Reality in Beed: Selling at Rs. 300 | बीडमधील वास्तव : ३०० रुपयांत देहविक्री
बीडमधील वास्तव : ३०० रुपयांत देहविक्री

ठळक मुद्देदीड वर्षात १४ कारवायांत २१ पीडितांची सुटका; अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाची कारवाई

सोमनाथ खताळ ।
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : परिस्थिती, मजबुरी, ब्लॅकमेल अशा विविध कारणांमुळे आणि पैशांच्या आमिषाला बळी पडून अनेक महिला, मुली वेश्या व्यवसायात ओढल्या जात आहेत. त्यांना पैशाचे आमिष दाखवून देह विक्री करण्यास भाग पाडले जात आहे. मागील काही घटनांचा आढावा घेतला असता केवळ ३०० ते १००० रुपयांत या महिला देह विक्री करीत असल्याचे धक्कादायक वास्तव बुधवारी समोर आले आहे. यावर कारवाई करण्यासाठी असलेल्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक पथकाने १८ महिन्यात १४ कारवाया केल्या आहेत. त्यामध्ये २१ महिला व मुलींची सुटका केली आहे.
पोलीस अधीक्षक कार्यालयात अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाची स्थापना साधारण तीन वर्षांपूर्वी करण्यात आली. औरंगाबाद, उस्मानाबाद, जालना आणि बीड जिल्ह्याचा कारभार या कार्यालयातून चालतो. पळून व पळवून नेलेल्या अल्पवयीन मुला-मुलींची सुटका करणे, वेश्या व्यवसाय करणाऱ्यांना बेड्या ठोकून महिला व मुलींची सुटका करण्याचे काम हा कक्ष करतो. मागील दीड वर्षांपासून या कक्षाने कारवायांचा धडाका लावला.
पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, अपर अधीक्षक वैभव कलुबर्मे यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार दीपाली गीत्ते, भारत माने, सहायक फौजदार शिवाजी भारती, आप्पासाहेब सानप, सिंधू उगले, नीलावती खटाणे, मीना घोडके, शेख शमीम पाशा, सतीश बहीरवाळ, विकास नेवडे हे एएचटीयू कक्षात कर्तव्य बजावत आहेत.
अल्पवयीन मुलींना
ओढले जाळ्यात
वेश्या व्यवसाय चालविणाºया महिला - पुरुषांकडून अल्पवयीन मुलींनाही जादा पैशांचे आमिष दाखवत जाळ्यात ओढले जात आहे. त्यांना देह विक्रीसाठी दबावही आणला जात असल्याचे अनेक प्रकरणांवरून समोर आले होते. आतापर्यंत २ अल्पवयीन मुलींची सुटका करुन त्यांना सुधारगृहात पाठविले आहे.
यश : दीड वर्षांमध्ये कारवाया वाढल्या
मागील दीड वर्षांपासून कारवायांचा आकडा वाढला आहे. २०१७ मध्ये ६ ठिकाणी कारवाया करुन २३ पुरुषांना अटक केली होती. तसेच ५ आँटीनाही बेड्या ठोकल्या होत्या. यामध्ये १० महिलांसह एका अल्पवयीन मुलीची सुटका केली होती.
२०१८ मध्ये कारवायांचा आकडा वाढला. केवळ ६ महिन्यात ८ ठिकाणी कारवाया करण्यात आल्या. यामध्ये ८ पुरुषांसह ८ महिलांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच ९ महिला व एका अल्पवयीन मुलीची सुटका करण्यात एएचटीयू पथकाला यश आले आहे.
राज्यभर असते साखळी
वेश्या व्यवसाय चालविणाºयांची राज्यभर साखळी आहे. ग्राहकांच्या मागणीनुसार महिला व मुली त्यांना पुरविल्या जात असल्याचे सूत्रांकडून समजते. जिल्ह्यासह राज्यभर त्यांचे एजंट असून, त्यांच्यामार्फत हा सर्व प्रकार सुरु असल्याचे सांगण्यात आले.
माजलगावातील प्रकरण दडपले
माजलगाव येथे एका उच्चभ्रू वस्तीत खुलेआम वेश्या व्यवसाय सुरू होता. परिसरातील नागरिकांनी हा प्रकार पोलिसांच्या निदर्शनास आणून दिला. परंतु राजकीय दबाव व इतर कारणांमुळे पोलिसांनी हे प्रकरण दडपल्याची चर्चा होती. पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांनी या प्रकरणात एएचटीयूला लक्ष घालण्यास सांगितले होते. मात्र, त्यांनाही या प्रकरणात काहीच हाती लागले नाही. शेवटी हे प्रकरण दडपण्यात आले. या कक्षाच्या पो. उप नि. दीपाली गित्ते यांनी आम्ही तपास करुन दाखवू, असे आश्वासन दिले होते. मात्र, ते हवेतच विरले.
हायटेक मार्गाने वेश्या व्यवसाय
जिल्ह्यात अनेक ठिकाणी सर्रासपणे उच्चभू्र वस्तीत हायटेक मार्गाने वेश्या व्यवसाय वाढीस लागला आहे. पोलिसांना अशा ठिकाणी कारवाया करणे सोपे जाते. काही कारवाया देखील झालेल्या आहेत. केवळ गरीबी व आर्थिक कारणांमुळे देह विक्रीकडे महिलांना वळविले जात आहे. असे गुन्हे शोधणे पोलिसांसाठी आव्हान असून समाजातुनही जागरुकतेची गरज आहे.
कुंटणखाना चालविणारे लोक हे ग्राहकाला मोबाईलवरुन फोटो पाठवतात. त्यानुसार महिला व मुलीच्या देहाची किंमत ठरवली जाते.
आठ महिन्यांपूर्वी परराज्यातून एका मुलीला बीडमध्ये आणण्यात आले होते. त्यानंतर तिचे फोटो ग्राहकांना पाठविले होते.
आठ दिवस या मुलीवर अनेकांनी अत्याचार केला होता. विशेष म्हणजे ही मुलगी अल्पवयीन होती. या प्रकरणामध्ये पुढे काय झाले हे मात्र पोलिसांकडून समजू शकले नाही.
मात्र, महिला व मुलींचे फोटो सर्रासपणे पाठविले जातात, असे सूत्रांनी सांगितले आहे. तसे अनेक प्रकरणांमध्ये तपासात निष्पन्नही झाले आहे.


Web Title: Reality in Beed: Selling at Rs. 300
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.