Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेला करा अक्षय्य दान; मिळेल सर्वोच्च सुख आणि भरपूर समाधान!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 2, 2024 04:58 PM2024-05-02T16:58:37+5:302024-05-02T16:59:27+5:30

Akshaya Tritiya 2024:१० मे रोजी अक्षय्य तृतीया आहे, या दिवशी कमावलेले पुण्य कधीच कमी होत नाही, मग ते मिळवण्याचा मार्ग कोणता ते जाणून घ्या!

Akshaya Tritiya 2024: Donate so many things on Akshay Tritiya; Get supreme happiness and abundant satisfaction! | Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेला करा अक्षय्य दान; मिळेल सर्वोच्च सुख आणि भरपूर समाधान!

Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेला करा अक्षय्य दान; मिळेल सर्वोच्च सुख आणि भरपूर समाधान!

अक्षय्य तृतीया या तिथीतच वर्णन आढळते की ज्याचा क्षय होत नाही ती अक्षय्य तिथी. या दिवशी गोष्टी घेतल्याने वाढत नाहीत तर दिल्याने वाढतात. म्हणून आपल्या संस्कृतीने दानाला महत्त्व दिले आहे. लोक आजच्या दिवशी सोने खरेदीला महत्त्व देतात. सोने हे वैभवाचे प्रतीक तर आहेच मात्र त्याहीपेक्षा जास्त महत्त्वाचे म्हणजे आनंद आणि समाधान ते मिळणे फार महत्त्वाचे आहे. या दोन गोष्टी आपल्या आयुष्यात हव्या असे वाटत असेल तर पुढील गोष्टी लक्षात ठेवून त्याप्रमाणे अनुसरण केले पाहिजे. 

दानाचे महत्त्व आपण सगळेच जण जाणतो. परंतु कधी परिस्थिती अभावी, तर कधी वेळेअभावी आपल्याकडून दान दिले जात नाही. दान देण्यासाठी आर्थिक श्रीमंती बरोबर मनाची श्रीमंती सुद्धा असावी लागते. दातृत्त्वाचा गुण अंगी असावा लागतो. दानाचे अनेक प्रकार आहेत. पैकी आपल्या सर्वांना सहज साध्य असलेला प्रकार म्हणजे वस्त्रदान!

आता काही पूर्वीसारखे दिवस राहिले नाहीत, की वर्षातून एकदा कपड्यांची खरेदी करावी. आता सण वाराची वाट न पाहता वरचेवर कपड्यांची खरेदी सुरू असते. अशा वेळी नवीन कपडे घेताना जुने परंतु न फाटलेले कपडे वेळीच गरजू लोकांना दान केले, तर तुमची आणि त्यांची गरज नक्कीच पूर्ण होऊ शकेल. नवे कोरे, न वापरलेले कपडे देणार असाल तर त्यालाही आपण काही निर्बंध लावून घेतले पाहिजे. 

कपड्यांना द्या नवे रूप : थोडे फार फाटलेले कपडे फेकून देण्यापेक्षा रफ़ू करून गरजू लोकांना दान करा. आजच्या काळात अनेक कलाकार आहेत, जे जुन्या फाटलेल्या कपड्यांचे रूप पालटून त्याला नवीन साज देतात. कापडी पिशवी, गोधडी, ओढणी, पायपुसणी, चादर, पडदे असे नानाविध प्रकार जुन्या कपड्यांपासून शिवता येतात. 

कपडे नेहमी धुवून द्या: कपडे देण्याआधी ते नेहमी धुवून नीट घडी करून मगच दान करा. कपड्यांमुळे त्वचेशी संबंधित आजार होऊ नये, यासाठी कपडे धुवून वाळवून मगच दुसऱ्यांना दिले पाहिजेत. 

ऋतूनुसार कपडे द्या : उन्हाळ्यात सुती कपडे, पावसाळ्यात छत्री, रेनकोट किंवा उबदार चादरी, हिवाळ्यात स्वेटर, शाली, गोधड्या, सोलापुरी चादरी यांचे दान केले पाहिजे. अन्यथा ऋतुमानानुसार कपडे नसतील तर त्या दानाचा काहीच उपयोग नाही. 

सेवाभावी संस्थांची मदत घ्यावी : अनेकदा आपल्याला दान करण्याची इच्छा असते. परंतु दान नेमके कोणाला करावे, हे उमगत नाही. किंवा आपल्या संपर्कात तसे लोक नसतात. अशा वेळी सेवाभावी संस्थांची मदत घ्यावी आणि ज्या संस्था मनापासून काम करत आहेत, त्यांना मदत करून खारीचा वाटा उचलावा. 

Web Title: Akshaya Tritiya 2024: Donate so many things on Akshay Tritiya; Get supreme happiness and abundant satisfaction!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.