Yogeshwari's 25 stolen ornaments of stolen jewelery stolen from the judiciary | चोरीतील हस्तगत ‘योगेश्वरी’चे २५ तोळे दागिने न्यायमंदिरातूनही चोरीस

लोकमत न्यूज नेटवर्क
अंबाजोगाई : येथील जिल्हा व सत्र न्यायालयाची स्ट्राँग रूम फोडून बुधवारी रात्री अज्ञात चोरट्यांनी सोन्या-चांदीचे दागिने, रोख रक्कम व इतर साहित्य असा ४ लाख ३२ हजार ९२४ रुपयांचा ऐवज लंपास केला. सहा वर्षांपूर्वी महाराष्ट्रात गाजलेल्या योगेश्वरी देवीच्या दागिन्यांची चोरीतील हस्तगत झालेले २५ तोळे सोनेही चोरट्यांनी पुन्हा चोरले. देवीच्या त्याच दागिन्यांची दोनदा चोरी झाल्याने खळबळ उडाली आहे. या चोरीच्या तपासासाठी दोन पथके नेमली आहेत. मंदिरात झालेल्या चोरीनंतर आता न्यायमंदिरातही मोठी चोरी झाल्याने सुरक्षिततेच्या प्रश्न ऐरणीवर आला आहे.

अंबाजोगाई जिल्हा व सत्र न्यायालयातील स्ट्राँगरूममध्ये तीन न्यायालयातील मुद्देमाल ठेवलेला होता. बुधवारी रात्री झालेल्या चोरीनंतर गुरुवारी दिवसभर स्ट्राँगरूममध्ये ठेवलेल्या ऐवजाची पडताळणी करण्यात आली. स्ट्राँगरूममध्ये दैनंदिन व्यवहाराच्या रकमा, किमंती मुद्देमाल ठेवला जातो. या मुद्देमालाची तपासणी प्रत्येक महिन्यात १ ते ५ तारखेपर्यंत होते व याची नोंद घेतली जाते.

या नोंदीनुसार दिवाणी न्यायालयाच्या एका पेटीत रोख रक्कम १ हजार ३४४ रुपये होते. यासह चेकबुक, एफ.डी.च्या पावत्या तर दुस-या दोन पेट्यातील सोन्या-चांदीचे दागिने व इतर ऐवज चोरीस गेला आहे.

न्यायमंदिरात झालेल्या या चोरीत ४ लाख २८ हजार ९४० रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने, रोख रक्कम १ हजार ३३४ रुपये, २ हजार ५०० रुपयांचा मोबाईल असा ऐवज चोरीस गेला आहे. न्यायालयाचे अधीक्षक नरहरी थोरात यांच्या फिर्यादीवरून अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा नोंद झाला आहे. या चोरीचा लवकर तपास लावणे पोलिसांसमोर मोठे आव्हान आहे.

देवीच्या दागिन्यांना ग्रहण
महाराष्ट्रातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री योगेश्वरी देवीच्या अंगावरील ३१ तोळे सोने व तीन किलो चांदीच्या दागिन्यांची चोरी १८ एप्रिल २०१२ रोजी झाली होती. या चोरीतील १५ तोळे दागिने हस्तगत करून ते न्यायालयात जमा झाले होते. त्या जमा झालेल्या दागिन्यांचीही पुन्हा चोरी झाली आहे. चोरीच्या प्रकरणातील आरोपींची नऊ महिन्यांपूर्वीच निर्दोष मुक्तता झाली होती. हे प्रकरण अजून शमलेही नाही तोपर्यंत दागिन्यांची पुन्हा झालेली चोरी भाविकांना वेदनादायी ठरणारी आहे.

एलसीबी, दरोडा प्रतिबंधक लागले कामाला
अंबाजोगाईच्या न्यायमंदिरात झालेल्या चोरीनंतर या चोरीचा तपास अंबाजोगाईचे पोलिस निरीक्षक सोमनाथ गित्ते यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. या चोरीच्या तपासासाठी स्थानिक गुन्हे शाखा, बीड व दरोडा प्रतिबंधक पथक यांची स्वतंत्र दोन पथके नियूक्त करण्यात आली आहेत.