परळीत ऑईल मिलमधील भीषण स्फोटात एक ठार; दोघे गंभीर जखमी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2019 01:07 PM2019-02-18T13:07:41+5:302019-02-18T13:09:52+5:30

मिल पुन्हा चालू करण्यासाठी दुरुस्ती, डागडुजीचे काम सुरू होते.

One killed in oil mill blast at parali; two were seriously injured | परळीत ऑईल मिलमधील भीषण स्फोटात एक ठार; दोघे गंभीर जखमी 

परळीत ऑईल मिलमधील भीषण स्फोटात एक ठार; दोघे गंभीर जखमी 

Next
ठळक मुद्देही ऑईल मिल गेल्या दोन वर्षांपासून बंद आहे.

परळी (जि. बीड) : शहरापासून आठ किलोमीटरवर असलेल्या बीड रोडवरील गजानन आॅईल मिलमध्ये रविवारी सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास झालेल्या स्फोटात बॉयलर आॅपरेटर  गोपाळ लक्ष्मण गंगणे (५०, रा. भगुरथ, ता. अकोला) यांचा मृत्यू झाला, तर दोघे जण गंभीर जखमी झाले.  

ही आॅईल मिल गेल्या दोन वर्षांपासून बंद आहे. मिल पुन्हा चालू करण्यासाठी दुरुस्ती, डागडुजीचे काम सुरू होते. नेहमीप्रमाणे अनेक कामगार सकाळी मिलमध्ये आले असतानाच सकाळी मिलच्या बाजूला असलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये अचानक भीषण स्फोट झाला. यात बॉयलर आॅपरेटर गोपाळ गंगणे यांचा जागीच मृत्यू झाला, तर  बॉयलर अटेंडन्ट ज्ञानोबा अमृतराव लुंगेकर (५२, रा. बोधेगाव, ता. परळी) आणि प्रोडक्शन सुपरवायझर गोपाळ वासुदेव घाटूळकर ( ३८, रा. पिंपळखुर्द, ता. पातूर, जि. अकोला) हे गंभीर भाजले. दोन्ही जखमींना अंबाजोगाईच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले असून, उपचार सुरू आहेत. स्फोट एवढा भीषण होता की, संपूर्ण पत्र्याचे शेड उद्ध्वस्त झाले. घटनास्थळी जुने कॅपॅसिटर होते. जवळच विद्युत व्यवस्थेचा बोर्ड होता. तसेच आॅईलचे बॅरलही होते. त्यामुळे स्फोट कशाचा झाला हे  समजू शकले नाही.  

एटीएस, बॉम्बशोध पथकाची पाहणी
दहशतवादविरोधी तसेच बॉम्बशोध व नाशक पथकाने घटनास्थळाची पाहणी केली. घातपाताचा संशय नसल्याचे पोलीस निरीक्षक सुरेश चाटे यांनी सांगितले.  

पेटते पोते ऑईलच्या बॅरलवर पडले
कारखाना परिसरातील मोहोळ झाडण्यासाठी पोते पेटविले होते. यात जवळच बॅरलमध्ये असलेल्या ज्वलनशील पदार्थाने पेट घेतला आणि त्यामुळे स्फोट झाला. स्फोटानंतर बॅरलमधील आॅईल उडाले. यात तिघे भाजले. गोपाळ गणगे यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. स्फोटाचे नेमके कारण तपासाअंती समजेल, असे एपीआय मारुती शेळके यांनी सांगितले. 

Web Title: One killed in oil mill blast at parali; two were seriously injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.