पैशाच्या वादातून फुटले वाघाच्या शिकारीचे बिंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2019 11:05 PM2019-07-03T23:05:27+5:302019-07-03T23:05:45+5:30

शिकार केलेल्या रानडुकराचे मांस विकलेल्या पैशावरून झालेल्या वादात वाघाच्या शिकारीचे बिंग फुटले असून आंतरराज्यीय शिकाऱ्यांची टोळी आयतीच वनविभागाच्या हाती लागली. हा वाद झाला नसता तर तुमसर तालुक्यातील सीतासावंगी येथे झालेल्या वाघाची शिकारही पुढे आली नसती.

Bucking the tigress of a pale from the promise of money | पैशाच्या वादातून फुटले वाघाच्या शिकारीचे बिंग

पैशाच्या वादातून फुटले वाघाच्या शिकारीचे बिंग

Next
ठळक मुद्देआणखी चौघे अटकेत : म्होरक्याच्या शोधात पथक मध्य प्रदेशात तळ ठोकून

ज्ञानेश्वर मुंदे।
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : शिकार केलेल्या रानडुकराचे मांस विकलेल्या पैशावरून झालेल्या वादात वाघाच्या शिकारीचे बिंग फुटले असून आंतरराज्यीय शिकाऱ्यांची टोळी आयतीच वनविभागाच्या हाती लागली. हा वाद झाला नसता तर तुमसर तालुक्यातील सीतासावंगी येथे झालेल्या वाघाची शिकारही पुढे आली नसती. दरम्यान या प्रकरणात आणखी चौघांना अटक करण्यात आली असून अटकेतील शिकाऱ्यांची संख्या दहा झाली आहे तर वनविभागाचे पथक या टोळीच्या म्होरक्याच्या शोधात सध्या मध्य प्रदेशात तळ ठोकून आहे.
तुमसर तालुक्यातील नाकाडोंगरी वनपरिक्षेत्रांतर्गत झालेल्या वाघाच्या शिकारीनंतर आता एकएक प्रकरण बाहेर येत आहे. शिकाºयांजवळून २२ वाघनखे जप्त केल्याने त्यांनी एक नव्हे तर दोन वाघांची शिकार केल्याच्या निष्कर्षाप्रत वनविभाग पोहचला आहे. तुमसर तालुक्यातील सीतासावंगी येथे रानडुकराचे मांस एका घरात शिजविल्या जात असल्याची माहिती वनविभागाला मिळाली. ही माहिती या शिकारीत सहभागी असलेल्याच एकाने दिल्याचे खात्रीशिर वृत्त आहे. वनविभागाने धाड मारली तेव्हा सुरुवातीला घरातून रानडुकराचे शिजलेले मांस जप्त करण्यात आले. त्यानंतर ताब्यात घेतलेल्या व्यक्तीला बाजीरावचा हिसका दाखविल्यानंतर त्याने वाघाची शिकार केल्याचे कबुल केले. वाघाची शिकार झाल्याचे कळताच वनविभाग खळबडून जागा झाला. पुन्हा शिकारी मनीराम आनंदराम गंगबोयर यांच्या घराची झडती घेतली. त्यात घरातून वाघाचे २२ नखे व बिबट्याचे दोन नखे जप्त करण्यात आली. तसेच वाघाचे कातडेही आढळून आले. एवढेच नाही तर जंगलात पुरलेला वाघाचा सांगाडाही जप्त करण्यात आला. शिकारीच्या पैशाचा वाद झाला नसता तर वाघाच्या शिकारीचे प्रकरणही पुढे आले नसते. आता वनविभाग आंतरराज्यीय टोळीचा शोध घेत आहेत.
या प्रकरणात सुरुवातीला मनीराम आनंदराम गंगबोयर, शीव मदन कुंभरे, रोहित नरसिंग भत्ता (रा.सीतासावंगी), विजय सुंदरलाल पारधी (रा.गुढरी), रवींद्र किसन राहांगडाले (रा.गोबरवाही) आणि चमरू ताराचंद कोहळे (रा.राजापूर) यांना अटक करण्यात आली होती. त्यांना ५ जुलै पर्यंत वनकोठडी देण्यात आली आहे. वनविभाग सखोल तपास करीत असून त्यांनी दिलेल्या माहितीवरून आणखी चौघांना ताब्यात घेऊन अटक करण्यात आली. दरम्यान या प्रकरणाचे धागेदोरे मध्यप्रदेशात असल्याने वनविभागाचे पथक गत तीन दिवसांपासून मध्यप्रदेशात तळ ठोकून आहेत. म्होरक्याचा शोध घेतला जात आहे. या प्रकरणात आणखी दोन आरोपी असल्याची शक्यता वनविभागाने वर्तविली. या शिकार प्रकरणात अटक असलेला मनीराम गंगबोयर यांचे घर सीतासावंगी गावात शेवटच्या टोकावर आहे. त्यानंतर जंगल आणि तलाव आहे. याच परिसरातून ११ केव्ही वीज वाहिनी गेली आहे. २८ जूनच्या रात्री त्याच वाहिनीवरून वीज पुरवठा घेऊन त्याने शीव कुंभरेच्या मदतीने एका शेतशिवारात फास लावला. त्यात वाघ ठार झाला. मनीराम हा गत सहा ते सात वर्षापासून वन्यप्राण्यांच्या शिकारीत गुंतलेला असल्याची माहिती आहे. रानडुक्कर, हरिण आदींची शिकार करून त्याचे मांस विकतो. याच मांस विक्रीतून साथीदारांसोबत वाद झाला आणि वादातून कुणीतरी वनपरिक्षेत्र अधिकाºयांना रानडुकराच्या शिकारीची माहिती दिली. मात्र वनविभागाला अपेक्षित नसतानाही चक्क वाघाच्या शिकारीचे प्रकरण पुढे आले. आता वनविभागाचे पथक नाकाडोंगरीचे जंगल पिंजून काढत असून आजपर्यंत मनीरामच्या टोळीने किती वन्यप्राण्यांची शिकार केली याचा शोध घेतला जात आहे. घरात आढळलेल्या वाघनखांच्या संख्येवरून त्याने दोन वाघांची शिकार केल्याचा अंदाज आहे.

दोन वाघांची शिकार केल्याचा अंदाज
बहेलिया टोळीवर संशय
वाघाच्या शिकारीसाठी कुप्रसिद्ध असलेल्या बहेलिया टोळीचा सीतासावंगी शिकार प्रकरणाशी काही संबंध आहे काय याचा तपास वनविभाग घेत आहेत. विशेष म्हणजे वाघाचा कुख्यात शिकारी कुट्टू पारधी याला भंडारा पोलिसांनी अटक केली होती. या टोळीचे नेटवर्क उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश असे आहे. सीतासावंगी प्रकरणात नेमकी कोणती टोळी सहभागी आहे याचा शोध घेतला जात आहे.

सातपुडा पर्वतरांगा तस्करांसाठी नंदनवन
तुमसर तालुक्यातील सातपुडा पर्वतरांना तस्करांसाठी नंदनवन ठरत आहेत. या परिसरात ७५ टक्के जंगल राखीव आहे. तुमसर, नाकाडोंगरी आणि लेंडेझरी हे तीन वनपरिक्षेत्र आहेत. याच परिसरातून पेंच राखीव व्याघ्र प्रकल्पाकडेही रस्ता जातो. त्यामुळे मध्यप्रदेशातून नाकाडोंगरी लेंडेझरी मार्गे तस्कर या भागात शिकार करून मध्यप्रदेशात पळून जातात.

वाघाच्या शिकार प्रकरणाचा कसून तपास सुरु आहे. शिकार प्रकरणातील म्होरक्याला लवकरच अटक केली जाईल.
-प्रितम कोडापे, सहाय्यक उपवनसंरक्षक.

Web Title: Bucking the tigress of a pale from the promise of money

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.