विषयाच्या अनुपालनासाठी अधिकाऱ्यांकडे वेळच नाही

By admin | Published: March 19, 2017 12:21 AM2017-03-19T00:21:56+5:302017-03-19T00:21:56+5:30

जनता दरबारात आपले प्रश्न सुटतील या आशेने आलेल्या तक्रारकर्त्यांचे विषय अधिकाऱ्यांनी फाईलीत गुंडाळून ठेवले आहेत.

The authorities do not have time to comply with the subject | विषयाच्या अनुपालनासाठी अधिकाऱ्यांकडे वेळच नाही

विषयाच्या अनुपालनासाठी अधिकाऱ्यांकडे वेळच नाही

Next

जनतेचे प्रश्न तसेच पडून : अधिकारी गंभीर नाहीत, कार्यकर्त्यांनी घेतला आढावा
मोहाडी : जनता दरबारात आपले प्रश्न सुटतील या आशेने आलेल्या तक्रारकर्त्यांचे विषय अधिकाऱ्यांनी फाईलीत गुंडाळून ठेवले आहेत. खासदार नाना पटोले यांनी सात दिवसात अनुपालन झाले पाहिजे असे निर्देश जनता दरबारात दिले होते. तथापि अर्धा महिना उलटूनही अधिकाऱ्यांनी जनता दरबारात आलेले विषय गांभीर्याने घेतले नसल्याची बाब कार्यकर्त्यांनी घेतलेल्या आढाव्यात उघडकीस आली आहे.
प्रशासनातील अधिकारी, कर्मचारी सामान्य जनतेचे प्रश्न सोडवित नाही. उलट त्या प्रश्नांचा गुंता कायम कसा राहील याचा अधिक विचार करतात. लहान लहान प्रश्न मार्गी लावण्यात अधिकारी, कर्मचाऱ्यांना आनंद येतो. त्यामुळे जनता अधिकाऱ्यांवर, कर्मचाऱ्यांवर संताप कशी व्यक्त करते याचा वास्तविक अनुभव मोहाडी येथील जनता दरबारात दिसून आला. जनता दरबारात संतापलेल्या सामान्य जनतेच्या सहनशिलतेची आता मर्यादा पार झाल्याचे दिसून आले. मोहाडी येथील जनता दरबारात सर्वात जास्त तक्रारी महसूल विभागाच्या आहेत. तब्बल १३५ तक्रारी आल्याची नोंद आहे. विद्युत विभाग १०, सार्वजनिक बांधकाम विभाग ५, नगरपंचायत ११, पंचायत समिती ४५, तालुका कृषी विभाग २, आरोग्य विभाग ५, बावनथडी प्रकल्प ६, पाटबंधारे विभाग १, वनपरिक्षेत्र कांद्री - तुमसर ९, भूमी अभिलेख ७, सहाय्यक निबंधक ५ अशा तक्रारी आल्याची नोंद करण्यात आली आहे. आलेल्या तक्रारीपैकी केवळ विद्युत विभाग व सार्वजनिक बांधकाम विभागाने तक्रारीचे निरसन करून अनुपालन अहवाल तहसीलदार मोहाडी यांच्याकडे पाठविला आहे. उर्वरित दहा विभागाच्या अधिकाऱ्यांना तक्रारीचा निपटारा करून अनुपालन अहवाल संबंधितांकडे पाठविण्याची वेळच नाही असे दिसून येते. किंबहुना जनता दरबारातील उपस्थित विषयासंबंधी गांभीर्य नाही हे लक्षात येते. महसूल विभागाचे तालुक्याचे सर्वेसर्वा तहसीलदार धनंजय देशमुख यांनी तर आपल्या विभागाचे कोणते प्रश्न आहेत यावर नजरही फिरविली नसल्याचे दिसून आले. आधी मार्च एंडींग, जिल्हा प्रशासनाने दिलेले वसुलीचे उद्दिष्ट्ये पूर्ण करण्यासाठीच वेळ नाही असे तहसीलदार सांगतात. यावरून तहसीलदार जनता दरबारातील विषयांना हलक्यात घेतले आहे असे प्रथमदर्शनी दिसून आले आहे. सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी ९ मार्च पर्यंत अनुपालन अहवाल तहसीलदार यांच्याकडे देणे अपेक्षित होते. परंतु तसे घडलेले नाही. जनता दरबारातील विषयाच्या अनुपालनासंबंधी माहिती घेण्यास खासदार नाना पटोले यांचे नेमलेले कार्यकर्ते गजानन झंझाड, खुशाल कोसरे, ज्योतिष नंदनवार तहसीलदार यांच्याकडे १६ मार्च रोजी गेले होते. त्यावेळी घेण्यात आलेल्या आढाव्यात सगळे विषय अधिकाऱ्यांनी फाईलमध्ये गुंडाळून ठेवलेले आहेत असे निदर्शनास आले आहे. जनता दरबारात महसूल विभागाचे प्रश्नात फेरफार, सरकारी पट्टे, अतिक्रमणातील पट्टे, वहिवाटी रस्ता, पांदन रस्ता, आबादी प्लॉट, अन्नसुरक्षा योजनेत घोळ, झुडपी जंगल आदी विषयांचा समावेश आहे. पंचायत समितीच्या विभागात घरकुल, शौचालय बांधकाम रोजगार हमी योजना या विषयाचा समावेश आहे. सावकारांकडून दागिने परत न मिळण्याबाबत, ग्रामीण रुग्णालयांच्या समस्या, बावनथडी जमिनीचा मोबदला, वन्यप्राण्यांचा हैदोस आदी महत्वाचे प्रश्न तक्रारकर्त्यांनी मोठ्या अपेक्षेने जनता दरबारात मांडले होते. आपसात तक्रारकर्ते, आमच्या तक्रारीचे कार्य झाले असा प्रश्न एकमेकांना विचारीत आहेत. जनता दरबार असो की आमसभा यातील आलेले विषय गंभीरतेने घ्यायचे नसतात, असा समाज अधिकाऱ्यांनी करून घेतला आहे. वेळ मारून नेण्याची कला अवगत असणारे अधिकारी आमचे काही होत नाही या बेफिकरी भावनेने कर्तव्य बजावत आहेत. याच कारणामुळे अधिकाऱ्यांवर सोबतच जनप्रतिनिधींवर सामान्य जनता अविश्वासाचा ठपका ठेवत असतात. मोहाडीत जनता दरबाराला दोन आठवडे उलटून गेले. तरीही प्रशासनात काम करणारे अधिकारी जनता दरबारातील विषय संदर्भात अजिबात गांभीर्य नाहीत हेच दिसून आले आहे. जनता दरबारातील विषयांचे अनुपालन काय झाले याविषयी तहसीलदार मोहाडी यांना विचारले असता आधी महसूल विभागाने दिलेला लक्षांक गाढायचा आहे. असे उत्तर आले. ज्या विभागातील अधिकाऱ्यांनी अनुपालन अहवाल पाठविण्याची दिरंगाई केली, अहवाल पाठविला नाही याबाबत त्यांना तात्काळ कारणे दाखवा नोटीस बजावण्यात येणार असल्याचे सांगितले. (तालुका प्रतिनिधी)

जनता दरबारातील तक्रारी संबंधात ज्या विभागांनी अनुपालन अहवाल पाठविले नाही त्यांना नोटीस बजावण्यात आली आहे. अहवाल तात्काळ पाठवावे, अन्यथा शिस्तभंगाची कारवाई प्रस्तावित करण्याबाबत जिल्हाधिकारी भंडारा यांना सूचित करण्यात येईल असे सांगण्यात आले आहे.
-धनंजय देशमुख, तहसीलदार, मोहाडी.

Web Title: The authorities do not have time to comply with the subject

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.