दोन लाख नवीन मतदार वाढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2019 12:46 AM2019-03-12T00:46:58+5:302019-03-12T00:47:31+5:30

बीड लोकसभेसाठी दुसऱ्या टप्प्यात म्हणजे १८ एप्रिल रोजी मतदान होणार आहे.

Two lakh new voters were increased | दोन लाख नवीन मतदार वाढले

दोन लाख नवीन मतदार वाढले

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : २०१४ च्या लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत १ लाख ९६ हजार १८६ एवढ्या मतदारांची वाढ झाली आहे. बीड लोकसभेसाठी दुसऱ्या टप्प्यात म्हणजे १८ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख २६ मार्च असेल, अशी माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी पत्रपरिषदेत दिली.
यावेळी बीड जि. प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे, निवडणूक अधिकारी प्रवीण धरमकर, उप विभागीय अधिकारी प्रभोदय मुळे यांची उपस्थिती होती.
जिल्हाधिकारी म्हणाले की, बीडसाठी १८ एप्रिल रोजी मतदान होणार असून, २३ मे रोजी मतमोजणी होईल. ही मतमोजणी बीड कृषी उत्पन्न बाजार समितीत होणार असून, त्यांचे पाच गोदाम ताब्यात घेतले आहेत. बीड लोकसभेसाठी २० लाख २८ हजार ३३९ इतके मतदार असून, त्यात १० लाख ७३ हजार ५२५ पुरुष, तर ९ लाख ५४ हजार ८०७ महिला आणि ७ मतदार तृतीय पंथी आहेत. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत १ लाख ९६ हजार १८६ एवढ्या मतदारांची वाढ झाली आहे. ही वाढ १०.७७ टक्के इतकी आहे.
२०१४ साली २१६५ इतकी मतदान केंद्रे होती. यावर्षी त्यांची संख्या २३११ इतकी आहे. आणखी १५ ठिकाणी सहाय्यकारी मतदान केंद्रे होणार आहेत. यंदाच्या निवडणुकीत ईव्हीएम मशीनसोबतच व्हीव्हीपॅट हे मशीन पहिल्यांदाच वापरण्यात येणार आहे. हे मशीन सर्व मतदान केंद्रावर वापरले जाईल. प्रत्येक मतदाराला ईव्हीएमवर मतदान केल्यानंतर केलेल्या मतदानाची खात्री त्यांना व्हीव्हीपॅटवर करता येईल. मतदान केल्यानंतर व्हीव्हीपॅटवर ७ सेकंद मतदानाची चिठ्ठी दिसेल व त्यानंतर ती चिठ्ठी त्याच मशीनमध्ये पडेल. यासाठी निवडणूक आयोगाकडून बीड लोकसभेसाठी ५ हजार २१० बॅलेट युनिट, २ हजार ९९१ कंट्रोल युनिट व ३ हजार २५५ व्हीव्हीपॅट मशीन प्राप्त झाल्या आहेत. नवीन प्रकारच्या मशीन व व्हीव्हीपॅटची मतदारांना तोंडओळख होण्यासाठी मतदार जनजागृती कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. जिल्ह्याच्या १४०३ गावांमध्ये व २३११ मतदान केंद्राच्या व्याप्तीमध्ये ३ हजार ७६ एवढ्या ठिकाणी हा कार्यक्रम राबविण्यात आला व त्याची दुसरी फेरी राबविण्यात येत आहे. ५ लाख ८५ हजार मतदारांमध्ये जनजागृती करण्यात आली, तर २ लाख मतदारांनी प्रत्यक्ष मतदान करुन पाहिले, असेही जिल्हाधिकारी पाण्डेय यांनी सांगितले.
दिव्यांग मतदारांचा निवडणुकीमध्ये सहभाग वाढविण्यासाठी विशेष प्रयत्न केले जाणार ओहत. बीड लोकसभा मतदार संघात ४ हजार १०० इतके दिव्यांग मतदार आहेत. यात दृष्टीदोषाचे ५६८, कर्णदोषाचे ५९१, शारीरिक अपंगत्व २२८१ आणि इतर ६६० मतदार आहेत. त्यांना मतदानासाठी मतदान केंद्रावर येण्यासाठी सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत.
मतदारांसाठी १९५० हा टोल फ्री क्रमांक मतदारांच्या सोईसाठी उपलब्ध करुन देण्यात आला आहे. या क्रमाकांवर कोणताही मतदार मतदार यादीतील आपल्या माहितीबाबत माहिती करुन घेऊ शकेल. तसेच मतदार यादीबाबत काही तक्रार असेल तर त्याबाबत या क्रमाकांवर माहिती देऊ शकेल.
मतदारांच्या सोयींसाठी निवडणूक आयोगाने काही अ‍ॅप्स तयार करुन दिले आहेत. त्यामध्ये व्होटर हेल्पलाईन अ‍ॅप हे विकसित केले आहे. त्याद्वारे कोणताही मतदार त्याचे नाव मतदार यादीत आहे किंवा नाही, त्याचे मतदान केंद्र कोणते आहे याबाबत माहिती प्राप्त करुन घेऊ शकेल. तसेच सुविधा, सुगम आणि समाधान हे अ‍ॅपही उपलब्ध करुन दिले आहेत. सुविधा या अ‍ॅपद्वारे राजकीय पक्षांना विश्रामगृह, मैदाने, वाहने याबाबत आॅनलाईन परवान्यासाठी अर्ज करता येणार आहेत. सुगम अ‍ॅपद्वारे वाहनांचे व्यवस्थापन करता येईल. समाधान अ‍ॅपद्वारे मतदारांच्या तक्रारी घेतल्या जातील. सी-व्हीजिल हे अ‍ॅप या निवडणुकीत गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी विकसित केले आहे. यामध्ये कोणताही मतदार किंवा नागरिक फोटो किंवा व्हिडिओ त्याचे नाव गुप्त राखून तक्रार करु शकेल. त्याने केलेल्या तक्रारीवर १०० मिनिटाच्या आत कारवाई केली जाणार आहे. यासाठी ४८ भरारी पथके नियुक्त केली आहेत.
पारदर्शक वातावरणात निवडणूक पार पाडा :येडगे
बीड : लोकसभा निवडणूक पारदर्शक वातावरणात पार पाडाव्यात, अशा सूचना आचारसंहिता कक्षाचे प्रमुख तथा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे यांनी प्रशासनातील अधिकाऱ्यांना सोमवारी दिल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात आचारसंहिता व कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांबाबत येडगे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. यावेळी ते बोलत होते. या बैठकीस निवासी उपजिल्हाधिकारी रवींद्र परळीकर, निवडणूक उपजिल्हाधिकारी प्रवीण धरमकर , उपविभागीय अधिकारी प्रबोधन मुळे, आयकर अधिकारी डीएम रौंदळ यांची उपस्थिती होती. येडगे यांनी लोकसभा निवडणुकीत अधिकारी कर्मचारी यांनी करावयाची कामे, अहवाल, तंत्रज्ञानाचा वापर, भारत निवडणूक आयोगाची मार्गदर्शक तत्त्वे, नियोजन आणि नियंत्रण आदींबाबत उपस्थित अधिकाऱ्यांना सविस्तरपणे सादरीकरणातून मार्गदर्शन केले. त्याचबरोबर सर्व यंत्रणांनी योग्य समन्वय राखून उत्तम संवादातून सांघिकपणे आदर्श आचारसंहितेचे पालन व्हावे, या दृष्टीकोनातून निवडणूक काळात काम करावे, अशा सूचनाही त्यांनी दिल्या. परळीकर यांनीही यावेळी मार्गदर्शन केले. तसेच योग्य त्या सूचनाही दिल्या. कार्यक्र माचे प्रास्ताविक निवडणूक उपजिल्हाधिकारी प्रविण धरमकर यांनी केले.

Web Title: Two lakh new voters were increased

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.