात यावी. शक्यतो डिजे मुक्त उत्सव साजरा करावा. या उत्सवादरम्यान मुलांच्या परीक्षा येत असून त्यांना त्रास होणार नाही याची काळजी घेण्याचे आवाहन त्यांनी केले. आवाजाचा थेट परिणाम कर्ण बधिरतेवर होत असून ज्येष्ठ नागरिकांना व विद्यार्थ्यांना त्याचा त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे ध्वनी विरहित उत्सव ही संकल्पना अमलात आणण्याचे आवाहन त्यांनी केले.
यावेळी विविध शांतता समितीच्या सदस्यांनी आपले मत व्यक्त केले. यावर्षीचा गणेशोत्सव व ईद सामाजिक एकोपा व ऐक्याचे प्रतिक राहील, अशी ग्वाही या प्रसंगी देण्यात आली. आभार पोलीस उपअधिक्षक बंडोपंत बनसोडे यांनी केले तर, संचलन पोलीस निरिक्षक जितेंद्र आढोळे यांनी केले. या बैठकीस जातीय सलोखा समिती सदस्य, तंटामुक्त गाव मोहिम समिती अध्यक्ष, गणेश मंडळ अध्यक्ष व अधिकारी मोठया संख्येने उपस्थित होते.

Web Title: Celebrate the festival of upcoming times

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.