तिकीट अंबाजोगाईचे, सोडले लातूरला; खुराणा ट्रॅव्हल्सला ग्राहकमंचाने ठोठावला १२ हजाराचा दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2019 03:58 PM2019-06-19T15:58:48+5:302019-06-19T16:00:49+5:30

प्रवाशास हिंगोलीत उतरण्यास सांगितले; नकार देताच लातूरला नेऊन सोडले

Ticket Amabajogai, dropped to Latur; 12 thousand rupees penalty for Khurana Travels by consumer forum | तिकीट अंबाजोगाईचे, सोडले लातूरला; खुराणा ट्रॅव्हल्सला ग्राहकमंचाने ठोठावला १२ हजाराचा दंड

तिकीट अंबाजोगाईचे, सोडले लातूरला; खुराणा ट्रॅव्हल्सला ग्राहकमंचाने ठोठावला १२ हजाराचा दंड

googlenewsNext
ठळक मुद्देप्रवासापोटी त्यांच्याकडून १३०० रुपये भाडे खुराणा ट्रॅव्हल्सच्या वतीने आकारण्यात आले ठाम राहिल्याने ट्रॅव्हल्स चालकांनी त्यांना लातूर येथे पहाटे १ वाजता सोडले

अंबाजोगाई (बीड ) : अंबाजोगाई येथील प्रवाशास अमरावती ते अंबाजोगाई असे तिकीट असूनही अंबाजोगाईस न आणता लातूरला सोडले. प्रवाशाची झालेली ही दिशाभूल व त्यांना झालेला मानसिक त्रास याबद्दल खुराणा ट्रॅव्हल्सच्या व्यवस्थापनाला दोषी ठरवून प्रवाशास झालेल्या खर्चापोटी  २७२३ रुपये तर दंड म्हणून १० हजार रुपये असा १२ हजार ७२३ रुपये दंडाची रक्कम देण्याचे आदेश जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच बीडचे अध्यक्ष श्रीधर कुलकर्णी व सदस्या अपर्णा दीक्षित यांनी मंगळवारी (दि. १९ ) दिले आहेत.

अंबाजोगाई येथील दीपक दामोधर थोरात हे अभियंता आहेत. त्यांनी अमरावती येथून अंबाजोगाई येथे येण्यासाठी खुराणा ट्रॅव्हल्सचे ९ जून २०१८ रोजीचे तिकीट काढले. या प्रवासापोटी त्यांच्याकडून १३०० रुपये भाडे खुराणा ट्रॅव्हल्सच्या वतीने आकारण्यात आले. ठरल्याप्रमाणे थोरात हे  अमरावती येथून अंबाजोगाईकडे परत येण्यासाठी निघाले. अमरावती येथून ट्रॅव्हल्स दुपारी ३ वाजता निघून अंबाजोगाई येथे रात्री ११ वाजता पोहचणार होती. ट्रॅव्हल्स क्र. एम. एच. ३८ एफ. ८००९ ही बस अमरावती निघाली व सायंकाळी ६ वाजता हिंगोली येथे पोहचली. ट्रॅव्हल्स हिंगोली येथे पोहचल्यानंतर  ट्रॅव्हल्सच्या कर्मचाऱ्यांनी थोरात यांना तुम्ही इथेच उतरा व दुसऱ्या ट्रॅव्हल्स अथवा बसने  अंबाजोगाईला जा असे सांगितले. थोरात यांनी नकार दिला असता ट्रॅव्हल्सच्या कर्मचाऱ्यांनी त्यांच्याशी हुज्जत घातली. अरेरावीची भाषा वापरली. हा सर्व प्रकार होऊनही थोरात ठाम राहिल्याने ट्रॅव्हल्स चालकांनी त्यांना लातूर येथे नेऊन सोडले. सदरील ट्रॅव्हल्स नांदेडमार्गे लातूर येथे पहाटे एक वाजता पोहचली. रात्री एक वाजता अंबाजोगाईला जाण्यासाठी बस अथवा इतर वाहनांची सोय नाही. यामुळे  थोरात यांना हॉटेलमध्ये मुक्काम करावा लागला व दुसऱ्या दिवशी राज्य परिवहन महामंडळाच्या बसने ते अंबाजोगाईत आले. 

थोरात यांनी हा सर्व प्रकार व या प्रकरणाची तक्रार जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच बीड यांच्याकडे केली. प्रवासातील सर्व पुरावे, हॉटेलमध्ये राहिलेल्या पावत्या व सर्व प्रकार मंचाकडे मांडला. या प्रकरणाची सुनवणी जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच बीडचे अध्यक्ष श्रीधर कुलकर्णी व सदस्या अपर्णा दीक्षित यांच्यासमोर झाली.  दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून घेऊन जिल्हा ग्राहक निवारण मंचाने थोरात यांना मानसिक व शारीरिक झालेल्या त्रासापोटी १० हजार रुपये तक्रारीचा खर्चा १ हजार रुपये व प्रवासात खर्च झालेली रक्कम १७२३ रुपये असे एकूण १२७२३ रुपये देण्याचे आदेश दिले. ग्राहक संरक्षण कायदा १९८६ चे अधिनियम २००५ मधील कलम २० (३) प्रमाणे तक्रारदार थोरात यांना पूर्ण रक्कम मिळेपर्यत द.सा.द.शे. ८ टक्के दराने व्याज आकारले जावे. असेही आदेश दिले आहेत. या प्रकरणी तक्रारदार दीपक थोरात यांच्या वतीने अ‍ॅड. राजेश गुप्ता यांनी बाजू मांडली. ट्रॅव्हल्स चालकांच्या मनमानीविरुद्ध ग्राहक तक्रार निवारण मंचाने ठोठावलेल्या या दंडामुळे ग्राहकांची लूट थांबेल असा आशावाद प्रवाशांमध्ये निर्माण झाला आहे. 

Web Title: Ticket Amabajogai, dropped to Latur; 12 thousand rupees penalty for Khurana Travels by consumer forum

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.