संत मुक्ताईच्या पालखीचे बीडमध्ये स्वागत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2018 01:03 AM2018-07-10T01:03:53+5:302018-07-10T01:04:41+5:30

पांडुरंगाच्या भेटीसाठी निघालेल्या जळगाव जिल्ह्यातील मुक्ताई नगर येथील श्री. संत मुक्ताबाई संस्थानच्या पालखीचे सोमवारी शहरात आगमन झाले. पांडुरंग...पांडुरंग हरी.. तसेच विठुनामाचा गजर आणि अभंग व भजनात तल्लीन होत टाळ मृदंगाच्या गजरात आलेल्या पालखीचे एकादशीच्या पर्वावर सोमवारी जोरदार स्वागत करण्यात आले. माळीवेस येथे लक्षवेधी रिंंगण सोहळ्यानंतर पालखी हनुमान मंदिरात विसावली. मंगळवारी पालखीचा बालाजी मंदिरात मुक्काम राहणार आहे.

Welcome to Saint Muktai's Palkhi Beed | संत मुक्ताईच्या पालखीचे बीडमध्ये स्वागत

संत मुक्ताईच्या पालखीचे बीडमध्ये स्वागत

googlenewsNext

बीड : जावे पंढरीशी आवड मनाशी ।
कधी एकादशी आषाढी ये ।।
या अभंगाप्रमाणे पांडुरंगाच्या भेटीसाठी निघालेल्या जळगाव जिल्ह्यातील मुक्ताई नगर येथील श्री. संत मुक्ताबाई संस्थानच्या पालखीचे सोमवारी शहरात आगमन झाले. पांडुरंग...पांडुरंग हरी.. तसेच विठुनामाचा गजर आणि अभंग व भजनात तल्लीन होत टाळ मृदंगाच्या गजरात आलेल्या पालखीचे एकादशीच्या पर्वावर सोमवारी जोरदार स्वागत करण्यात आले. माळीवेस येथे लक्षवेधी रिंंगण सोहळ्यानंतर पालखी हनुमान मंदिरात विसावली. मंगळवारी पालखीचा बालाजी मंदिरात मुक्काम राहणार आहे.

रविवारी सकाळी गेवराई येथून निघाल्यानंतर दुपारी गढी व सायंकाळी नामलगाव येथे पोहचल्यानंतर पालखीचा मुक्काम होता. सोमवारी सकाळी जालना रोडवर भाविकांनी स्वागत केले. तेथे बियाणी परिवाराच्या वतीने वारकऱ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. पालखीतील रथ, बैल, अश्व आकर्षण होते. रस्त्याच्या दुतर्फा बाजुने महिला, पुरुष भाविकांनी पूजन करुन पालखीचे दर्शन घेतले. सुभाष रोड येथे आदर्श मार्केट व्यापारी संघ तसेच या भागातील विविध व्यापाºयांच्या वतीने फराळ, राजगिरा लाडु, केळी, साबन आदीचे वाटप करण्यात आले.

माळीवेस येथे रिंगण सोहळ्याने उपस्थितांची मने जिंकली. त्यानंतर हनुमान मंदिरात आरतीनंतर मुक्ताई संस्थानचे प्रमुख अ‍ॅड. रविंद्र पाटील, दिंडी प्रमुख रविंद्र महाराज हरणे, पंजाबराव पाटील, संप्रत पाटील, ज्ञानेश्वर हरणे आदींचे स्वागत हनुमान मंदिर विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष शांतीलाल पटेल, चंद्रकांत पाटील, विश्वासराव मनसबदार, अ‍ॅड. संपतराव मार्कड, अ‍ॅड. प्रसाद मनसबदार, सुरेश नहार, डॉ. लक्ष्मीकांत बाहेगव्हाणकर, लक्ष्मणराव जाधव, रमेश पाटील, महाबलीचे अध्यक्ष बाळु धोतरे आदींनी स्वागत केले. नंतर मंदिरात भाविकांना दर्शनासाठी पालखी विसावली. भाविकांनी रांगेत दर्शन घेतले. १० जुलै, मंगळवारी सकाळी १० वाजता पालखीचे प्रस्थान होऊन पेठेतील श्री बालाजी मंदिरात मुक्काम राहणार आहे.

‘मुक्ताईच घरी आल्या’
संत मुक्ताबार्इंची पालखी बीडमध्ये येते तेंव्हापासून (३०८ वर्ष) बीडच्या माळीवेस हनुमान मंदिरात पालखीचा विसावा असतो. या वर्षी मंदिर ट्रस्टच्या वतीने वरील बाजुस मोठा हॉल बांधला असून वारकरी तेथे विश्रांती घेत आहेत. १९८९ पासून या ट्रस्टचा अध्यक्ष या नात्याने आमची सेवा घडते. स्थानिक भाविक वारकरी महिला, पुरुषांना घरी नेतात. मुक्ताईच घरी आल्या या भावनेतून आदरातिथ्य करतात, असे विशवस्त मंडळाचे शांतीलाल पटेल यांनी सांगितले.

पालखीचा दिनक्रम
सकाळी ४ वाजता काकडा भजन व आरतीनंतर पंढरीच्या दिशेने भजन, अभंग गात प्रस्थान, दुपारी विसावा नंतर प्रवासादरम्यान वाटेतच हरिपाठ, भजन, मुक्कामी वाटचालीचे कीर्तन होते.

रथ ब-हाणपूरच्या पाटलांचा
संत मुक्ताई पालखीमधील मानाचा रथ बºहाणपूरच्या नाचनखेडा येथील राजेंद्र पाटील यांचा आहे. श्रद्धेपोटी त्यांचा रथ या सोहळ्यात असतो.

६ जिल्ह्यातून पालखी
यंदा १८ जूनपासून मुक्ताईनगर येथून तालुके, वाड्या, वस्त्यांना पवित्र करत पालखी सोहळा जळगाव, बुलढाणा, जालना, बीड, उस्मानाबाद, सोलापूर मार्गे पंढरपुरला पोहचतो. मध्य प्रदेशातील खंडवा, बुºहानपुर, नेपानगर तसेच विदर्भ, मराठवाडा, खानदेश आदी प्रदेशातून पालखीचे भ्रमण असते.

आबालवृद्धांचा उत्साह
पालखीच्या स्वागतासाठी सकाळपासूनच भाविकांची लगबग सुरु होती. तर तीन दिवसांपासून अनेकांनी वारकºयांच्या व्यवस्थेसाठी, प्रसादासाठी नियोजन केले. पालखीचे आगमन होताच चैतन्य फुलले होते. विठू नामाचा गजर आणि अभंग, भजन गात पालखी सोहळा पुढे सरकत होता. सेवेकरी सेवेला लागले, तर शेकडो अबालवृद्ध भाविक पालखी मार्गावर दर्शनासाठी उभे होते. बच्चे कंपनीमध्ये वेगळाच उत्साह होता. त्यामुळे फुगे आणि खेळणी विक्रेत्यांनाही रोजगार मिळाला.

Web Title: Welcome to Saint Muktai's Palkhi Beed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.