बोरन्हाण, शबरीची बोरे आणि रामायणातील कथा यांचा परस्परसंबंध किती छान आहे बघा!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2024 12:22 PM2024-01-24T12:22:48+5:302024-01-24T12:23:56+5:30

संक्रांतीपासून सुरु झालेले बोरन्हाण रथसप्तमीपर्यंत चालेल. त्यात मुलांच्या डोक्यावर बोरं घातली जातात त्यामागे शाबरी विद्या आहे, कशी ते पहा!

Look at the interrelationship between Boranhan, Sabari mata and the story of Ramayana! | बोरन्हाण, शबरीची बोरे आणि रामायणातील कथा यांचा परस्परसंबंध किती छान आहे बघा!

बोरन्हाण, शबरीची बोरे आणि रामायणातील कथा यांचा परस्परसंबंध किती छान आहे बघा!

>> उन्नती गाडगीळ 

मकर संक्रांती ते रथसप्तमीच्या काळात तान्ह्या बाळाचे तसेच पाच वर्षांपर्यंतच्या मुलांचे बोरन्हाण केले जाते. बोरन्हाण हा एक शिशुसंस्कार आहे. आईच्या गर्भातून बाहेर आल्यावर या सृष्टीशी, ऋतुमानाशी जुळवून घेत साजरा केला जाणारा हा सोहळा आहे. यात संस्कारांबरोबर शिशूच्या आरोग्यासाठी उपयुक्त आणि आवडीच्या गोष्टींचा समावेश केला जातो. अगदीच तान्ह्या बाळाला या गोष्टी अनुभवणे अशक्य आहे, म्हणून पाच वर्षांपर्यंत मुलांचे बोरन्हाण केले जाते. नकळत्या वयापासून कळत्या वयापर्यंत मुलांच्या आठवणी तयार होत जातात आणि कळत नकळत संस्कृतीशी, परंपरेशी, निसर्गाशी त्यांचीही नाळ जोडली जाते.

बोरन्हाण घालताना बाळाला लागणार नाहीत अशा बेताने वजनाने हलक्या पण आकर्षक, तरी आरोग्यवर्धक गोष्टींनी बोरन्हाण घातले जाते. त्यात चुरमुरे, लाह्या, हलव्याचे दाणे, छोटी बोरं, चिंचा, गाजराचे तुकडे, भुईमुगाच्या शेंगा, तसेच रंगीबेरंगी गोळ्या, चॉकलेट, बिस्कीट अशा गोष्टींचाही समावेश केला जातो. या सोहळ्यात सहभागी झालेल्या इतर मुलांनी तो खाऊ वेचून घरी न्यायचा असतो. यानिमित्ताने इतर मुलांनाही या गोष्टी आठवणीत राहतात आणि उत्सवमूर्ती बाळाला किंवा लहान मुलाला या खेळाची गंमत वाटते. यात जी बोरं टाकली जातात ती शाबरी विद्येचे प्रतीक मानली जातात. त्यामागील कथा जाणून घेऊ. 

श्रमणा उर्फ शबरी भिल्ल समाजातील सुंदर राजकुमारी होती.विवाह प्रसंगी पशूबळी द्यावा लागतो हे  हळव्या शबरीला मान्य नव्हते. विवाह न करता ती मातंग ऋषींच्या आश्रमात राहून तिने धर्म शास्त्र विद्या प्राप्त केली.ती श्री. रामाची भक्त होती.भजनकार होती. मातंग ऋषिंनी मृत्यू समयी सांगितले, "'आश्रमाचे व औषधी  वनस्पती(बोर) चे रक्षण कर.रामाची प्रतीक्षा कर."

काही काळानंतर श्रीराम, लक्ष्मण तिचा शोध घेत आश्रमात आले. तिने द्विमूर्तींचे स्वागत व पूजन केले. श्रीरामांना आदेश होता, वनवासात गुरुवाणीतून विद्या घ्यायची नाही. म्हणून विद्यावती शबरीने चतुराईने बोरातून (संजीवनी) शाबरी विद्या दिली. ''पंपासरोवरात जाऊन सुग्रीवाच्या भेटीचा'' मार्ग दाखवला. लक्ष्मण परान्न घेत नसे. म्हणून त्याने बोरे खाल्ली नाहीत. म्हणून संजीवनी विद्या तो घेऊ शकला नाही. त्यामुळेच इंद्रजितच्या बाणाने तो बेशुद्ध झाला. म्हणून रामाज्ञेनुसार हनुमान द्रोणागिरी पर्वत घेऊन आला. श्रीरामाने संजीवनी सहाय्याने लक्ष्मणास पुनर्जन्म दिला.

म्हणूनच बोरन्हाण घालताना मुलांच्या डोक्यावर बोरं घातली जातात. आरोग्य वर्धक म्हणून बोरीचे स्नान बाळाला घालतात. थोडक्यात आपले सण, संस्कृती आणि संस्कार किती परस्पर संबंधित आहेत, याचा अंदाज वरील कथांवरून येतो. ही साखळीच आपल्याला एकमेकांशी बांधून ठेवणारी आहे, त्यानिमित्ताने का होईना, जमेल तसे, जमेल तेव्हा संस्कृतीचे जतन, संवर्धन करायला हवे, नाही का?

Makar Sankranti 2024: वयाच्या पाच वर्षांपर्यंतच्या मुलांचे संक्रात ते रथसप्तमी काळात बोरन्हाण का करायचे ते वाचा!

Web Title: Look at the interrelationship between Boranhan, Sabari mata and the story of Ramayana!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.