वैनगंगेचे प्रदूषण थांबविण्यासाठी पवनी येथे अर्धदफन आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2019 01:01 AM2019-06-20T01:01:07+5:302019-06-20T01:01:50+5:30

नागपूर शहर व जिल्ह्यातील दूषित पाणी नागनदीद्वारे वैनगंगेत मिसळते. त्यामुळे वैनगंगेचे पाणी प्रदूषित झाले आहे. या प्रकाराकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी युवाशक्ती संघटनेच्या वतीने बुधवारी वैनगंगा नदीपात्रात अर्धदफन आंदोलन करण्यात आले.

Ardhfan movement on Pawni to stop the pollution of Wainganga | वैनगंगेचे प्रदूषण थांबविण्यासाठी पवनी येथे अर्धदफन आंदोलन

वैनगंगेचे प्रदूषण थांबविण्यासाठी पवनी येथे अर्धदफन आंदोलन

googlenewsNext
ठळक मुद्देयुवाशक्ती संघटना : नाग नदीवर जलशुद्धीकरण सयंत्र बसवा

लोकमत न्यूज नेटवर्क
पवनी : नागपूर शहर व जिल्ह्यातील दूषित पाणी नागनदीद्वारे वैनगंगेत मिसळते. त्यामुळे वैनगंगेचे पाणी प्रदूषित झाले आहे. या प्रकाराकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी युवाशक्ती संघटनेच्या वतीने बुधवारी वैनगंगा नदीपात्रात अर्धदफन आंदोलन करण्यात आले. नागनदीवर जलशुद्धीकरण सयंत्र बसवून वैनगंगा नदी प्रदूषित होण्यापासून वाचवा अशी मागणी करण्यात आली.
नागपूर शहर व जिल्ह्यातील दूषित पाणी नाग, कन्हान नदीद्वारे आंभोरा येथे अन्य चार नद्यांसह वैनगंगा नदीला मिळते. नागनदीमध्ये शहरातील सांडपाणी, कारखान्यातील रसायनयुक्त पाणी येते. तेच पाणी वैनगंगा नदीत मिसळते. नागपूर शहरातून दररोज ४२० दशलक्ष लिटर प्रतीदिन सोडले जाते. त्यापैकी नागपूर शहराजवळील भांडेवाडी येथे ८० दशलक्ष लिटर पाण्यावर शुद्धीकरणाची प्रक्रिया केली जाते तर उर्वरीत पाणी कोणतेही प्रक्रिया न करता थेट सोडले जाते. नागनदीचे पाणी पूर्णपणे काळ्या रंगाचे असून त्याची दुर्गंधी येते. त्यामुळे वैनगंगा नदी प्रदूषित होत आहे. गोसेखुर्द धरणात २००९ पासून पाणी संचय सुरु आहे. नागनदीचे पाणी येथे थोपवून भंडारा जिल्ह्यातील वैनगंगा नदीकाठावरील नागरिकांना त्याचा परिणाम भोगावा लागत आहे.
प्रदूषित नागनदी मिश्रीत वैनगंगा नदीच्या पाण्यात विषारी घटकांचे प्रमाण वाढले असून गोसीखुर्द धरणातील पाण्यातील आॅक्सीजनचे प्रमाण अतिशय कमी झाले आहे. हजारो मासे मृत्यूमुखी पडत आहेत. या सर्व प्रकारामुळे नागरिकांनाही विविध आजार जडत आहेत. या सर्व प्रकाराकडे लक्ष वेधण्यासाठी बुधवारी पवनी येथे वैनगंगा नदीपात्रात देवराज बावनकर यांच्या नेतृत्वात अर्धदफन आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात देवराज बावनकर, प्रशांत मोहनकर, दीपक बावनकर, सुनील हटवार, जयपाल वंजारी, मच्छींद्र हटवार, लिलाधर काटेखाये, योगेश बावनकर, गोपाल काटेखाये, सोनू समरीत, भगवान शेंडे, उमेश मोहरकर, लतीराज वाघमारे, मंगला बावनकर, भाग्यश्री येलमुले, आकाश हटवार, राहुल नंदनवार, अंकोश सावरकर, रवींद्र जांभोरकर, अभय लांजेवार, रुपलता वंजारी, कीर्ती काटेखाये, रेखा नागपुरे, लिना बावनकर आदी सहभागी झाले होते.

पंतप्रधान व मुख्यमंत्र्यांना निवेदन
नागपूर शहरातून येणाऱ्या दूषित पाण्यासंदर्भात उपाययोजना करावी यासाठी युवाशक्ती संघटनेने अर्धदफन आंदोलन केल्यानंतर पंतप्रधान व मुख्यमंत्र्यांना तहसील प्रशासनामार्फत निवेदन पाठविले आहे. जनतेच्या आरोग्याशी खेळणारा हा प्रकार थांबविण्याची मागणी करण्यात आली.

Web Title: Ardhfan movement on Pawni to stop the pollution of Wainganga

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :riverनदी