माउली आपल्यात नाहीत पण त्यांनी लावलेला मोगरा आजही दरवळतोय!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2023 10:13 AM2023-12-11T10:13:04+5:302023-12-11T10:13:36+5:30

कार्तिक वद्य त्रयोदशीला संत ज्ञानेश्वरांनी समाधी केली, पण अवघ्या २२ वर्षांच्या कार्यकाळात ज्ञानाचा, भक्तीचा लावलेला मोगरा कायम दरवळत राहील!

Today is the day Mauli took Sanjeevan Samadhi; However, the mogra planted by them is still blooming! | माउली आपल्यात नाहीत पण त्यांनी लावलेला मोगरा आजही दरवळतोय!

माउली आपल्यात नाहीत पण त्यांनी लावलेला मोगरा आजही दरवळतोय!

आपण बहरात आल्याची वर्दी फुलांना द्यावी लागत नाही, त्यांचा परिमळ त्यांच्या अस्तित्वाची ओळख करून देतो. तीच बाब मोगरीच्या कळ्यांची. वाऱ्याच्या झुळुकेसरशी येणारा मोगऱ्याचा दरवळ मनाचा गाभारा व्यापून टाकतो. आपल्या बागेतल्या रोपट्याला मोगरीच्या कळ्या आल्या आणि बहरल्या, तरी आपल्याला किती हायसे वाटते! संत सांगतात, बागेतल्या कळ्या एवढ्या आनंद देतात, तर आयुष्यात मोगरा फुलेल, तो किती आनंद देईल याची कल्पना करा. 

भक्ताच्या परमार्थ जीवनात साधकदशेपासून सिद्धावस्थेपर्यंत जी वाटचाल होते, तिचे वर्णन संत ज्ञानेश्वरांनी आपल्या एका अभंगात सुंदर रुपकाच्या माध्यमातून सूचित केले आहे. भक्ताला आत्मज्ञान होते. 'अहं ब्रह्म अस्मि' मीच परब्रह्म आहे. परमेश्वराचा अंश माझ्या ठिकाणी आहे. हा आत्मानुव व्यक्त करताना ज्ञानदेव म्हणतात,

इवलेसे रोप लावियले द्वारी,
तयाचा वेलु गेला गगनवरी।
मोगरा फुलला, मोगरा फुलला।
फुले वेचिता अतिभारू कळियांसी आला।
मनाचिये गुंती गुंफियला शेला,
बाप रखुमादेवीवरू विठ्ठली अर्पिला।

आपल्या अंगणात अंकुरलेल्या इवल्याशा रोपाचा केवढा वाढविस्तार झाला, हे सांगताना ज्ञानदेव सांगतात, `माझ्या दाराजवळ मी आत्मविद्येचे लहानसे रोप लावले. त्या रोपाचा वेल बघता बघता बहरला. वेल आकाशभर पसरला. हा वेल मोगऱ्याचा होता. तो पानोपानी फुलला. त्याच्यावर भावार्थाची असंख्य फुलं उमलली. पहिली फुलं वेचावीत, तोवर पुन्हा अनेक कळ्यांचा बहर येतच होता. त्या भाव-फुलांचा सुगंध हार मी गुंफला. रखुमाईचा पती व माझा पिता श्रीविठ्ठल यांच्या गळ्यामध्ये तो हार मी समर्पण केला.'

Web Title: Today is the day Mauli took Sanjeevan Samadhi; However, the mogra planted by them is still blooming!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.