प्रीतम मुंडे यांचा दणदणीत विजय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2019 01:27 AM2019-05-24T01:27:59+5:302019-05-24T01:29:15+5:30

लोकसभा मतदारसंघात अपेक्षेप्रमाणे भाजपच्या डॉ. प्रीतम मुंडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या बजरंग सोनवणे यांचा १ लाख ६९ हजार ५७ मतांनी दणदणीत पराभव करीत मतदारसंघात भाजपची जादू कायम असल्याचे दाखवून दिले.

Victory of Pritam Munde | प्रीतम मुंडे यांचा दणदणीत विजय

प्रीतम मुंडे यांचा दणदणीत विजय

googlenewsNext
ठळक मुद्देभाजपची जादू बीड जिल्ह्यात कायम : बजरंग सोनवणे, विष्णू जाधव यांना बसला पराभवाचा मोठा धक्का

सतीश जोशी ।

लोकमत न्यूज नेटवर्क

बीड : लोकसभा मतदारसंघात अपेक्षेप्रमाणे भाजपच्या डॉ. प्रीतम मुंडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या बजरंग सोनवणे यांचा १ लाख ६९ हजार ५७ मतांनी दणदणीत पराभव करीत मतदारसंघात भाजपची जादू कायम असल्याचे दाखवून दिले. वंचित बहुजन आघाडीचे विष्णू जाधव यांनी जवळपास ९१ हजार ९४५ मते घेत कडवी लढत दिली. २०१४ सालच्या पोटनिवडणुकीमध्ये प्रीतम मुंडे यांनी जवळपास ७ लाखाच्या विक्रमी मताधिक्याने काँग्रेसचे अशोकराव पाटील यांचा पराभव केला होता. सोशल मीडियावर कडवी लढत वाटत असताना प्रीतम मुंडे यांनी जवळपास पावणेदोन लाखांच्या मताधिक्याने मिळवलेल्या विजयाने सर्वांचेच अंदाज फोल ठरले.
बीडच्या निवडणुकीत जातीय समीकरणे प्रभावी ठरतात की काय, असे प्रचारावरून वाटत होते. मोठ्या प्रमाणावर प्रचारात जातीयवाद पहावयास मिळाला. परंतु मतदारांनी मात्र सर्व जातीय समीकरणे मोडीत काढत नरेंद्र मोदी यांच्या विकासाभिमुख ध्येयधोरणाला आणि जिल्ह्यातील भाजपाच्या विकास कामांना प्राधान्य देत डॉ. प्रीतम मुंडे यांना मोठ्या मताधिक्क्याने विजयी केले. प्रीतम मुंडे यांना ६ लाख ७८ हजार १७५ मते तर बजरंग सोनवणे यांना ५ लाख ९ हजार १०८ मते मिळाली. वंचित बहुजन आघाडीचे विष्णू जाधव हे ९१ हजार ९७२ मते घेऊन तिसऱ्या क्रमांकावर राहिले. या मतदारसंघात ३६ उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले होते.
सोनवणे आणि जाधव, अपक्ष संपत चव्हाण (१६७७१), मुजीब इनामदार (६१४१) हे चौघे वगळता इतरांना चार हजाराच्या पुढे मते घेता आली नाहीत. २०१४ च्या पोटनिवडणुकीत प्रीतम मुंडे यांनी काँग्रेसचे अशोकराव पाटील यांचा जवळपास विक्रमी ७ लाख मताधिक्क्याने पराभव केला होता. २००९ आणि १४ च्या सार्वत्रिक निवडणुकीत गोपीनाथराव मुंडे हे जवळपास १ लाख ४० हजारांच्या मताधिक्क्याने विजयी झाले होते.
१९५२ पासून ते २०१९ पर्यंत बीड लोकसभा मतदारसंघासाठी १८ निवडणुका झाल्या. यापैकी ७ वेळा काँग्रेस, २ वेळा कम्युनिस्ट पक्ष, १ वेळा राष्टÑवादी काँग्रेस, जनता दल आणि ७ वेळा भारतीय जनता पक्षाने ही निवडणूक जिंकली आहे. १९९६ पासून झालेल्या ८ पैकी ७ निवडणुका भाजपाने जिंकल्या आहेत. २००४ ला जयसिंगराव गायकवाड यांनी राष्टÑवादी काँग्रेसकडून निवडणूक जिंकली होती. त्यापूर्वी ९८ आणि ९९ साली ते भाजपाच्या तिकिटावर निवडून आले होते. केज विधानसभा मतदार संघात २८ हजार, परळी १८९१९, बीड ६२६२, आष्टी ७० हजार ४४, गेवराई ३४ हजार ४८८, तर माजलगावमध्ये प्रीतम मुंडे यांना १९ हजार ७१६ मताधिक्य मिळाले.
या निवडणुकीत हम भारतीय पार्टीचे अशोक थोरात यांना ३३३७, भारतीय प्रजा सुराज्य पक्षाचे कल्याण गुरव यांना २०८२, महाराष्ट्र क्रांती सेनेचे गणेश करांडे यांना २७५१, दलित, शोषितचे रमेश गव्हाणे यांना १२३४, आंबेडकराईट पार्टीचे चंद्रप्रकाश शिंदे यांना १५७९, समाजवादी पार्टीचे सय्यद मुजम्मील यांना १२२३ तर बहुजन रिपब्लिकन सोशालिस्टचे सादेक मुनिरोद्दीन यांना ६७५ मते पडली. या निवडणुकीत २६ अपक्ष रिंगणात उतरले होते. संपत चव्हाण यांनी १६ हजार ७७० मते घेतली. इतर अपक्षांना फारसा प्रभाव टाकता आला नाही. या मतदारसंघात ‘नोटा’ ची मते २४८७ इतकी होती.

Web Title: Victory of Pritam Munde

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.