शब्बीरमामूंच्या ‘पद्मश्री’त भाभींचाही वाटा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2019 11:54 PM2019-03-07T23:54:34+5:302019-03-07T23:55:26+5:30

शिरूर तालुक्यातील दहिवंडीसारख्या एका छोट्याशा खेड्यात असलेल्या आणि अक्षर ओळखही नसलेल्या शब्बीरमामूंना पद्मश्री हा बहुमानाचा सन्मान जाहीर झाला आणि संपूर्ण बीड जिल्ह्याने त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला.

Shabbiramamu 'Padmashri' also includes the contribution of sister-in-law | शब्बीरमामूंच्या ‘पद्मश्री’त भाभींचाही वाटा

शब्बीरमामूंच्या ‘पद्मश्री’त भाभींचाही वाटा

Next

विजयकुमार गाडेकर।
लोकमत न्यूज नेटवर्क
शिरुर कासार : शिरूर तालुक्यातील दहिवंडीसारख्या एका छोट्याशा खेड्यात असलेल्या आणि अक्षर ओळखही नसलेल्या शब्बीरमामूंना पद्मश्री हा बहुमानाचा सन्मान जाहीर झाला आणि संपूर्ण बीड जिल्ह्याने त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला. त्यांच्या या यशामागे त्यांची धर्मपत्नी अशरफबी भाभींचाही सिंहाचा वाटा होता, ही बाब नाकारता येणार नाही. प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे पत्नीचा वाटा तितकाच मोलाचा असतो, ही बाब दहिवंडीच्या शब्बीरमामूंबाबतही लागू पडते आहे.


लहानपणीच म्हणजे अगदी तीन महिन्यांचे शब्बीरमामू असताना त्यांचे मातृछत्र हरपले. बाळाला सांभाळण्याची जबाबदारी त्यांचे वडील बुढनभाई यांच्यावर पडली. अशा वेळी तरडगव्हाणचे दादा भाऊराव पाटील यांनी बाळाला दुधासाठी म्हणून एक गाय अगदी मोफत दिली होती. त्याच गायीच्या दुधावर शब्बीरमामूंचे भरणपोषण झाले. पुढे गायीचा वंशवेल वाढत गेला. आज तर ही संख्या १०० च्या वर गेली आहे.
पुढे शब्बीरमामूंचे लग्न अशरफबी यांच्याबरोबर झाले. गरिबी पाठ सोडत नव्हती. अत्यंत परिश्रम करून अशरफबी यांना संसार करावा लागत होता. लग्न झाले, त्याच वर्षी १९७२ साली मोठा दुष्काळ पडला आणि रोजगाराच्या शोधात आपली धर्मपत्नी अशरफबी यांना गावीच ठेवून मामूंनी मुंबई गाठली. कसाबसा महिना मुंबईत काढला आणि पुन्हा गावी परतून मिळेल ते काम केले. मोलमजुरीवर गुजराण करताना मामूंना अशरफबी मदत करीत राहिल्या.
इकडे गाईचा वंशवेल जसा वाढता चालला होता, तसे घरही लहान मुलांनी बहरले. गायीसोबतच मुलाबाळांना सांभाळणे अशरफबी यांना कठीण जात असले तरी त्यांनी मामूंना साथ दिली. कालपरत्वे मामूंचे पितृछत्रही हरपले. जगाचा निरोप घेताना त्यांनी मामूला जवळ घेत आपल्या गायीचा सांभाळ चांगला कर, असा सल्ला वडील बुढनभाई यांनी दिला. वडिलांच्या इच्छेनुसार गायी सांभाळण्याची जबाबदारी या दोघांवर पडली. अनेक संकटांना सामोरे जात या दोघांनी मुक्या जनावरांची सेवा केली. त्यांचे हे कार्य पंचक्रोशीत पसरले आणि केंद्र शासनाने त्यांना पद्मश्री हा सन्मान देऊन त्यांच्या कार्याचा गौरव केला. आजही शंभरावर गायी हे कुटुंब तारेवरील कसरत करीत सांभाळत आहे.

माझे पतिराज शब्बीरमामू यांचे कार्य अधिक वाढीसाठी आम्ही सर्व जण त्यांना मदत करीत आहोत. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत आम्ही दिवस काढले. त्याची उजळणी नको आहे. मिळालेल्या आनंदात आम्ही समाधान मानतो. आता मात्र यापुढे आमच्या गायीना उपासमारीची वेळ येऊ नये. त्यासाठी त्यांना चारा, निवारा या गोष्टी मिळाव्यात, एवढीच इच्छा आहे .
- अशरफबी शब्बीरमामू

Web Title: Shabbiramamu 'Padmashri' also includes the contribution of sister-in-law

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.