‘प्रिंटिंग टेक्नॉलॉजी’ बीडमध्येच राहणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2017 12:46 AM2017-12-12T00:46:30+5:302017-12-12T00:48:58+5:30

जिल्ह्यातील शिक्षणप्रेमी, संघटना आक्रमक धोरण स्विकारले. लोकप्रतिनिधींनीही दखल घेत थेट सहसंचालकांना धारेवर धरले. त्यानंतर महाविद्यालय प्रशासन खडबडून जागे झाले. दरम्यान, हा अभ्यासक्रम बीडमध्येच राहणार असल्याचा खुलासा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एम.आर.लोहकरे यांनी सोमवारी केला.

'Printing Technology' will remain in Beed | ‘प्रिंटिंग टेक्नॉलॉजी’ बीडमध्येच राहणार

‘प्रिंटिंग टेक्नॉलॉजी’ बीडमध्येच राहणार

googlenewsNext
ठळक मुद्देप्राचार्यांचा खुलासा; नाशिकला हलविण्याचा होता घाट

सोमनाथ खताळ
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : येथील शासकीय महाविद्यालयातील मुद्रणतंत्र शास्त्र पदविका अभ्यासक्रम (डिप्लोमा इन प्रिंटिंग टेक्नॉलॉजी) बीडमधून नाशिकला हलविण्याचा घाट घातला जात असल्याचे ‘लोकमत’ने निदर्शनास आणले होते. यावर जिल्ह्यातील शिक्षणप्रेमी, संघटना आक्रमक धोरण स्विकारले. लोकप्रतिनिधींनीही दखल घेत थेट सहसंचालकांना धारेवर धरले. त्यानंतर महाविद्यालय प्रशासन खडबडून जागे झाले. दरम्यान, हा अभ्यासक्रम बीडमध्येच राहणार असल्याचा खुलासा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एम.आर.लोहकरे यांनी सोमवारी सायंकाळी लोकमत कार्यालयास भेट देऊन केला.

‘प्रिंटिंग टेक्नॉलॉजी’ हा अभ्यासक्रम बीडमधील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयातून काढून नाशिकला हलविण्याचा घाट घातला जात असल्याचे प्रकरण लोकमतने चव्हाट्यावर आणले होते. ‘‘प्रिंटिंग टेक्नॉलॉजी’ हलविण्याचा घाट’ या मथळ्याखाली १० डिसेंबर रोजी तर ‘प्राध्यापकांना विश्वासात न घेताच पाठविला प्रस्ताव’ या मथळ्याखाली ११ डिसेंबर रोजी वृत्तही प्रकाशित केले होते. यामध्ये हा अभ्यासक्रम बीडमध्ये राहणे आवश्यक आहे. इतरत्र हा अभ्यासक्रम हलविला तर मराठवाड्याला मोठा फटका बसण्याची शक्यता वर्तविली होती. हाच धागा पकडून शिक्षणप्रेमी व संघटना आक्रमक झाल्या होत्या.

सोमवारी युक्रांदचे जिल्हाध्यक्ष प्रा.पंडित तुपे व शिक्षक युवक क्रांतीदलचे प्रदेशाध्यक्ष अनिलसिंह तिवारी यांनी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.लोहकरे यांची भेट घेऊन निवेदन दिले. त्यानंतर विद्यापीठ सिनेट सदस्य तथा समता परिषदेचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड.सुभाष राऊत यांनी आ.जयदत्त क्षीरसागर व जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले. यामध्ये हा अभ्यासक्रम हलवू नये, अशी मागणी केली.

या मागणीला धरून आ.जयदत्त क्षीरसागर यांनी मुख्य संचालकांना भ्रमणध्वणीवरून संपर्क साधत माहिती घेतली व हा अभ्यासक्रम बीडमध्ये ठेवण्याच्या सुचना केल्या. त्यांनी हा अभ्यासक्रम इतरत्र हलविण्याचा निर्णय रद्द केल्याचाही शब्द दिल्याचे आ.क्षीरसागर यांनी पत्रकाद्वारे कळविले आहे.

प्रवेश वाढविण्यासाठी संस्था प्रयत्नशील
प्राचार्य डॉ.लोहकरे यांनी सोमवारी प्रिंटिंग टेक्नॉलॉजी या अभ्यासक्रमाची मागील पाच वर्षांचा अहवाल पाठविला आहे. यामध्ये विद्यार्थी प्रवेश क्षमता, पुस्तके, प्राध्यापकांची संख्या आदींचा अहवाल आहे. तसेच महाविद्यालयात प्रिंटिंग टेक्नॉलॉजी या अभ्यासक्रमासाठी प्रवेश कमी असले तरी भविष्यात जास्तीत जास्त प्रवेश मिळविण्यासाठी संस्था प्रयत्नशील राहिल, असे सांगितले आहे. प्राचार्यांचे हे वाक्य विद्यार्थ्यांना दिलासा देणारे आहे.

नवीन अभ्यासक्रम सुरु करण्यासाठी प्रयत्नशील
बीडमधून प्रिंटिंग टेक्नॉलॉजी हा अभ्यासक्रम कोठेही जाणार नाही. उलट नवीन इलेक्ट्रिकल अभ्यासक्रम आणण्यासाठी आमचा प्रयत्न सुरू आहे. आमच्याकडून काही मुद्दे पॉझिटिव्ह दृष्टीकोणातून सहसंचालकांकडे पाठविण्यात आलेले आहेत. अभ्यासक्रम न हलविता पुढच्यावर्षी जास्तीत जास्त प्रवेश आणण्यासाठी प्रयत्न करू.
- डॉ. एम. आर. लोहकरे, प्राचार्य, शासकीय तंत्रनिकेतन
महाविद्यालय, बीड

‘लोकमत’चा पाठपुरावा
प्रिंटिंग टेक्नॉलॉजी हा अभ्यासक्रम बीडमधून हलविल्यास मराठवाड्याचे मोठे नुकसान होणार होते. तसेच यामुळे बीडची ओळख पुसण्याची भीती होती. हाच धागा पकडून लोकमतने १० व ११ डिसेंबर रोजी वृत्त प्रकाशित करून याचा पाठपुरावा केला.
त्यानंतर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.लोहकरे यांनी कार्यालयास भेट देऊन आपण हा अभ्यासक्रम हलविणार नसल्याचे सांगितले. या प्रकरणात लोकमतने यशस्वी पाठपुरावा करून विद्यार्थ्यांचे होणारे नुकसान टाळले.

Web Title: 'Printing Technology' will remain in Beed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.