बालग्राममधील ९० मुला- मुलींची आई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2019 07:19 AM2019-05-12T07:19:00+5:302019-05-12T07:20:04+5:30

येथील मुलांनी आई- बाबा म्हणून आम्हाला स्वीकारलं हाच आमचा सर्वोच्च पुरस्कार आहे

Mother of 90 children - daughters in Balagram | बालग्राममधील ९० मुला- मुलींची आई

बालग्राममधील ९० मुला- मुलींची आई

Next

- अनिल भंडारी

बीड : दोन वर्षांपूर्वी बालग्राममधील मुला-मुलींनी आम्हाला जवळ बोलावलं. ‘आम्ही तुम्हाला आई- बाबा म्हणालो तर चालेल का? हा त्यांचा प्रश्न ऐकून  सुखद धक्का बसला. आतापर्यंत अनेक पुरस्कार मिळाले, पुढे मिळतीलही. पण येथील मुलांनी आई- बाबा म्हणून आम्हाला स्वीकारलं हाच आमचा सर्वोच्च पुरस्कार आहे... बालग्रामची ‘आई’  प्रीती संतोष गर्जे सांगत होत्या...

बहिणीच्या मृत्यूनंतर पोरकी झालेल्या भाची ऋतुजाकडे पाहून संतोषने २००४ मध्ये गेवराईजवळ  सहारा अनाथालय ‘बालग्राम’ सुरू केले. आई वडिलांचे छत्र हरवलेली, तुरुंगात शिक्षा भोगणाऱ्या बापाची, रेडलाईट एरियात काम करणाऱ्या मातांची आणि आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील मुलांचे उद्ध्वस्त आयुष्य सावरण्याचे काम इथे चालते. येथील ९० मुला- मुलींची आई असलेल्या प्रीती स्वत:चा प्रवास सांगताना म्हणाल्या, यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजी येथे  ‘चलो युवा कुछ कर दिखाएं’ या शिबिरात संतोषची मुलाखत ऐकून ‘हा तरुण निराधार ६० मुलांना कसं सांभाळत असेल’ असा विचार करत मी थक्क झाले आणि तिथेच संतोषसोबत काम करण्याचा निश्चय केला.

२०११ मध्ये विवाह झाला. काय काम करावे लागेल, कसं करायचं?  ते झेपणार का? अशा अनेक प्रश्नांचे काहूर मनात होते. मात्र माझी ‘आई’ डोळ्यांसमोर होती. त्यामुळे बालग्राममध्ये एकरूप होताना सुलभ झालं. आई- वडील नसण्याचं दु:ख इथे आल्यावर समजलं. या मुलांच्या भावविश्वात मी माझी जागा शोधत होते. त्यांनाही मी त्यांची मैत्रीण, मोठी ताई वाटू लागली.  स्वयंपाक, अंघोळ, मुला- मुलींना सोबत घेऊन खरेदी  व त्यांच्या आजारपणात लक्ष दिल्याने जिव्हाळ्याचे नाते फुलत गेले. बालग्राममध्ये रक्तापलीकडचे नाते सांभाळताना होणारा आनंद माझ्यासाठी ऊर्जा देणारा असल्याचे प्रीती सांगतात. 

दिवाळी आली की,  कपडे, फराळ, फटाक्यांची चर्चा मुले माझ्याशी करतात.  पहाटेपासून मुलांना उटणं लावताना सकाळ कधी होऊन जाते कळतही नाही. माझी आई जशी करायची, तशी मी इथे सगळं करते.  मुलेच मेनू ठरवतात आणि माझ्यासोबत  मुली, मावशी स्वयंपाक करतात. आई होणं काय असतं हे आई होतानाच कळते. आई होणं सोपं नसतं. तिची जागा कोणीच घेऊ शकत नाही. या मुलांची मैत्रीण, मोठी ताई म्हणून जबाबदारी पार पाडत असल्याची प्रांजळ भावना प्रीती यांनी व्यक्त केली. 

कधी भेटू आणि कधी नाही असे वाटते...
एक मुलगी भाकर बनवायला शिकत होती.  भाकर चांगली झाल्याचे लक्षात येताच एखादा पुरस्कार मिळाल्यानंतरच्या आनंदाप्रमाणे  हातावर भाकर घेत ती माझ्याकडे धावत आली, हा माझ्यासाठी सुखद क्षण होता. शाळेत बक्षीस मिळाले, कौतुक झाले की मला कधी भेटू आणि कधी नाही, असे या मुलांना वाटते. शाळेतून आल्यानंतर मुलं आधी पळत येतात, दिवसभरातील रिपोर्टिंग करतात, हे सांगताना प्रीती यांना भरुन आले.  

मायेने दोन दिवसांत त्याचा आजार पळवून लावला
मुलांना आजार कळत नसतात. अगदी १०२, १०४ डिग्री तापातही ते अंगावर दुखणे काढतात. एक मुलगी नेहमी झोपून रहायची, तिचे हिमोग्लोबीन कमी झाल्याचे कळले. ते आजार लपवतात. त्यामुळे बारकाईने लक्ष देत त्यांच्यासोबत राहून स्पर्शाने काळजी घेते. मुलासकट घरातून हाकलल्यानंतर सासर व माहेर नसलेल्या आईने  साडेतीन वर्षांच्या एका मुलाला ‘बालग्राम’मध्ये दाखल केले. त्याला ताप आला. आई- आई म्हणून रडत होता. आई होती, पण त्याच्याजवळ नव्हती. मायेने सांभाळ करत दोन दिवसांत त्याचा आजार पळवून लावल्याचा अनुभव प्रीती यांनी कथन केला.  

Web Title: Mother of 90 children - daughters in Balagram

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.